शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

गावोगावचे धडाकेबाज सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 3:51 PM

ऐन विशीत गावचे सरपंच झालेले काही तरुण आणि तरुणीही. काही थेट लोकांमधून निवडून आलेले. कामाचा दांडगा उत्साह आणि गाव बदलायची ऊर्मी या भांडवलावर हे सरपंच विकासानं गावात मूळ धरावं म्हणून कामाला लागलेत. त्या उमेदीची एक झलक..

- योगेश बिडवई

पुण्यातील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रांगणात एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि महाराष्ट्र सरपंच संसद फाउंडेशन यांच्या वतीने पहिली राज्यस्तरीय तीन दिवसीय ‘सरपंच संसद-२०१७’ अलीकडेच आयोजित करण्यात आली होती. त्या संसदेत भेटलेल्या गावोगावच्या तरुण धडाकेबाज सरपंचांशी गप्पा..

‘कोण म्हणतं, महिला काही काम करू शकत नाही. बाईमाणसानं ठरवलं तर काहीबी अशक्य नाही. बाया रेल्वे चालवतात, विमानं चालवतात, राजकारणात आहेत; मग आपण सरपंच म्हणून का चांगलं काम करू शकत नाही? एकदा का गावाला सोबत घेतलं की समदं काम सोपं होतंय बघा. माझ्या गावात आम्ही लोकसहभागातनं झाडं लावली. सरकारी मदतीतून शाळेचं बांधकाम केलं. गावासाठी काम केलं की गाव बी आपल्या पाठीमागं उभं राहतंया. मी दुसºयांदा सरपंच झाले. आता मी थेट सरपंच म्हणून निवडून आलेय.’

- बीड जिल्ह्यातील पिंपरखेड गावच्या ३७ वर्षींय महिला सरपंच सविता खळगे सांगत होत्या. कोणतीही भीड न बाळगता त्या त्यांचं मन मोकळं करत होत्या. समोर होते जवळपास एक हजार सरपंच आणि उपसरपंच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाही कशी गावपातळीपर्यंत पोहोचली आहे याचं एक रूपच यानिमित्तानं भेटत होतं.

निमित्त होतं पुण्यात झालेल्या सरपंच संसदेचं. पुण्यात एमआयटी विद्यापीठातल्या पद्मभूषण अण्णा हजारे सभामंडपात ८०० सरपंच व ४०० उपसरपंच जमले होते. त्यात अर्थातच तरुण आणि महिलांचा सहभाग जास्त. या तरुण सरपंचांची प्रत्येकाची एक कहाणी आहे. आणि काही कहाण्यांत तर काम करायची धडपड आणि एक प्रामाणिक ऊर्जाही. या संसदेत जमलेल्या सरपंचांना भेटताना ही ऊर्जा जाणवत राहते. त्यापैकीच एक असलेल्या सविता खळगे. सरपंचपदाची ही त्यांची दुसरी टर्म. पण अनुभव आणि आत्मविश्वास असा की जमलेल्या सगळ्यांना त्यांनी आपला उत्साह वाटून टाकला.

तशीच एक खमकी गोष्ट २३ वर्षांची कल्पिता पाटील सांगत होती. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या कल्याणे होळ गावची ती सरपंच आहे. कॉम्प्युटर आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या तिसºया वर्षाला ती शिकतेय.

ती सांगत होती, ‘मी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तहसील कार्यालयात सरपंचांच्या बैठकीला जायचे. तिथं काही पुरुष मंडळी भेटायची. ते सांगायचे, मी या गावचा सरपंच आहे, त्या गावचा सरपंच आहे. पण मग नंतर माझ्या लक्षात यायचं किंवा समजायचं की सरपंच हे स्वत: नाही तर त्यांची पत्नी आहे. असं का असं काही जणांना विचारलं तर ते सांगत, आम्हीच कारभार पाहतो. पण मला वाटायचं की असं का? बायका गावचा कारभार नाही का पाहू शकत? मी सरपंच म्हणून निवडून आलेय तर गावचा कारभार मीच पाहणार. माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली आहे. ते म्हणाले, सरपंचाच्या खुर्चीला मान आहे. तो तूही ठेवलाच पाहिजे. तू गावची प्रमुख आहेस. लोकशाहीत सरपंच महत्त्वाचा आहे. तू त्याची शान कायम ठेव.’

