निर्माण आणि ऑक्सिजन
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरंतर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं.
गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७०० हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे.
म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल..
त्यातला हा पाचवा प्रश्न : तुम्ही काय वाचता? वाचण्याचा उपयोग काय?
रिडिंग किडा
मला विचारा, वाचून मला काय मिळतं?
वाचन करायचं, चांगलं वाचायचं, हे महत्वाचं.
पण त्यात नियमित वाचन करणं हे जास्त महत्वाचं वाटतं. नव नवीन शैलीच्या पुस्तकांशी ओळख करणं, अभ्यासक्र मात असलेली पुस्तकं सोडून इतर वाचनानं वेगवेगळे विषय एक्सप्लोअर करणं म्हणजे चांगलं वाचन!
इतर शब्दाचा इथे उल्लेख महत्वाचा कारण डॉक्टरी पेशामध्ये असताना मला इतर विषय, जसे पर्यावरण, राजकारण, बाल साहित्य इत्यादी विषयांची माहिती असणं आॅपशनल नव्हे तर गरजेचे आहे. आणि त्या करता मी वाचायला हवं. तोच एक बेस्ट आॅप्शन आहे. मग ते पुस्तक असो किंवा न्यूज पेपर किंवा मासिक.
अर्थात मला आवडलेलं पुस्तक तुम्हाला आवडेलच असं काही नाही. पण म्हणून तुम्ही जे वाचता ते वाचून तुमचा उगाच वेळ वाया गेला का?
तर नाही! कारण प्रत्येक वाचनातून तुम्हाला नवा अनुभव येतो, नवीन शब्दांची ओळख होते आणि नवीन प्रसंग ही वाचायला मिळतात.. म्हणून वाचन ही गोष्ट वाया जात नाही.
पण मुद्दा असा की आपण काय वाचावं हे कसं ठरवता येतं. मी कसं ठरवते?
त्याची ही एक माझी यादी.
1. निर्माणच्या वेबसाइटवर काही उत्तम पुस्तकांची यादी आहे.
2. मित्र मैत्रिणींच्या वाचनात आलेली पुस्तक. त्यांच्याकडून कळतात ती पुस्तकं.
3. एका पेक्षा अधिक भाषेमध्ये वाचन करणं!(मी निर्माणमध्ये आल्यावरच मराठीकडे वळले आणि मराठीमध्ये देखील फिक्शन नॉन फिक्शनआणि इतर विषयातील एवढं समृद्ध लिखाण झाले आहे हे मला कळलं.)
4. नियमीत वाचणं. नव वर्षाच्या संकल्पात अनेकजण म्हणतात की पुस्तक वाचन वाढवीन. पण किती व कोणती पुस्तकं वाचायची ते ठरवणं व ते पूर्ण करणं महत्वाचं.
5. माझ्या जवळच्या लोकांना पुस्तकं भेट म्हणून देणं.
वाचनाचा मला झालेला उपयोग.
1. भाषेबद्दल प्रेम वाढलं!
2. सर्व भाषांबद्दल आदर वाढला. सर्व भाषा श्रेष्ठ आहेत हे कळलं. ( मी इंग्रजी, मराठी, हिंदी या भाषांमधे वाचन करते.)
3. माझी भाषा समृद्ध झाली. (लेखी आणि बोली)
4. एकाच ठिकाणी राहून जगातील कुठल्याही विषयावर ज्ञान वाचनानं मिळतं.
5. लोकांच्या अनुभवावरून आपल्याला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विस्तारित करता येतो.
6. आपण ज्या विषयावर किंवा समस्येवर काम करतोय, त्या याच विषयावर जगभरात लोकांनी काय काय केले ते देखील वाचनानं मला कळलं आहे.
7. वाचनाचे महत्व समजलं आणि म्हणूनच वाचन संस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी हेच लक्षात घेऊन मी लहान मुलांकरीता ‘रिडिंग किडा’ नावाची लायब्ररी सुरु केली.
- पल्लवी बापट, निर्माण ५
पुस्तकं वाचतोच, माणसंही वाचायला शिकतोय!
पुस्तकं आयुष्य समृद्ध करतात, माणसंही फक्त त्यांना वाचण्याची कला शिकायला हवी!
‘सध्या कोणती चांगली पुस्तक वाचता?’
या नेहमीच्या प्रश्नातला पुस्तक हा शब्द काढून विचारलेला हा प्रश्न पुस्तकापलीकडेही या जगात वाचण्यासारखं खूप काही आहे हा खूप मोठा अर्थ सांगतो.
