- याचं खरं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा, तरच स्वत:विषयी प्रेम वाटेल आणि आदरही!
‘रिकामं मन, सैतानाचं घर’ अशा अर्थाच्या ढीगभर म्हणी प्रत्येक भाषेत सापडतील.
अशा म्हणींचा एकुणात अर्थ काय तर आपण मनानं अस्वस्थ असतो, तेव्हा घेतलेले निर्णय बरोबर ठरत नाहीत. चुकीच्या कल्पना वाढत वाढतच जातात. आपल्याही नकळत आपण नकारात्मक होत जातो. आणि यातूनच निर्माण होतो न्यूनगंड. आपल्यात खूप गोष्टी कमी आहेत. आपल्याला कितीतरी गोष्टी येत नाहीत. मी काहीही केलं तरी त्यात अपयश येतं. यश कधीच मिळणार नाही. अशा प्रकारचे विचार आपल्याला न्यूनगंडाकडे घेऊन जातात. आणि हा न्यूनगंड सारं नासवत जातो.
खरंतर आपण स्वत:ला खरंखुरं ओळखतो असं आपण म्हणतो. पण खरं म्हणजे आयुष्याच्या अंतार्पयत आपण स्वत:लासुद्धा खरंखुरं आणि संपूर्ण ओळखू शकत नाही, असं म्हणतात. आपण ज्या अवस्थेत असतो त्यावेळी आपल्याला असं वाटत असतं की आता हेच माझं व्यक्तिमत्त्व. आणि हे असंच कायम राहणार. त्यातून त्या क्षणार्पयत आपण जे काही तुटपुंजं स्वत:ला ओळखलेलं असतं, तोच आपला गंड बनतो. त्याच आपल्या स्वत:बद्दलच्या भावना. या भावना कधीकधी उच्च असू शकतात, तर कधीकधी क्षुद्रसुद्धा.
त्यातून काय घोळ होतात हे समजून घ्यायला हवं!
आपण म्हणजे ‘लय भारी’?
प्रत्यक्ष आपण जसे आहोत, त्यापेक्षा खूप भारी, खूप महान वगैरे समजायला लागलो, तर त्याला म्हणतात - अहंगंड (सुपिरीऑरिटी कॉम्प्लेक्स) म्हणतात. म्हणजेच असं की, काही मुला-मुलींना तरुण वयात आपल्या शरीराचा, सौंदर्याचा, व्यक्तिमत्त्वाचा, बुद्धीचा, शक्तीचा, आपले आई-वडील कमवत असलेल्या पैशांचा, त्यांनी कमावून ठेवलेल्या सामाजिक प्रतिष्ठेचा - इथपासून ते थेट आपल्या जातीचा, धर्माचा असा कशाचाही अतिशय अभिमान वाटायला लागतो. यातून अहंगंड तयार होतो. मी म्हणजे काय ग्रेट असं वाटायला लागतं. आणि जे आत्ता चालू आहे, तेच कायम राहणार आहे, असाही त्यातून त्यांचा समज असतो.
अशी मुलंमुली स्वत:मध्येच इतकी गुरफटलेली असतात, की काही वेगळं करण्याची, हातून काहीतरी चांगलं घडवण्याची त्यांना गरज वाटत नाही. मात्र त्यामुळेच भीती अशी की, आयुष्यात एकदाच मिळालेला हा पूर्ण उमेदीचा काळ तसाच निघून जाऊ शकतो. आणि जेव्हा या सा:याची जाणीव होते तेव्हा खरंच वेळ निघून गेलेली असते. म्हणून वेळीच ओळख करून घ्या स्वत:ची. कारण न्यूनगंड म्हणजेच स्वत:ला कमी लेखण्याची वृत्ती जितकी घातक, तितकीच स्वत:ला अतिशहाणं समजत ओव्हर एस्टिमेट करण्याची वृत्तीही भयानक त्रसदायक!
म्हणून या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवायला हव्यात.
1) आत्मविश्वास असावा, अहंगंड नको.
2) आत्मसन्मान जपा; पण दुस:याचा आत्मसन्मान पायदळी तुडवू नका.
3) एखादा माणूस आज जिथे आहे, तिथेच उद्या असेल असं नाही. तो बदलू शकतो.
आपण म्हणजे पार बोगस?
काही मुला-मुलींच्या मनात याच्या अगदी उलट प्रक्रि या होत असते. त्यांच्या मनात कसलातरी न्यूनगंड तयार झालेला असतो. आपण इतरांपेक्षा कमी, अशी एक अतिशय जाणीव निर्माण झालेली असते. हा न्यूनगंड म्हणजेच इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स हा कशाचाही असू शकतो. चांगली बुद्धी असेल तर रूप नाही हा न्यूनगंड छळतो. रूप असेल तर आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत, त्यामुळे आपल्याकडे चांगले कपडे नाहीत, मजा करायला गाडी नाही, चांगले मित्र नाहीत, असा कसलाही गंड मनात घर करून राहू शकतो. एकदा घट्टपणो मनात असा गंड तयार झाला की तो जाता जात नाही. अशा मुलांकडे कितीही चांगले गुण असले तरी या न्यूनगंडामुळे ते गुण बाहेर येऊ शकत नाहीत. ज्यावेळेस त्यांना प्रोत्साहनपर असं काही तरी घडेल त्याच वेळेस ते या गंडातून बाहेर पडतात.
आपल्यालाही अशा कुठल्या तरी न्यूनगंडानं पछाडलेलं आहे असं लक्षात आलं तर काय करायचं?
सगळ्यात पहिले म्हणजे आपल्यामध्ये ही न्यूनगंड येण्याची कारणं शोधा. आणि ती क्षणात झुगारून द्या. अशा गोष्टींना मनात प्रेमानं थारा द्यायचा नसतो. त्यावर प्रेम करत राहिलं तर ती एक दिवस खूप मोठी होतात. माणसाच्या मनावर राज्य करतात. आपल्याला यातल्या कोणत्याही कॉम्प्लेक्सचं राज्य आपल्यावर नको आहे. खाली दिलेल्या कारणांमुळे आपल्या मनात आधीच असलेली न्यूनगंडाची भावना फोफावते.
1) आळस करणं, दिशाहीनता असणं.
2) करिअरचा चुकीचा निर्णय.
3) घरातल्यांशी चांगला संवाद नसणं.
4) व्यायामाचा, छंदांचा, चांगल्या मित्रमैत्रिणींचा - चांगल्या माणसांचा अभाव.
5) जवळ पुरेसे पैसे नसणं.
अशा गोष्टी आयुष्यात घडत असतील तर त्यावर उपाययोजना शोधा. नव्याने स्वत:कडे बघा आणि स्वत:च्या चुका सुधारा. मुख्य म्हणजे, स्वत:चं मन फार काळ रिकामं ठेवू नका. चांगल्या गोष्टीत, छंदात गुंतवून ठेवा. सैतानघरात कोणाचंच फार भलं होत नसतं, हे कायम लक्षात ठेवलेलं बरं!
- डॉ. श्रुती पानसे
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
drshrutipanse@gmail.com