-अभिजित पानसे
२०१० ची गोष्ट. फेसबुकनं भारतात पाय पसरायला व तरुणांच्या हृदयात जागा मिळवायला सुरुवात केली होती. तेव्हा अत्यंत लोकप्रिय असलेल्या ऑर्कुटचं बोरकूट एव्हाना बेचव वाटायला लागलं होतं. ऑर्कुटवरील पोस्टकार्डाप्रमाणे उघड संवादाचा उघडउघड कारभार तरुणांना ‘फ्लर्ट’ करण्यापासून थांबवत होता. कारण तिथं सगळं सगळ्यांसाठी उघडं होतं. फेसबुक आल्यावर मात्र ते तरुण पिढीला भावलं. निळ्या आंतरदेशीय पत्राप्रमाणं आतील मजकूर सुरक्षित (?) होता; नव्हता; पण झाकलेला होता. झाकली मूठ सव्वालाखाची. स्क्रॅपवालं ऑर्कुट स्क्रॅपमध्ये गेलं. फेसबुकची टॅगलाइन होती, अजूनही आहे की, तुमचे भुलेबिछडे मित्र, कुटुंबीय वगैरे फेसबुकवर पुन्हा भेटावेत, त्यांच्याशी कनेक्ट व्हावं. त्यांना ‘ॲड’ करावं; पण मूळ उद्देशाशिवाय आपल्या सोयीनुसार फायदा करून घेणं, वेगळा वापर करणं, यात भारतीय तरुण पिढी विशेषतः मुले अव्वल आहेत. त्यामुळं फेसबुकवर आपल्या जुन्या मित्रांना, ओळखीच्या लोकांना ॲड करण्याऐवजी इतरांना ॲड करण्यात मुलांना रस असतो; पण नक्की काय पाहतात तरुण मुलं ऑनलाइन, अगदी सर्वच समाजमाध्यमावर?
१. ‘J1झालं का?’ हे एकविसाव्या शतकातील प्रसिद्ध मराठी वाक्य फेसबुकनंच दिलंय. पूर्वी अनोळखी व्यक्तींशी भिन्न लिंगी व्यक्तींशी संवाद साधायला वेगवेगळ्या युक्त्या, वाक्यं म्हणावी लागत. तरुणांनी मात्र फेसबुकवर जे1 झालं का? सारख्या वाक्याचा आइस ब्रेकरचा शोध लावला.
२. फेसबुकचंच उदाहरण घेतलं, तर काही मुले तर फक्त मनाला येईल ते नाव फेसबुकवर ‘सर्च’मध्ये टाकतात आणि त्या नावानं दिसणाऱ्या अनेक मुलींशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात.
३. पण फेसबुक फक्त टाइमपाससाठीच नाही, तर यातून तरुणांचे विवाहही जुळले आहेत. तरुण पिढीनं फेसबुक हे येथे ‘लग्नाच्या, अफेअरच्या गाठी जुळतील’ असं मॅट्रीमनी साइट निर्माण केलंय. हेच नाही तर मुलीचं अरेंज मॅरेजसाठी प्रपोजल आलं तरी नुसतं नाव समजलं की, मुलं प्रथम त्या मुलीला फेसबुकवर शोधतात, ती कशी दिसते, तिच्या आवडीनिवडी काय आहेत, तिचे फोटोज, ती काय कमेन्ट करते, कोण तिच्या पोस्टवर सतत कमेन्ट करतो, एकंदर वरवर उपलब्ध असलेली संपूर्ण माहिती फेसबुकवर शोधतात. एकंदर मुले फेसबुकवर ‘स्टॉक’ करण्यात पटाईत असतात.
४. कॉलेजचा अभ्यास करताना दर पंधरा मिनिटांनी, ऑफिसचं काम करताना, इतर कामाच्या वेबसाइट बघताना मध्येच विरंगुळा म्हणून फेसबुकच्या ॲपला स्पर्श करून टाइमलाइनवरील पोस्टस बघितल्या जातात. लाल हृदये, हा हा हास्यफवारे सोडले जातात. आवडत्या पोस्टस्, त्यातील फोटो सेव्ह केले जातात. मेसेंजरच्या बंद खिडकीत मैत्री, प्रेमाची आर्जवे, अर्ज केले जातात. कॉलेजमधील ऑफिसमधील मुली, मित्राच्या मैत्रिणींच्या मैत्रिणी, त्यांची नावे कळल्यास त्यांना फेसबुकवर शोधलं जातं.
५. मैत्री करण्याच्या प्रयत्नाशिवाय कामासंबंधित लोक शोधायचाही प्रयत्न करतात. ऑफिसमधील आपल्या बॉसेसला ‘मैत्री विनंती’ पाठवतात, तर काही ही चाल स्वतःवरच उलटू नये म्हणून फक्त बॉसेसला ‘स्टॉक’ करतात.
६. मुलांना टाइमपास करायला आवडतो. कामाबद्दलही बोलायला आवडतं. कॉमेडीपासून एक कोटी समर्थकांचे, विरोधकांचे, विविध ग्रुप्सही करायला आवडतात. राजकारण, क्रिकेट आणि चित्रपट या भारतीय तरुणांच्या आवडत्या गोष्टी. आपलं मत मांडणं, आपल्या आवडत्या नेत्यांची, राजकीय पक्षांची तळी उचलणं, मोफत प्रचार करणं, हे तरुणांचं आवडतं काम फेसबुकवर केलं जातं. यात ते इतके मग्न होतात की, याच समाजमाध्यमात झालेल्या मित्रांशी त्यांचे तिथंच संबंध विषारी होतात.
७. ‘ट्रोलिंग’ हा नवा उपक्रम मुले फेसबुकवर करतात. खरंतर ट्रोलिंग हे जेंडरशी संबंधित नाही.
८. तरुण मुलांचं सोशल मीडियात प्रथम ध्येय हे मुलींशी मैत्री, ओळख वाढवणं हेच असतं, असं म्हणायला हरकत नाही; पण सध्या लॉक प्रोफाइलमुळं मुलांची काहीशी अडचण झाली आहे.
९. कोणत्याही गोष्टीचं वर्चस्व कायमस्वरूपी राहत नाही, तसं आता फेसबुकच्या लोकप्रियतेला इन्स्टाग्रामनं आव्हान दिलं आहे. जरी त्या एकाच झाडाच्या दोन फांद्या आहेत आणि ते झाड एकाच व्यक्तीच्या मालकीचं आहे. मुलांना आता फेसबुकपेक्षा इंस्टाग्रामवर मुलींना शोधण्यात जास्त रस आहे.
१०. फेसबुक असो वा इन्स्टाग्राम इथून झालेल्या ऑनलाइन ओळखीतून पुढं नंबर मिळवून व्हॉटस्ॲपवर भेटणं व नंतर प्रत्यक्ष ऑफलाइन भेटणं, हाच अनेकांचा प्रमुख उद्देश असतो. ऑनलाइन ते ऑफलाइनचा हा सुखद प्रवास नशीबवानांना प्राप्त होतो. बहुसंख्य जण मध्येच ब्लॉकरूपी जेरबंद होतात.
(अभिजित ब्लॉगर आहे)
abhijeetpanse.flute@gmail.com