गावी जाऊन करणार काय?
या प्रश्नाचं काहीच उत्तर ‘त्यांच्या’ हातात नाही.
आणि समोर उभे आहेत कोरडेठाक, रणरणत्या उन्हाचे दोन परीक्षा पाहणारे महिने.
विद्यापीठातल्या पुस्तकी परीक्षा परवडल्या पण जगण्याच्या परीक्षेनं असा काही घोर लावलाय की, त्याची उत्तरं शोधता सापडत नाहीत.
आणि गावी जाऊन तर ती उत्तरं अजिबात सापडण्याची शक्यता नाही.
त्यामुळे वर्षभर जिची वाट पाहावी त्या सुट्टीची चैन काही ‘त्यांच्या’ वाटय़ाला येत नाहीये.
पुस्तकं बासनात बांधून घरी जावं, मनसोक्त उंडरावं, झोपा काढाव्यात, मित्रंसोबत गप्पा मारत रानोमाळ भटकावं आणि घरच्यांसोबत राहत, वर्षभर पुरतील एवढे खायचे, प्यायचे लाड करून घ्यावेत, अशी चंगळ असलेली उन्हाळी सुट्टीच गेली तीन-चार वर्षे या तरुण मुलांच्या वाटय़ाला यायला तयार नाही.
आणि यंदा तर उन्हाचा कहर, पैशाची कडकी आणि दुष्काळाची तलखी अशी काही की, गावी जाऊन करायचं काय हाच प्रश्न अत्यंत छळकुटा आहे.
एकतर प्यायच्या पाण्याचे हाल. शेतात ढेकळं. पैशाची चणचण प्रचंड. आणि मग भर उन्हात रानोमाळ नुस्त्या उनाडक्या करायला घरी जायचं तरी कशाला, त्यापेक्षा आपल्या पुढच्या शिक्षणासाठी चार पैसे कमवू, त्यातलेच थोडे जमले तर घरी पाठवू असं म्हणत, अनेकजण पुण्यातच राहून कामं शोधू लागली आहेत.
ही आहे दुष्काळापासून दूर पुण्यात असलेल्या पण दुष्काळात पुरत्या होरपळणा:या मराठवाडय़ातल्या आणि विदर्भातल्याही तरुण मुलांची कथा!
अनेकजण आता पुण्यात असले, पदवी किंवा पदवीत्युत्तर शिक्षण घेत असले, तरी त्यांनाही घरची जबाबदारी टाळता येत नाही. एरव्ही वर्षभर आई-वडील पदराला खार लावून, स्वत: जीवतोड काटकसर करून या मुलांच्या शिक्षणासाठी आणि पुण्यात राहण्या-जेवण्यासाठीच्या खर्चापोटी पैसे पाठवत राहतात. आता वर्ष संपलं, काहींच्या परीक्षा संपल्या. काहीजणांच्या अजून सुरू आहेत. पण आपल्या दुष्काळानं भेगा पडल्या गावाकडच्या हालअपेष्टांच्या जगण्यात अजून कुठं खाण्याच्या तोंडाची भर घालायची, असा प्रश्न या मुलांना घेरतो आहे.
म्हणून मग अनेकजण ठरवताहेत की, घरी जाऊन रिकामटेकडं बसण्यापेक्षा पुण्यात राहून मिळेल ते काम करू. आई-बाबांना हातभार लावू. पुढील शिक्षणासाठी पैसे गोळा करू. आणि म्हणून आत्ताच कुठं कुठं फिरत, संपर्क करत अनेक मुलं मिळेल ते काम स्वीकारत आहेत.
त्यासाठी ओळखीपाळखीच्या लोकांच्या हातापाया पडतात, कुठकुठून ओळखी काढतात आणि मिळेल ते काम, मिळेल त्या पैशात करायला तयार होताहेत. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या गंभीर स्थितीचा सामना आपल्यापरीनं जिद्दीनं ही मुलं करत आहेत.
पुण्यात विद्यापीठात शिकणारे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हे विद्यार्थी. वर्ष संपलं, होस्टेलमध्ये राहायची मुदतही संपली. म्हणून मग अनेकांनी 5-7 जणांचे ग्रुप करत एकेक खोली कुठंकुठं भाडय़ानं घेतली. मेस लावली. काही मेसवाले कनवाळू, महिनाभर तेही पैशासाठी थांबतात. त्यामुळे महिनाभर जेवणाची सोय होऊन जाते. काही तिथंही पैसे वाचवत रूमवरच चहा-बिस्किट, खिचडी करून एकेकदा खातात. वाचलेल्या पैशातून काही पैसा घरीही पाठवतात.
