- नीला देवस्थळी.
कोरोनाकाळाने आपल्याला सगळ्यात मोठा धडा कोणता दिला असेल तर तो म्हणजे जान है तो जहॉँ है. एकदमच इम्युनिटी हा शब्द आपल्या आयुष्यात शिरला. सिक्स पॅक, फिगर या सगळ्या शब्दांची क्रेझच संपवून एकदम इम्युनिटी ही स्टार झाली.जो तो आपली इम्युनिटी वाढवायच्या मागे लागला आणि त्यासाठी मग काढे, व्हिटॅमिन सी-डी, सलाड, पौष्टिक गोष्टी, गरम पाणी, बाहेरचं खाण्याला बंदी हे सारे सोहळे सुरू झाले.अर्थात त्यातून आपल्या तब्येतीविषयी जागरूकता वाढली आणि आपली प्रतिकार शक्ती उत्तम करता आली तर चांगलंच आहे.वजन आणि आकडय़ांच्या पलीकडे जाऊन आपण आता आपल्या तब्येतीचा विचार करायला हवा हे उत्तम.पण प्रतिकारशक्ती ही काही जादूची कांडी नाही, आज औषध घेतलं आणि उद्या वाढली.त्यासाठी भरपूर मेहनतच नाही तर लाइफस्टाइल म्हणून ते स्वीकारायला हवं.त्यासाठी काही गोष्टी नियमित करता येतील. थोडे दिवस नाही तर हे आयुष्यभर करायचं आहे.
1) व्यायाम आणि योगाभ्यास
बाजारातून आणली औषधं आणि घेतली तरी ती पचली पाहिजे. सप्लिमेण्ट खाऊन आणि मसल्स कमवूनही प्रतिकारशक्ती वाढेलच असं काही नाही. शरीर लवचिकही हवं आणि काटकही. त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे योगाभ्यास. आता तर आपण योगदिनही साजरा करतो. अनेक सेलिब्रिटीही जिमपेक्षा योग उत्तम असं आता म्हणू लागले आहेत.त्यामुळे योगची क्रेझही वाढली आहे. पण म्हणून न करता आपलं शरीर काटक होणार नाही, योगाभ्यास रोज करायला हवा, तो शिकूनही घ्यायला हवा.
2) रोज किती सूर्यनमस्कार घालणार?करिना कपूर म्हणो दिवसाला शंभर सूर्यनमस्कार घालते, शिल्पा शेट्टीही आणि मौनी रॉयही.सूर्यनमस्कार हे सर्वाग सूंदर व्यायाम आहेत. शिवाय करायला सोपे, आणि स्टॅमिनाची परीक्षा पाहणारे. लॉकडाऊनच्या काळात सूर्यनमस्कार घालत राहणं हा मनासाठीही उत्तम व्यायाम आहेच. शरीरासाठी तर आहेच आहे.
3) सायकल कुठं चालवणार?सायकल चालवायला आता लॉकडाऊनमध्ये परवानगी आहे. सुरक्षित अंतर ठेवून, कुणाच्या फार जवळ न जाता, गप्पा मारत न बसता सायकलचा एक राउण्ड मारणं सहज शक्य आहे.अगदी पावसाळा असला तरी. रेस लावू नये; पण एकटय़ानं एक रपेट मारायला हरकत नाही.
4) ऑनलाइन मोफत व्यायामवॉक अॅट होमसारखे अनेक व्हिडिओ मोफत ऑनलाइन पाहता येतात. ऑनलाइन व्यायामही शिकता येतो. करता येतो.फक्त करायला हवा.
5) या सगळ्यासह उत्तम पोषक, साधं, घरचं, लोकल, गरम अन्न हा प्राधान्यक्रम. प्रोटीन पावडरी न खाता साधं जेवूनही आपण तब्येत उत्तम राखूच शकतो.
(लेखिका डायटिशियन आहेत.)