यश आपणा सर्वानाच हवं असतं! आपापल्या स्वभावानुसार, आपापल्या परिस्थितीनुसार आपण यशाचा पाठलाग करत असतो. त्यात काहीच वावगं नाही! परंतु यशाचा हा ध्यास धरताना आपण आपली मूल्ये वापरतो का? आपला प्रत्येक निर्णय आपल्या मूल्यांना अनुसरून असतो का?
फार विचार करू नका, आपण सर्वच जण आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या नीतिमूल्यांना अनुसरून जगतो. काहींना व्यावसायिक प्रगती फार महत्त्वाची वाटते, तर काहींना कौटुंबिक जीवन जास्त महत्त्वाचं वाटतं. एखाद्याला प्रसिद्धीचा ध्यास असतो, तर एखाद्याला संपत्तीचा. जेव्हा आपले व्यावसायिक निर्णय आपल्या या मूल्यांशी निगडित असतात, तेव्हा आपण करत असलेल्या कामातून आपल्याला एक प्रकारचं आंतरिक समाधान लाभतं. पण तसं नसेल आणि तरीही आपण ते काम केलं तर आपलं मन आपल्याला खातंच. गिल्टी वाटतं.
आपले व्हॅल्यूज आणि एथिक्स हे आपलं व्यावसायिक आयुष्य घडवण्यासाठीही फार महत्त्वाचे ठरतात.
सॉफ्ट स्किल्स शिकताना आणि इतरांशी जुळवून घेताना आपण स्वत:शीही जुळवून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळेच आपण आपल्याशीच पडताळून पाहायचं असतं की, आपली मूल्यं कुठली आहेत?
आपल्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अर्थात, हा विचार करताना स्वत:ला लगेच न्यायाधीश करू नका, जे वाईट आहे स्वत:त ते नाकारू नका.
फक्त आपल्याला काय महत्त्वाचं वाटतं याची एक माहिती घ्या.
त्यासाठीच ही एक यादी.
त्या प्रश्नांची खरीखरी उत्तरं द्या. म्हणजे त्यातून तुम्हालाच स्वत:चा एक अंदाज यायला मदत होईल. अर्थात हा एक अंदाज आहे. त्याचं बोट धरून तुमची मूल्यं तुमची तुम्हालाच ओळखायची आहेत.
या यादीतून तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या वाटणा:या पाच गोष्टी क्रमवार लिहा. तुमच्या मूल्यांचा तुम्हालाच एक अंदाज नक्की येईल!
तुम्हाला काय काय
महत्त्वाचं वाटतं?
* इतरांना मदत करणं.
* गटामध्ये किवा सांघिक पद्धतीनं काम करणं.
* इतरांना आपलं सामथ्र्य दाखवणं.
* एकांतात काम करणं.
* इतरांपेक्षा बुद्धिमान किंवा तज्ज्ञ म्हणून ओळखलं जाणं.
* नवीन किंवा सर्जनशील पद्धतीने काम करणं.
* जलद गतीनं काम करणं.
* चोख व अत्यंत अचूक असं काम करणं.
* जॉब सिक्युरिटी असलेल्या ठिकाणी काम करणं.
* इतरांच्या कामावर देखरेख करणं.
* धाडस व शौर्य आवश्यक आहे अशा प्रकारचं काम करणं.
* काम कशा पद्धतीनं करावं याचं स्वातंत्र्य असणं.
आता स्वत:ला तपासा
तुमच्या हाताशी जर तुम्हाला महत्त्वाच्या वाटणा:या पाच गोष्टी असतील तर यापुढचं पाऊल म्हणजे तुम्ही सध्या करताय त्या कामात या पाच गोष्टींचा वापर होतोय का हे तपासा!
तुमच्या नोकरीत ही मूल्ये प्रकट होतात का, त्यांचा योग्य वापर होतो का?
होत असेल तर त्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे कशा वापरता येतील याचा विचार करा.
नसतील तर मग आपलं काय चुकतंय, हे शोधा. उत्तर दुस:या कुणाकडेच नाही, तुमच्याकडेच फक्त सापडेल!
- समिंदरा हर्डीकर-सावंत