अत्यंत ठामपणे कल्पिता आपले अनुभव सांगत होती. आपलं गाव आदर्श गाव म्हणून घडवायचं हा तिचा ध्यास आहे.महाराष्ट्रातलेच नाही तर अन्य राज्यांतलेही सरपंच या संसदेसाठी आले होते. त्यातलाच एक, गुजरातमधील अहमदाबादजवळील पुंसारी (जि. साबरकांठा) गावचा तरुण सरपंच हिमांशू पटेल. आदर्श गाव म्हणून पुंसारीने देशात नावलौकिक मिळवला आहे. २००६ मध्ये म्हणजे वयाच्या २३ व्या वर्षी हिमांशू सरपंच झाला. आणि गावाचा चेहरामोहरा बदलू लागला. सहा हजार लोकसंख्येच्या या गावात २४ तास पाणी व वीजपुरवठा होतो. प्रत्येक घरात शौचालय आहे. गावात दोन प्राथमिक शाळा, एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पथदिवे, भूमिगत गटार योजना आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गावात वायफाय उपलब्ध आहे. त्यातून गावचा माणूस जगाशी जोडून घेतो आहे. या गावची स्वत:ची वेबसाइटही आहे. साक्षरता त्यानं वाढीस लागली. आता शाळेत विद्यार्थी गळतीचं प्रमाण शून्य आहे. शाळा डिजिटल झाली आहे. आहे हे छोटंसं गाव, पण जगाच्या बदलांशी जोडलं गेलं आहे.

२००६ पासून गावात आतापर्यंत जवळपास १५ कोटी रुपये विकासकामांसाठी वापरण्यात आले. गावाचा हा बदलता चेहरा पाहून गुजरात सरकारने पुंसारी हे आदर्श गाव म्हणून गौरविले. त्यानंतर देशभरातील जवळपास सर्व राज्यांतील सरकारी प्रतिनिधींनी या गावाला भेट दिली. ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचं संपूर्ण संगणकीकरण झालं. पंचायतीने ‘अटलएक्स्प्रेस’ नावाची बससेवा सुरू केली आहे. या गावात ‘कलाम संदेश’ नावाची एक पत्रिका विद्यार्थीच काढतात. त्यात गावातील घटनांची माहिती असते. एकूण हे गाव आधुनिक खेडं म्हणावं असं रंगरूप ल्यालं आहे. आणि मुख्य म्हणजे, सरपंचाने ठरवले तर गावात काहीही अशक्य नाही हेच हिमांशू पटेल वारंवार आपल्या अनुभवातून सांगत असतो.

अशा अनेक तरुण सरपंच कहाण्या या संसदेत भेटल्या. त्यांना मार्गदर्शन करायला, त्यांच्याशी गप्पा मारायला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शून्य खर्चाच्या नैसर्गिक शेतीचा प्रचार करणारे पद्मश्री सुभाष पालेकर, हिवरे बाजार गावाचा कायापालट करणारे पोपटराव पवार, जलसंधारणाचे काम करणारे सुरेश खानापूरकर, निवृत्त सनदी अधिकारी श्याम देशपांडे, पुण्याचे विभागीय महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी, नियोजन आयोगाचे माजी सदस्य खासदार नरेंद्र जाधव अशा अनेक जाणत्या लोकांनी या सरपंचांशी संवाद साधला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. ग्रामसभा ही लोकशाहीची सर्वोच्च ताकद आहे, हे सूत्र अण्णांनी सरपंचांना उलगडून सांगितलं. ग्रामविकास, बदलतं तंत्रज्ञान, शासकीय योजना, अर्थसाहाय्य, शेती, प्रशासन, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सलोखा या विषयांवर अनेक गोष्टींचा उलगडा केला. पण हेच कशाला, ज्यांनी प्रत्यक्षात अनेक योजना आपल्या गावांत राबवल्या त्यातले अनेक तरुण महिला, पुरुष सरपंच आपण योजना कशाप्रकारे राबवल्या, राबविल्या जाऊ शकतात याची माहिती देत होते.

