शुभा प्रभू साटम
हल्ली ‘वेगन’ हा शब्द तरुण मुलांच्या जगात मोठा चर्चेत आहे. विराट कोहलीनं आपण वेगन झाल्याचं जाहीर केल्यानं तर अनेकांना हे काहीतरी भन्नाट असेल असं वाटू लागलं. तसं पाहिलं तर भारतात पूर्वी दोन ठसठशीत गट होते, शाकाहारी आणि मांसाहारी. नंतर आपल्याकडे हॉटेल्समध्ये जैन फूड मिळू लागलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोशर/हलाल, एमिश असे प्रकार फूड इंडस्ट्रीत रुळले. त्यानंतर आता प्रकर्षाने दिसणारे हे वेगन. तर ही जी वेगन आहारपद्धत आहे ती शाकाहाराची अधिक कट्टर शाखा मानली जाते. ज्यात मांसाहार तर नसतोच पण प्राणीजन्य असे कुठलेही पदार्थ त्याज्य असतात. म्हणजे शाकाहारात गणले जाणारे दूध, दही, मलई, खवा, ताक, पनीर अगदी मधपण निषिद्ध ठरतं. रेशमी वस्त्न, चामडय़ाची उत्पादनंसुद्धा यात वापरणं बंद होतं.आज बहुतांश तरु ण हे या वेगन पद्धतीने आहार घेण्याचं प्रमाण वाढतं आहे. 1944 मध्ये डोनाल्ड वाटसन यांनी हा शब्द आणि चळवळ आणली, जी आता जगभर प्रसिद्ध पावली आहे.इथं एक लक्षात घ्यायला हवं की आजच्या घडीला तरु ण वर्ग हिचा मोठा पुरस्कर्ता आहे. ज्यांना मिलेनिअल म्हणतात, ते म्हणजे 2000 साल सुरू होता होता तरुण झालेली पिढी. हे तरुण तंत्नज्ञान कुशल, टेक्नोसॅव्ही. त्यांच्या जगात इतकी जुनी वेगन चळवळ आता टॉक ऑफ दी टाउन झाली याचं मुख्य कारण हा टेक्नोसॅव्हीनेस. हा वर्ग आपण काय करतो आणि का करतो, हे सांगण्यात पुढं असतो. अस्तित्वात असणार्या नियम/रु ढींपेक्षा वेगळं काही आपण करत असू तर ते सर्व हे तरुण सोशल मीडियावर अहमहमिकेनं शेअर करतात. त्याविषयी बोलतात. त्याचे फायदे सांगतात. त्यामुळं त्या विषयाची क्रेझ वाढीस लागते. अर्थात हा विचार आहे तो शास्त्नीय दृष्टीनं कितपत योग्य, अयोग्य याची कारणमीमांसा केली जातेच असं नाही. मात्र परस्परांचं पाहून तरुण वेगन जीवनपद्धतीचं अनुकरण करताना दिसतात. त्यापलीकडे ही जीवनशैली स्वीकारण्याची कारणं काय असतील? तेही समजून घेतलं पाहिजे. वेगन का?
1. पहिलं कारण म्हणजे हल्ली उपलब्ध असणारी माहिती. हा माहिती तंत्नज्ञान यांचा स्फोट झाला नव्हता तेव्हा अनेकदा अज्ञानात सुख असण्याची परिस्थिती असायची. पण आता कोंबडय़ा कशा वाढवल्या जातात? गायी, म्हशींना अधिक दूध यावं म्हणून कुठली इंजेक्शनं टोचली जातात? हे इंटरनेटवर कळतं तेव्हा नकळत एक भीती मनात मूळ धरते. परत सध्याची जीवनशैली, ताण-तणाव, प्रदूषण असे अन्य घटक आहेतच. या सर्वांना पूर्ण टाळणं शक्य नसतं त्यामुळं मग जे शक्य आहे ते पाहिलं जातं. साहजिकच मग सेफ किंवा कोणतेही धोके नसणारा आहार घेणं याकडे तरुण आकृष्ट होतात. त्यातून मग अशी वेगन आहार पद्धत लोकप्रिय होते.2. दुसरं कारण म्हणजे सोशल मीडिया. आपण किती वर्षे /महिने वेगन आहोत त्याचे काय काय फायदे झालेत? आपण तसे का झालो? इत्यादी अनुभव रोज शेकडोंनी शेअर केले जातात. वाचणार्याच्या मनात कुतूहल जागृत होतं आणि आपणही करून पाहावं म्हणून अनेक तरुण वेगन ट्राय करून पाहतात.3. तरु णांना नवं हवंच असतं आणि नव्या गोष्टीकडे ते आकृष्ट होतात. डाएटच्या अनेक लाटा येतात, विरतात. दरम्यान अनेकजण त्या त्या वेळी त्या लाटांवर स्वार होतात. इथं मी या आहार पद्धतीवर टीका मुळीच करत नाहीये, किंबहुना अन्नावर सरकार/समाजाकडून असणारे किंवा घातले जाणारे निर्बंध निरोगी लोकशाहीचे द्योतक नाहीतच. मात्र केवळ लाट आली म्हणून ती आहार पद्धती आपणही स्वीकारावी का, ती आपल्याला पुरक-पोषक ठरेल का, याचा विचारही तारुण्यानं करायला हवा.4. बदलत्या जीवनशैलीच्या मुळाशी अनेकदा क्रयशक्ती असतेच. म्हणजेच वस्तू विकत घेण्याची, उपभोग घेण्याची आर्थिक क्षमता. वेगन आहार पद्धतीत प्रचलित पदार्थाना जे पर्याय असतात ते बर्यापैकी महाग असतात. उदाहरणार्थ दूध. त्याऐवजी बदाम दूध वापरतात, पनीरऐवजी टोफू असतो. मधाच्या जागी मेपल सीरप असतं. ही काही प्रमुख उदाहरणं. हातात पैसे असणारी माणसं असे पर्याय स्वीकारून पाहतात.5. साधारण वीसेक वर्षे आधी बॅड कोलेस्ट्रॉल, ट्रिपल रिफाइंड तेल, ऑलिव्ह तेल यांचा प्रचंड बोलबाला होता. लोकांना परवडत नसूनही तेलं विकत घेतली जायची. आता आपण परत खोबरेल/तीळ तेल, तूप या पारंपरिक गोष्टींकडे वळत आहोत, डाएट लाटा या कशा काम करतात हेदेखील एक कारण आहे की माणसं आहार बदलून पाहतात.6. लोकांनी काय करावं, काय खावं, कसं खावं, कुंठ जावं, काय घालावं या आणि यासारख्या असंख्य गोष्टींवर आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्णय घेतले जातात. नंतर ते पद्धतशीर रीतीने पसरवले जातात. मार्केटिंग आणि जागतिकीकरणाचे परिणाम थेट आपल्या ताटार्पयत येऊन पोहोचले आहेत हे विसरता कामा नये, एवढंच!
( लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)