शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

गड्या, अपुला गाव बरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 8:34 AM

करिअर फक्त मुंबई, पुण्यातच होऊ शकतं असं नाही, पण ते कळण्यासाठी मला वर्षभर तिथल्या गर्दीत टांगून घ्यावं लागलं.

- प्रा. राहुल अण्णा महाजन

महाराष्ट्रातील तरुणांच्या करिअरचे स्वप्न मुंबई आणि पुण्यासारख्या स्वप्ननगरीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. जीवन जगावे तर पुणे आणि मुंबईतच यार. काय मजा आहे तिकडे माहीत आहे तुम्हाला! मुंबईची झगमगती दुनिया, गगनचुंबी इमारती, जगप्रसिद्ध ताज, ओबेरॉयसारखी हॉटेल्स, वन-वे रोड, फॅशनेबल मॉल, एवढेच नव्हे तर सर्वांना सुखद, शांत, विनोदी जीवन जगणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सारख्या सिरिअलमधील समाज, सोसायटी आणि त्यामधील टू-बीएचके, थ्री-बीएचके फ्लॅटमधील ‘हम दो हमारे दो’ चे आनंदमयी जीवनाचे स्वप्न रंगविणाऱ्या तरुणांपेक्षा मी नक्कीच वेगळा नव्हतो.

धुळेसारख्या जिल्हास्तरीय, विकसनशील शहरात मी लहानाचा मोठा झालो. वडील येथीलच महाजन हायस्कूलसारख्या नामांकित शाळेत शिक्षक होते आणि म्हणूनच बारावीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत झाले. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी दुसरीकडे जाण्याचा विचार केला, परंतु त्यास पर्यायही येथेच होता. शाळेच्याच बाजूला एसएसव्हीपीएस कॉलेज होते आणि म्हणून लागलीच बीएला स्पेशल इंग्रजी विषय घेतला. वडील इंग्रजीचे शिक्षक असल्याने विषयाचा पाया तसा घरातच पक्का झाल्याने फर्स्ट क्लास मिळविण्यात कोणतीच अडचण आली नाही. त्यानंतर मात्र एमए करण्यासाठी मुंबई अथवा पुणे विद्यापीठात जावे म्हणून विचार करू लागलो. मुंबई, पुणे येथे जाऊनच जीवनात खूप प्रगती करता येते, त्याशिवाय करिअर घडूच शकत नाही, अमुक-अमुक मुलगा पुण्याला, मुंबईला गेला... आज खूप मोठा झालाय, कोणी लेक्चरर, कोणी मॅनेजर झाला, पुण्याला गेल्याशिवाय फाडफाड इंग्रजी बोलताच येत नाही वगैरे वगैरे असे अनेक दृष्टांत वा डोस असो आम्ही कॉलेज कट्ट्यावर बसून एकमेकांना देत असायचो. म्हणून मुंबई अथवा पुण्याला जावे असे ठरविले. परंतु शेवटी एमएसुद्धा याच कॉलेजला पूर्ण करावे लागले. पुण्याला जाण्याचे, शिकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. येथे शिकल्याने आता करिअर कसे घडणार या चिंतेत असतानाच सुदैवाने एकदा परिचयाच्या एका व्यक्तीमार्फत कळाले की ठाण्याला पॉलिटेक्निक कॉलेजला लेक्चचरची जागा व्हेकन्ट आहे. लागलीच इंटरव्ह्यूला गेलो आणि सिलेक्टदेखील झालो.