या मुलांची ही अवस्था पाहून यंदा विद्यापीठानं ‘कमवा आणि शिका’ योजना उन्हाळी सुट्टीतही चालू ठेवली आहे. त्या योजनेत काही विद्यार्थी काम करून आपला पुण्यात राहण्याचा खर्च भागवतात. मात्र दुष्काळानं घेरलेल्या घरच्यांनी पैसे पाठवणं बंद केलंय कारण त्यांच्याही हाती पैसा नाही. आणि इकडे केवळ कमवा व शिका योजनेतून मिळणा:या पैशात भागत नाही. त्यामुळे मग ऑफिस बॉयपासून ते कॉल सेंटर्पयत आणि कुठं डीटीपी ऑपरेटर ते थेट सिक्युरिटी गार्ड होण्यार्पयत मिळेल ते काम हे विद्यार्थी स्वीकारत आहेत.
विशेष म्हणजे आपण शिकतोय काय, आपलं स्वप्न काय, असा काही पोरकट विचार न करता आत्ता आपली गरज भागते आहे तर मिळेल ते काम करू, असा विचार करत न लाजता परिस्थितीला हिमतीनं भिडणा:या या तरुण मुलांची जिद्द आणि मेहनत त्यांच्याशी बोलताना जाणवत राहते.
लातूर, नांदेडसह मराठवाडय़ातून, यवतमाळ, चंद्रपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, अहमदनगर, नाशिक या सा:या परिसरातून आलेल्या आणि सध्या पुण्यात काम शोधणा:या, सुट्टी विसरून पुढच्या फीची आणि खर्चाची तरतूद करणा:या या मुलांशी बोलताना सतत जाणवत राहते त्यांची जिद्द. संघर्ष करायची तयारी. अनेकांच्या गावी दुष्काळानं प्यायला पाणी नाही, हातात पैसे उरलेले नाहीत आणि गावात जाऊन करावं असं काही समोर दिसत नाही; पण म्हणून आपल्यापुरताच विचार करूनही चालत नाही. आपण पुण्यात राहू, आपल्यापुरतं कमवू इतपत स्वार्थी टप्पाही अनेकांना परवडणारा नाही किंवा तो ऑप्शनच नाही. कारण या तरुण मुलांना गावाकडच्या नातेवाइकांचे आणि मित्रंचे सतत फोन येत आहेत. तिकडे राहणारे पण सध्या हाताला काहीच काम नसणारे अनेकजण या पुण्यात शिकणा:या मुलांना फोन करताहेत. आम्ही पुण्यात येतो, आमच्यासाठी काम बघ, तुङयासोबतच राहायची काहीतरी सोय कर असं म्हणत आग्रह करताहेत.
काहीजण तर येऊन धडकलेही आहेत.
त्यामुळे मग स्वत:सह या गावाकडून आलेल्या, तुलनेनं कमी शिकलेल्या यारदोस्तांसाठीही कामाची सोय पाहावी लागते. ओळखीपाळखी वापरून त्यांना कुठंतरी चिकटवावं तर लागतं आहेच, पण स्वत:च्या रूमवर राहाण्याची सोयही करून घ्यावी लागतेय. आपल्या माणसांची गरज नाही भागवायची तर गावात तोंड कसं दाखवायचं म्हणत ही समान वेदनांचे दिलवाले सारं काही शेअर करताना दिसतात.
भल्यासकाळी अनेकांचा दिवस सुरू होतो. कधी रात्री जागून, कधी दिवसा कॉम्प्युटरचे क्लास लावून तर कधी एकदा उपाशी राहून सध्या या टेम्पररी नोक:या केल्या जात आहेत. त्यातून जे पैसे मिळतात त्यातले काही घरी पाठवले जातात. त्या पैशांसोबत निरोपही जातो, माझी काळजी करू नका, माझं बरं चाललंय!
गावाकडचा दुष्काळ असा पुण्याच्या पेठांमध्ये राबताना दिसतोय. कष्टानं, जिद्दीनं आपल्या परिस्थितीचा सामना करतोय.
घराची आठवण तर येतेच, पण त्या आठवणीनं गलबलून यायला वेळ कुणाला आहे?
त्यापेक्षा काळीज कठोर करत, प्रॅक्टिकल होत, यंदा सुटीत पुण्यातच म्हणत राबणं तेवढं अनेकांच्या वाटय़ाला येत आहे.
- राहुल शिंदे
विद्यापीठात पीएच.डी. करणारा शांतेश्वर वाघमारे
तो सांगतो, कालच मला चुलत भावाचा फोन आला. तो कामाबाबत विचारत होता. गेल्या आठवडय़ात ओळखीचीच चार ते पाच मुलं पुण्यात आली आहेत. कामासाठी वणवण भटकत आहेत. ते मागे लागलेत, काम बघ! त्यात आता काहींचे फोन, कोणतंही काम बघं,आम्ही पुण्यात यायला निघालो आहे. कसं बघणार, कुठं मिळणार काम, टेन्शनच येतंय!