या सरपंचांचं ऐकून घेताना, त्यांचे अनुभव समजून घेताना अनेकांच्या हे लक्षात आलं की गावच्या विकासाची किल्ली सरपंचाकडे असते. सरपंचानं ठरवलं तर गावाचा कायापालट होऊ शकतो, याची झलक या संसदेनं तरुण सरपंचांना दिली. उत्साहाची आणि माहितीची ही लस टोचून घेत गाव बदलाचा इरादा त्यांनी केला तर बदल घडेल, अशी आशा वाटावी असं हे वातावरण होतं. गावातील समस्यांचा आढावा घेणं, त्यावर उपाय शोधणं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करत विविध योजनांची अंमलबजावणी करणं अशी प्रयत्नांची त्रिसूत्र शिदोरीही त्यातून अनेकांना गावली असेल!गावपातळीवर विकासाला वेग यावा म्हणून यासारख्या प्रयत्नांची नोंद म्हणूनच महत्त्वाची ठरते.

२२ वर्षांची सरपंच अंकिता

जिल्हा जळगाव, तालुका अमळनेर, गावाचं नाव लोणसीम. या गावाची २२ वर्षांची सरपंच आहे अंकिता शांताराम पाटील. ती नाशिक येथे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात (संगणकशास्त्र) तिसऱ्या वर्षाला शिकते. सरपंच झाली तेव्हा ती पहिल्या वर्षात शिकत होती. तिचे वडील शांताराम बाजीराव पाटील हे प्रगतिशील शेतकरी, तर आई संगीता या गृहिणी आहेत.ती सांगते, सरपंच झाल्यानंतर पहिले गावात काँक्रीट रस्ते केले. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा आवश्यक होती. ४५ ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला. गावात उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. आता शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुख्य म्हणजे गावातली अंगणवाडी डिजिटल करायची इच्छा आहे, असं अंकिता सांगते.

वस्ती सुधारणा आवश्यकमाझं एक हजार लोकसंख्येचं गाव. थेट सरपंच म्हणून मी निवडून आले आहे. दलितवस्ती सुधारणा कार्यक्रम मला अग्रक्रमाने राबवायचा आहे. सरपंच संसदेत योजनांची माहिती मिळाली. आता गावी गेले की या योजना गावात आणण्यासाठी मी कामाला लागणार आहे.- रंजना कथळकर, सरपंच, दिघी (कोल्हे), अमरावती

सरपंच आणि ग्रामसभा

मी ४२ गावांतील सरपंचांना घेऊन परिषदेत सहभागी झालो होतो. गावाच्या विकासात सरपंचाचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. कोणती योजना कोणता विभाग राबवितो, त्यासाठी कसा पाठपुरावा करायचा याची माहिती सरपंचांना परिषदेतून झाली. एकमेकांच्या मदतीने गाव पुढे जाऊ शकते, त्यासाठी सरपंच आणि ग्रामसभा यांनी विकासाची कास धरली पाहिजे.- शिवा सुरासे, पंचायत समिती सदस्य, खडक माळेगाव, नाशिक

पहिली राज्यस्तरीय सरपंच संसद आम्ही घेतली. केंद्र व राज्य सरकारनेही तिची दखल घेतली. प्रत्येक जिल्ह्यात सरपंचांनी असं अधूनमधून एकत्र यावं. विकासावर, नियोजनावर चर्चा करावी. केवळ सरकारने सर्व करावं या मानसिकतेतून बाहेर येऊन लोकसहभागातून कामं व्हावीत, त्याला सरकारनं हातभार लावावा, हा या परिषदेचा उद्देश आहे. लोकशाहीत गाव हा शेवटचा घटक आहे. सरपंच हा गावाचा प्रतिनिधी आहे. त्याचा दृष्टिकोन विकसित व्हावा, हाच या परिषदेचा उद्देश होता.- राहुल कराडसंयोजक, सरपंच संसदआणि कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणे