उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब... या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं.गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७००हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे.म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल..त्यातला हा पाचवा प्रश्न : तुम्ही काय वाचता? वाचनाचा उपयोग काय? वाचलंच नाही तर कळेल कसं?वाचन आपल्याला भरकटू देत नाही, रस्ता दाखवंतच!ऐन दुपारी, रिकाम्या रस्त्यावर भटकत असताना आणि दूरदूरपर्यंत कोणीच नजरेत नसताना जेव्हा अचानक एखाद्याने येऊन तुम्हाला लिफ्ट दिली तर जी कृतज्ञतेची भावना वाटते तशीच मला पुस्तकांबद्दल अनेकदा वाटली आहे. माझ्या जवळपास प्रत्येक निर्णयप्रक्रि येत मी भटकलोय की काय असं वाटताना वाचनानं कधीतरी दिशा दाखवली आहे.इंजिनिअरिंग झाल्यावर थोडा वेगळा अनुभव घेण्याची प्रेरणा मला ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकानं दिली. मी बाबा आमटेंच्या श्रमसंस्कार शिबिराला रवाना झालो. अनिल अवचटांचं ‘कार्यरत’ किंवा रश्मी बन्सलचे ‘आय हॅव अ ड्रीम’ ही दोन पुस्तकं वाचली. आणि मला जॉब सोडून कचऱ्याच्या प्रश्नावर काम करण्याचा निर्णय घेण्यासाठी ती पूरक ठरली. वडिलांच्या आजारपणात त्यांच्याबरोबर बसून विनोबांचे ‘गीता प्रवचन’ वाचल्यावर आम्हा दोघांनाही लढण्याची एक नवी शक्ती मिळाली होती.भगत सिंग यांना फाशीसाठी बोलावलं गेलं, तेव्हा त्यांनी लेनिनचं पुस्तक संपेपर्यंत थोडा वेळ थांबायला सांगितलं होतं. त्यांच्या ७१६ दिवसांच्या कैदेत त्यांनी जवळपास ३०० पुस्तकं वाचली. त्याच्या जयंतीदिनी जन्म घेतलेल्या मला वाचनाच्या आवडीने भारावून टाकलं नसतं तर नवलच. माझ्यासाठी वाचन म्हणजे मनाचा व्यायाम. म्हणून वाचन नुस्तं वेळ घालवण्यासाठी केलेलं नसावं. ते वेळ काढून केलेलं असावं.आता वाचन करायचं असं ठरवलं तरी ते काय आणि कुठं वाचायचं हा प्रश्न उरतोच. इंटरनेटच्या आभासी जगात एका वेबसाइटवर काहीबाही वाचत बसलं की लगेच दुसऱ्या वेबसाइटची लिंक टक लावून बघत उभी असते. जाहिरातींच्या जमान्यातलं हे एक वश करणारं जाळं आहे. यात आपण हरवून जायचं का? तर नाही. मग यावर तोडगा म्हणून मी जास्तीत जास्त पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करतो. कारण ती आपल्याला भटकत न ठेवता उलट रस्ता शोधायला मदत करतात. पुस्तकं सकाळच्या चहासारखी असतात. ती गोड पण आवडतात, कडक असलेली पण आवडतात आणि ती अनुभवल्यानंतर मेंदूला तरतरी येते. पुस्तकांचं वाचन म्हणजे माझ्यासाठी डोळे उघडून जगाकडे पाहायला लावणारी प्रक्रिया आहे.माझे बरेचसे निर्णय वाचनामुळे प्रभावित झालेले असणं ही मोठी गोष्ट आहे. ज्यांच्या पुस्तकांनी मला नजर दिली, विचार दिले त्या लेखकांना मी कधी भेटलोसुद्धा नाही. (आणि कदाचित कधी भेटणारही नाही.) पण त्यांनी लिहिलेल्या एखाद्या पुस्तकातील एखाद्या परिच्छेदाने माझ्या आयुष्याची दिशा बदलली असेल! बदल घडवणारं वाचनाइतकं मोठं दुसरं कोणतं माध्यम असेल याची मला शंका आहे...- विवेक पाटीलनिर्माण ६वाचनाशी ‘मैत्र’जे मिळेल ते वाचावं, त्यातून काहीतरी मिळतंच!