***
उस्मानाबाद जिल्ह्यातील विशाल कदम
गेल्या दोन वर्षापासून पुण्यात शिकतोय. भीषण दुष्काळामुळे तो सुटीत गावी तर गेला नाहीच, पण पुण्यात ऑफिस बॉयची नोकरी स्वीकारून घरच्यांना मदत करण्याचं ठरवलं. विशाल म्हणतो, दुष्काळ हा आमच्या पाचवीलाच पूजलाय. घरची चार एकर शेती आहे. पण, पाण्याआभावी पीक काढता येत नाही. घरी आई-वडील, एक भाऊ आणि एक बहीण आहे. त्यांच्याकडं कसे पैसे मागणार. मग होते तेवढय़ा पैशात भागवलं. एक वेळ उपाशी राहून आठवडाभर नोकरीसाठी वणवण भटकलो. त्यानंतर नोकरी मिळाली. बहिणीच्या लग्नासाठी घरच्यांना थोडी मदत व्हावी म्हणून मी काम करतो आहे. मित्रंनी भाडय़ाच्या खोलीत राहण्यासाठी जागा दिली. चाललंय आता काम. थोडा पाऊसपाणी झाला की, मग घरी एक चक्कर मारून येईल!
***
यवतमाळ जिल्ह्यातील रूपेश पाईकवार
विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतो आहे. घरी शेती नाही. आई-वडील मजूरी करतात. दुष्काळामुळे गावाकडे कामधंदा नाही. इकडे विद्यापीठाच्या ‘कमवा व शिका’ योजनेत तो काम करतो आहे. त्यातून दोन वेळच्या जेवणानाचा खर्च सुटतो. त्यातूनही काटकसर करत तो पुढील शिक्षणासाठी लागणारी रक्कम जमा करतो आहे.
***
परभणी जिल्ह्यातल्या एका छोटय़ा गावचा विशाल मुंदडा
तो सांगतो, माङया गावाकडे दहा दिवसानंतर नळाला पाणी येतं. शेतीसाठी पाणी ही तर लांबची गोष्ट. सध्या गावात कधीमधी टॅँकर येतोय हेच फार आहे. तिथं कुठं अडचणी वाढवायला जायच्या? त्यामुळे गावी न जाता मी उन्हाळाच्या सुट्टीत पुण्यातच काम करण्याचं ठरवलं आहे. विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेत पण काम करतोय. पण त्यातून मिळणारी रक्कम खूपच कमी आहे. त्यामुळे सध्या मी दुसरंही काम शोधतो आहे. सुट्टीत जमेल तेवढे पैसे कमवून ठेवतो, म्हणजे पुढच्या वर्षासाठी घरच्यांकडे पैसे मागायला नकोत.
एटीएमचे अभ्यासू रखवालदार!
शिक्षण पूर्ण झालं पण त्या पदवीच्या जिवावर नोकरी मिळत नाही. आणि त्यातही शासकीय नोकरी मिळवायची तर स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाही. लाल दिव्याच्या गाडीच्या ध्येयानं गाव सोडलं पण ते ध्येय काही पूर्ण होत नाही. त्यात घरची परीस्थिती चांगली नाही. आणि कहर करायला चार वर्षापासूनचा दुष्काळ आहेच सोबतीला. पैसा आणायचा कुठून?
म्हणून मग अनेक विद्यार्थी रात्री काम करून दिवसा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. त्यातही रात्री काम, नाइट मारताना अभ्यासासाठी वेळ मिळाला तर उत्तमच.
मात्र अशी ‘शांत’ नोकरी कोण देणार?
म्हणून मग अनेकांनी शहरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरी मिळवली आहे. ‘एटीएम’मध्ये एसीत, शांतपणो बसत दिवसा आणि रात्रीही अभ्यास करता येणं शक्य आहे हे अनेकांनी ताडलं. सावलीत, एसीत एकीकडे अभ्यास, दुसरीकडे नोकरी हे कॉम्बिनेशन चांगलं वाटलं नसतं तरच नवल. म्हणून सध्या एटीएमचे सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला अनेकजण पसंती देत आहेत.
कमवा, शिकाला सुट्टी नाही!
दुष्काळी भागातल्या या मुलांचे प्रश्न, त्यांची आर्थिक चणचण लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठानं चालू शैक्षणिक वर्षात कमवा व शिका योजना कोणताही खंड पडू न देता सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठातच नव्हे तर विद्याथ्र्याना त्यांच्याच महाविद्यालयात काम करता यावं, या उद्देशानं मार्चपासूनच विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातही कमवा व शिका योजना सुरू ठेवण्यात आली आहे. सुट्टी असली तरी या योजनेला सुट्टी देण्यात आलेली नाही. पुणो, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील सुमारे 3क् ते 35 महाविद्यालयांत ही योजना सुरू आहे. शेकडो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.
-डॉ. संजयकुमार दळवी,
संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळ,
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ
( राहुल लोकमतच्या पुणो आवृत्तीत वार्ताहर/उपसंपादक आहे.)