आपण स्वत:ला ‘तरुण’ समजत असलो तरी आपण ‘यंग’ नाही ‘टीनएजर’ आहोत हे या मुलांना कळतं. म्हणजे त्यातला फरक कळतो, आपण कायद्यानं सज्ञान अर्थात ‘अॅडल्ट’ नाही, त्यासाठी 18 वर्षार्पयत वाट पहावी लागेल हे तर पक्कं माहिती आहे!
आणि हेही माहिती आहे की, तरुण मुलंमुली जे जे करतात, ते सारं आपण आजही करू शकतो, पण ते करताना लपूनछपून करावं लागतं, त्याचा गिल्ट मनात असतोच.
तरुण झाल्यावर मात्र खुलेआम काहीही करू शकतो, असं प्रत्येकाचं ठाम मत.
या मुलांच्या डोक्यात गोंधळ काहीच नसल्यानं उत्तरंही स्पष्टच होती. तरुण म्हणजे कायद्यानं सज्ञान, 18 पूर्ण, अशी एक लक्ष्मणरेषा या मुलांच्या डोक्यात पक्की.
आणि तरुण होण्याची व्याख्या तर एका वाक्यात तयार.
तरुण होणं म्हणजे आपल्याला जे करावंसं वाटतं ते करणं, त्यासाठी कुणाचीही परवानगी मागायची गरज नाही, कुणाला विचारण्याची आणि कुणाचं ऐकण्याची गरज नाही. आपण पूर्णत: स्वतंत्र होणं म्हणजे तरुण होणं, असं ही स्पष्टच सांगतात.
मग मुद्दा पुढचा, तरुण झाल्यावर तुम्ही काय काय करणार?
त्याची मुलांनी दिलेली ही काही भन्नाट उत्तरं.
१ .तरुण झाल्यावर मी मला हवे तसे कपडे घालीन, हवं ती स्टाईल करीन.
२. मोठ्ठे केस वाढवीन. वाटलं तर कापीन, वाटलं तर नाही.
३. फूल स्पीडमधे सुसाट बाईक चालवीन, मुख्य म्हणजे आधी सगळ्यात ट्रेण्डी बाईक विकत घेईन. लॉँग ड्राईव्हला एकटंच पण मित्रंबरोबर जायचंय.
४. कंटिन्यूअस मोबाइलवर बोलेन, हवं तेवढं बोलेन. कुणाशी बोलतोस किंवा बोलतेस, या प्रश्नाचं उत्तरं कुणालाही देणार नाही.
५. हवं तेव्हा झोपेन, हवं तेव्हा उठेन.
६. जे आवडेल ते खाईन, जिथं आवडेल ते खाईन.
७. मला गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड आहे, हे उघड सांगेल, तू लहान आहे अजून असं कुणी म्हणणार नाही ना तेव्हा.
८. वाट्टेल ते सिनेमे पाहीन, अॅक्शन-रोमान्स कायपण.
९. जरा मॅच्युअर्ड होईन, जबाबदारीनं निर्णय घेईन, तसं केलं तरच घरच्यांचा विरोध असला तरी मनासारखं करता येईल.
१०. तरुण माणसं फार स्मोक करतात, ड्रिंक करतात, आम्ही तसलं काही करणार नाही.
( असं जाहीर चर्चेत अनेकांनी सांगितलं, पण कुणाकुणाला एकटय़ाला गाठलं तर मुलांनीच काय पण मुलींनीही सांगितलं की, एकदा ड्रिंकच काय पण सिगारेट ट्राय करून पहायचीच आहे. ‘तसल्या’ फिल्म्सही बघायच्याच आहेत.)