मी आठवी-नववीला होतो. अभ्यासक्र मात डॉ. आनंद यादवांच्या ‘झोंबी’ या कादंबरीतील उतारा होता. तो उतारा माझ्या रोजच्या जगण्याच्या एकदम जवळचा असल्यामुळं मला खूप भावला होता. तो उतारा मी ५-६ वेळा तरी वाचला असेल. एका गरीब घरातला मुलगा शिकायचं म्हणून वडिलांविरोधात बंड पुकारतो. ते त्याला शिकायला नाही म्हणतात, मारझोड करतात. तरीही तो त्याच्या मतावर ठाम राहतो. घरातून पळ काढतो. रस्त्यावर झोपतो, केळींच्या साली खाऊन दिवस काढतो. शिकून मोठा माणूस होतो.ही कथा माझी प्रेरणा बनली. मीही घरची परिस्थिती कशीही असली तरीही, कितीही कामं करावी लागली तरीही शिकणं सोडणार नाही हे मनोमन ठरवलं. तेव्हापासून वाचनाची गोडी निर्माण झाली. चंपक, चांदोबा, अकबर-बिरबल, श्यामची आई वाचून काढलं. नंतर मैत्र (आॅक्सिजन पुरवणीचं पूर्वीचं नाव) पुरवणीचा मला शोध लागला. ‘मैत्र’ वाचता वाचता, खुणा करत करत मुद्दे काढण्याचा, पुरवणी संग्रह करण्याचा छंदच लागला. मैत्रमुळे आयुष्याकडे सकारात्मकतेने बघण्याचा मला दृष्टिकोन मिळाला. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत काही ना काही तरी चांगलं असतंच हा मूलमंत्र ‘मैत्र’ने मनात रुजवला. वाचनामुळे माझ्यामध्ये काहीतरी करण्याची एक अनामिक शक्ती निर्माण होतेय असं वाटायला लागलं. वाचनाने मला विचार करायला शिकवलं, केलेले विचार तपासायला शिकवलं. लिहायला भाग पाडलं. काहीतरी हालचाल करायला भाग पाडलं. वाचनामुळे हळूहळू मला माणसं समजायला लागली. हे जग इतकं काही वाईट नाहीये जितकं की इतर लोक सांगतात हे पुस्तकांकडून कळलं. पुस्तकांनीच मला प्रेम करायला शिकवलं. स्वत:वर, निसर्गावर, जगण्यावर, सगळयांवर..! पुस्तकांनीच मला बिनधास्त जगायला शिकवलं.एक होता कार्व्हरनं संकटांच्या छाताडावर उभं राहून जगण्याचं मजबूत निशाण रोवण्याचा निर्धार दिला. प्यापिलॉनने कशाही परिस्थितीत मार्ग निघतोच असा मोलाचा सल्ला दिला. ‘कार्यरत’ने जगण्याच्या जवळ जाणाऱ्या सच्च्या माणसांचं दर्शन घडवलं, तर वपुंच्या महोत्सवने जगण्याचाच महोत्सव साजरा करायला भाग पाडलं. भ्रष्टाचाराने पिचपिचलेल्या या व्यवस्थेत काम करताना प्रामाणिक माणसाचा कसा अर्जुन होतो व त्यावर कसं काम करावं हे आपण सारे अर्जुनने बिंबवलं. सकाळी पेपर टाकणारा मुलगाही या देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो, हे प्रभावी अंजन वाचनानेच डोळ्यांत घातलं. कोणत्याही चौकटीत अडकू नकोस, आकाशासारखा मुक्त हो, जगण्यावर स्वार हो असा आत्मविश्वास वाचनाने मला मिळाला. माओ, ओशो, राज्यक्र ांत्या, लेनिन, कामगार, बाबा आमटे यांची ओळख वाचनातून झाली. म्हणून मला वाटतं जे हाती लागेल, जे मिळेल ते वाचावं. काहीही वाचलं तरी त्यामधून आपल्याला काही ना काहीतरी नक्कीच शिकायला मिळतं. वाचन हेच मग करमणुकीचं साधन बनतं. मग वेगळ्या करमणुकीची गरजच पडत नाही...!- धीरज वाणी, निर्माण ६मेंदूला रसदवाचन ही ढीगभर पुस्तके वाचून संपवणं एवढी मर्यादित गोष्ट नसून ती खरंतर मनुष्याला विचार करायला लावणारी प्रक्रि या आहे. जे वाचन मला चिंतनाला प्रवृत्त करेल आणि ज्याला उच्च विचारनिर्मिती मूल्य आहेत ते माझ्यासाठी उत्तम वाचन असं मी म्हणेन. माझ्या वैचारिक जडणघडणीमध्ये अशी पुस्तके माझ्यासाठी ‘रसद’ म्हणून काम करतात.नेमाडेंनी म्हटल्याप्रमाणे ‘गुरे जशी चरत चरत चांगल्या गवताळ कुरणाकडे जातात, तसेच वाचकही चांगल्या पुस्तकांकडे आपसूक वळतात’.नवीन दृष्टिकोन मांडणं आणि आधीच असलेल्या दृष्टिकोनाला नवीन आयाम देण्यासाठी सद्यस्थितीत तरी वाचनाला पर्याय नसावा.- विशाल राठोड,निर्माण ७
तुम्ही काय वाचता?
By admin | Published: May 04, 2017 7:35 AM