लग्नाची खरेदी म्हटली की तीन प्रश्न सहज विचारले जातात.
मुलीचा शालू किती हजारांचा?
मुलाचे कपडे कितीत गेले?
दागिने किती तोळ्याचे केले?
त्या शालूचा रंग, त्यावरची डिझाइन, दागिन्यांची डिझाइन हे सगळं नंतर. शालू जितका महागडा तितके त्या शालूचे चर्चे मोठे!
पण आता गेले ते दिवस असंच म्हणण्याची वेळ आली आहे.
म्हणजे काय?
लग्नातल्या कपडय़ांचं महत्त्व कमी झालंय असं नव्हे, उलट ते पूर्वीपेक्षा कितीतरी वाढलं आणि महागलंही आहे. पण आता टिपिकल शालू, तीच तीच शेरवानी, त्यात त्या पाटल्या-बांगडय़ा-नथ-वैशाली हार-पोहे हार यासारखे पारंपरिक दागिने आताच्या मुला-मुलींना नकोसे झालेत.
त्यांना लग्नाच्या दिवशी स्पेशल दिसायचं असतं. आणि इतकं स्पेशल की जसे सेलिब्रिटी त्यांच्या लग्नात दिसतात. इतकं सुंदर की जसं आयुष्यात पुन्हा कधीच दिसणार नाहीत, दिसले नाहीत.
पण मग त्यासाठी स्पेशल डिझायनर साडी, त्याला मॅच होणारे दागिने असं काहीतरी हटके हवंच! पण या हटक्याचं स्वप्न पूर्ण करायचं तर मग किंमतही तितकीच मोजावी लागते.
घोडं अडतं ते इथंच!!
पैशाचे सोंग आणता येत नाही म्हणत काहीजण गप्प बसतात. पण आता असं मन मारणा:यांचा जमाना गेलाय. आता अनेक मुलंमुली म्हणताहेत की, जे आपल्याला आवडतं आणि महागडं आहे, आणि एकदाच घातलं तरी चालणारे ते विकत घ्यायची काय गरज आहे, भाडय़ानंही आणता येईल!!
आणि हाच यंदाच्या लग्नसराईचा सगळ्यात मोठा ट्रेण्ड आहे.
जे आवडतं आणि लग्नात घालायचं आहे, ते प्रचंड पैसे खर्च करून विकत न घेता अनेकजण आता तो तामझाम भाडय़ानं आणताहेत!
लग्नासाठीची डिझायनर साडी, ड्रेस, लाछा, घागराचोली हे सारं आता भाडय़ानं मिळतंय. जे ड्रेसच्या बाबतीत तेच दागिन्यांच्या बाबतीतही. सर्व प्रकारचे आणि डिझाइन्सचे दागिने, सिनेमात वापरली गेलेली, महागडी अॅण्टिक पद्धतीची हेवी ज्वेलरीसुद्धा आज भाडय़ानं मिळते आहे. लग्नासाठी एखादा हि:याचा दागिना घ्यायचा म्हटला तरी तो परवडेल की नाही याचा विचार करावा लागतो. पण या ट्रेण्डमध्ये हि:याच्या दागिन्यांपासून वेल डिझाइन अशी इमिटेशन ज्वेलरी स्वस्तात घालायला मिळते. मग मन मारून जगण्यापेक्षा भाडय़ानं आणून घाला असं म्हणत अनेक तरुणतरुणी हा ‘रेण्ट’वाला पर्याय सहज स्वीकारत आहेत.
या रेण्टवर आणण्याच्या ट्रेण्डमुळे पैशासोबत वेळही वाचतो. आपल्या चॉइसचे कपडे आणि दागिने बुक करण्यासाठी शंभर दुकानं फिरण्याची गरज नसते. यांची माहिती देणारे अॅप्सच आता डेव्हलप झाल्यामुळे हातातल्या मोबाइलमधूनच कपडे, दागिन्यांच्या डिझाइन्सबरोबर ते कुठे उपलब्ध होतील याची माहितीही क्षणात मिळते. हे कपडे आणि दागिने अगदी घरपोच येतात. ते प्रत्यक्ष घालून तपासता येतात. पटले नाही तर परत पाठवताही येतात.
एरवीचा लाखो का मामला हजारात उरकून टाकणारा, लग्नाच्या दिवशी स्पेशल दिसण्याचं फील मिरवू देणारा हा नव्या मानसिकतेचा ट्रेण्ड. अनाठायी इमोशनल न होता आणि वस्तूंचा सोस न करता तो मोमेण्ट जगून घेण्याचा हा एक नवा प्रॅक्टिकल अॅप्रोच आहे.
म्हणून तर मनभरून जगण्याची वृत्ती म्हणून या ट्रेण्डकडे पाहता येऊ शकतं!
- प्राची खाडे फॅशन स्टायलिस्ट
( मुलाखत आणि शब्दांकन- माधुरी पेठकर)