मुंबईत जाण्याचा तो जीवनात पहिलाच योग होता आणि करिअरची सुरुवात येथून झाली म्हणून आनंद गगनात मावत नव्हता. कल्याणला राहण्याची सोय करून मग कल्याण-ठाणे असे रोजचे अप-डाऊन सुरू झाले. जे स्वप्न आतापर्यंत पाहिले ते पूर्णत्वास जाणार याचा आनंद होता. परंतु स्वप्नातील मुंबईपेक्षा वास्तविक मुंबईचे वास्तव दर्शन लवकरच घडू लागले. कॉलेजचा टाइम दहा ते पाच म्हणून सकाळी आठलाच घरातून बाहेर पडणे भाग होते. लोकलपर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा चौकातील रिक्षावर अक्षरश: झडप घालावी लागे. तेथून पुन्हा जिवाचा आकांत करत लोकलमध्ये चढणे आणि दिवा स्टेशनवर उतरून तीन किलोमीटर पायी चालताना मला माझ्या मागासलेल्या वाटत असलेल्या धुळ्याच्या आधुनिकतेचा साक्षात्कार होऊ लागला. संध्याकाळी घरी परतणे म्हणजे यात्रेतील ‘मौत का कुआ’ पेक्षा कमी नव्हते. कॉलेजपासून शीळफाट्यापर्यंत दोन किलोमीटर चालत येऊन पुन्हा बसमध्ये जागा मिळेलच याची शाश्वती तर बिलकूलच नसायची. धुळ्यात असताना कोणाला चुकून पाय लागला तर चार वेळा पाय पडणारा मी बसमध्ये मात्र कोणाच्या पायावर पाय दिल्याशिवाय जागा करता येत नाही हे शिकलो. बसमध्ये पण अशी गर्दी असायची की घरच्यांना जेवढे जवळून बघितले नाही तेवढे जवळून रोज अनेकांना बघायचो. आणि संध्याकाळी सात-आठ वाजता पोहोचल्यावर पुन्हा एका संकटातून मुक्त होऊन दुसºया दिवसाच्या संकटाची मानसिकता तयार करायचो. अनस्टॉपेबेल मुंबई, नॉनस्टॉप मुंबई, जिगरबाज मुंबई यासारख्या अप्रूप वाटणाऱ्या शब्दांमागील वास्तविकतेची, विवशतेची जाणीव रोजच होऊ लागली. येथे सेटल व्हायचे तर स्वत:चा फ्लॅट आवश्यक आहे म्हणून माझा पगार आणि फ्लॅटची किंमत यांचा अंदाज केला त्यावेळी समजले की, पाचशे-सहाशे स्क्वेअरफूट जागेसाठी उर्वरित आयुष्य फ्लॅटच्या नावावर करावे लागणार होते. याउलट माझे वडील शाळेत जाण्यासाठी पंधरा मिनिटे आधी निघत आणि शाळा सुटल्यावर पंधरा मिनिटात घरी येत असत. उरलेला वेळ ते आम्हाला देत असत. शनिवार-रविवार सुटीचा वेळ समाज, सामाजिक कार्यासाठी देत असत. म्हणून त्यांच्या जीवनाची परिपूर्णता आणि समाधान आता लक्षात येऊ लागले. मनात विचार येई, संपूर्ण दिवसच घराबाहेर जात असेल तर मुलांना काय देणार, समाजाचे ऋण कसे फेडणार, आई-वडिलांची सेवा कशी करणार? असे अनेक प्रश्न सहा महिन्यांच्या अनुभवातच निर्माण होऊ लागले. आई-वडिलांची उणीव तर कधीही भरून येणार नव्हती.रोज सकाळी प्रसन्नचित्ताने घराबाहेर पडल्यानंतर मात्र कल्याणहून ठाण्याला जाईपर्यंत फॅक्टरीचा तो काळपट धूर, कुजकट, बुरसट दमट असा वास डोकंच सणकवायचा. त्याक्षणी पदोपदी धुळ्यासारख्या माझ्या स्वच्छ, सुंदर, शुद्ध आणि सकाळ-संध्याकाळ वाटणाºया हवेची, वाºयाची एक झुळूक अनुभवण्यासाठी मन आसवून जायचे. धुळ्यात पाच हजार स्क्वेअरफूटच्या, आठ रूमच्या घरात राजासारखा राहणारा मी आयुष्यभर पाचशे स्वेअरफूटच्या फ्लॅट नावाच्या पिंजºयात आयुष्यभर कोंडला जाणार याची कल्पना करवत नव्हती. साधारण वर्षभराच्या अनुभवातून मुंबईतील जीवनाची वास्तविकता, दाहकता, विवशता येथील रोजचा जीवघेणा संघर्ष याची पुरेपूर जाणीव झाली. लवकरच भविष्याचा वेध घेतला. जेवढा काम येथे करतो त्याहीपेक्षा जास्तीचे काम मी धुळ्यात करू शकतो, अधिक प्रगती करू शकतो, आई-वडिलांची सेवा करू शकतो याची जाणीव झाली आणि पक्का निर्धार करून नोकरी सोडली. नोकरी सोडण्याची भीतीदेखील वाटत होती. गावाला परत गेलो तर लोक काय म्हणतील, पुन्हा नोकरी मिळेल का? असे अनेक प्रश्न मनात गर्दी करत होते परंतु निर्धार पक्का होता. मुंबईच्या कॉलेजला शिकविण्याचा अनुभव येथे कामास आला. धुळ्याला येऊन क्लासेस सुरू केले. पाहता पाहता गर्दी वाढतच होती. आणि दोन चार वर्षांतच क्लासेसच्या दुनियेत स्वत:चे नाव निर्माण केले. मुंबईत राहून मर्यादित जीवन जगण्यातून अमर्यादित यशाचा, जीवनाचा मार्ग गवसला. करिअरचा योग्य भव्य-दिव्य मार्ग मुंबईच्या फक्त एका वर्षाच्या अनुभवाने गवसला म्हणून मुंबईला कोटी कोटी प्रणाम.आज मला माझ्या मित्रांना सांगावेसे वाटते की, फक्त मुंबई, पुणे येथेच काहीतरी करता येईल असे नाही तर आपण आहात तेथेच काहीतरी करा. आपल्या गावाला, मातीला कमी लेखू नका. करिअरसाठी मुंबई पुण्याकडे एक पर्याय म्हणून पहा अंतिम संधी म्हणून नव्हे. मुंबई, पुणेच्या विश्वात एक नगण्य व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:च्या गावात स्वत:चे विश्व निर्माण करा. एका नवीन विश्वाचा निर्माता व्हा. तुम्ही आयुष्य कोठे जगला यापेक्षा कसे जगला शेवटी दुनिया हेच पाहणार आहे. माझ्या जीवनातला धुळे- मुंबई- धुळे प्रवास मला अनेक गोष्टी शिकवून गेला. स्वत:कडे आणि गावाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन देऊन गेला म्हणून मुंबईचे शतश: आभार.

देवपूर, धुळे