आणि ही गोष्ट कळल्यापासून माणूस वाचून काढण्याचा एक नवीन प्रयोग मी सुरु केला. समोर आलेला प्रत्येक व्यक्ती हा त्याच्यासोबत अनेक विचार, अनुभव, भावना, स्वप्न यांचं सुंदर संमिश्रण असतो. कधी मग तो गावात दुष्काळात खचलेला शेतकरी असेल, गडचिरोलीतल्या जंगलात झाडावरून पडून खोल जखमा झालेलं शरीर सोबत घेऊन जगणारा आदिवासी असेल, पुण्यातल्या एका मोठ्या आॅफिसमध्ये बसून लाखोंचे व्यवहार करणारा एखादा उद्योजक असेल किंवा मग पाच वर्षांचा एखादा निरागस मुलगा असेल. तुमच्या पेक्षा काहीतरी वेगळं तुम्हाला त्यांच्यामध्ये नक्कीच सापडेल. जे तुम्हाला जगायला शिकवत, पुलंच्या पुस्तकासारखं खदाखदा हसवत, जीएंच्या पुस्तकासारखं आयुष्याच्या खोलात डुबकी मारून आणतं. तुमच्या आजूबाजूला सतत प्रसन्न चेहरा घेऊन वावरणारा माणूस या जगण्यावर शतदा प्रेम करावे या ओळी ओठांवर ठेऊन जातो.
माणसं वाचण्याची ही कला हळूहळू विकसीत करताना मग मी माणसाच्या खोलात जायला लागलो. आणि मग त्यातून लोकांचे दृष्टिकोन वाचता यायला लागले. उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यात झालेला अभय बंग , अनिल अवचट आणि आनंद नाडकर्णी या तिघांचा कार्यक्रम. या कार्यक्र मात जगण्याचे एकाच उंच पातळीचे किती सुंदर दृष्टिकोन असू शकतात हे कळलं. अवचटांना ते फुलपाखरासारखा वाटतं, नायनांना तेच आयुष्य तत्त्व आणि कार्याने भरलेलं वाटत. अशा लोकांना वाचताना आपणही मग वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यातल्या घटनांकडे, लोकांकडे पाहायला लागतो. ही आजूबाजूची माणसं पुस्तकांइतकंच आपलं आयुष्य समृद्ध करू शकतात फक्त त्यांना उलगडून पाहण्याची कला आपल्याला जमायला हवी._
पुस्तकांचं म्हणायचं झालं तर तुकोबांच्या आयुष्यावर असलेलं एक पुस्तक शाळेत असताना हातात आलं. तिथून वाचनाची लागलेली गोडी आजतागायत सुटलेली नाही. आवड मात्र फार बदलत गेली. माणसांची आत्मचरित्र मला खूप गुळगुळीत वाटतात. त्यापेक्षा जगण्याचे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या माणसांविषयी त्यांच्या प्रयोगाविषयी वाचायला मला जास्त आवडतं. संपूर्ण पुस्तकभर पसरत जाणारी काल्पनिक कथा नको वाटते. तिथे मग मी अल्बर्ट एलिस मात्र चवीने वाचतो. हस्थमैथुनसारख्या विषयात हा माणूस आयुष्यभर प्रयोग करतो? त्या एका पुस्तकाने एका रात्रीत चोवीस वर्षातल्या कितीतरी संकल्पना मोडीत काढल्या. विरंग मी विमुक्त मी हे ही त्या पैकी एक. मृत्युंजय नंतर माझ्यातला कोंडमारा दूर करण्याचं काम केलं ते या पुस्तकातून भेटलेल्या माणसांनी, त्यांच्या प्रयोगांनी. पुस्तक ही काही प्रमाणात खोटी असतात, तात्विक असतात. कितीही म्हंटल तरी त्यात लेखक थोडा उतरतो. पण समोर असणाऱ्या माणसांचं अनुभव, ती माणसं खरी असतात. त्यांच्याशी आपलं आयुष्य जोडणं सहज शक्य होतं आणि म्हणूनच ते जास्त प्रभावशाली असतात.
वृत्तपत्रातली काही सदरं ही मी आवर्जून वाचतो. या सदराची खरी गंमत म्हणजे काल घडलेल्या गोष्टींवरच ते सुंदर टिपण असतं. ज्याच्याशी तुम्ही सहज जोडले जाऊ शकता. मुळात काय तर मी काल जो काही होतो त्यापेक्षा थोड्या वेगळ्या उंचीवर मला आज नेऊन ठेवेल ते सगळं मी वाचतो मग ती पुस्तक असोत कि माणसं.
आता हे सगळं लिहिताना आयुष्यात खूप काही शिकवून गेलेल्या लोकांची एक मोठी लिस्टच डोळ्यासमोरून जाते आहे. पुस्तकांइतकेच रंगीबिरंगी असणारे असे लोक सदैव आजूबाजूला असले आणि त्यांच्याकडून शिकण्याची तयारी असली की आयुष्य कोणत्याही पुस्तकांपेक्षा कमी राहत नाही.
-संकल्प आभाळे, निर्माण ६
प्रश्नोत्तरांचं हे प्रकरण फार कठीण नाहीये. ‘निर्माण’ आणि ‘ऑक्सिजन’ यांच्यातलापूल असेल आकाश भोर. आकाश स्वत: निर्माणच्या पाचव्या बॅचमध्ये होता आणि सध्या तो गडचिरोलीलाच सर्चमध्ये काम करतो आहे. तुमचे प्रश्न आकाशला थेट कळवा.
त्यासाठी ईमेल :
nirman.oxygen@gmail.com
यातल्या निवडक प्रश्नांच्या निमित्ताने होणारा संवाद
ऑक्सिजनच्या अंकात वाचायला मिळेल.
आणि उरलेल्या गप्पांचा ऑनलाइन कट्टा असेल
www.lokmat.com/oxygen इथे!!!