एकीकडे त्या झुगारुन देताहेत दुय्यमतेची झूल,आणि दुसरीकडे होताहेत भयंकर वाचाळ.
जुन्या चौकटींना सोयीचे मुलामे
------------------
वयात येणा-या मुलींच्या जगण्यात होत असलेल्या बदलांचा वेध घेणारं ‘तेरा ते तेवीस’ या नावाचं पुस्तक मी लिहीत होते; त्याकाळात या वयातल्या अनेक मुलींशी बोलायची, त्यांच्या मनात डोकावण्याची संधी मिळाली. या वयातल्या सगळ्या मुलींचं जग एकजिनसी नाही. शहरात, गावात, खेडय़ात राहणा:या तरुणी, आदिवासी तरुणी, मेट्रो शहरातल्या तरुणी, विविध आर्थिक गटातल्या तरुणी असे अनेक कप्पे आहेत. तरीही या वयातल्या मुलींचा ढोबळमानाने विचार करायचा तर काही प्रमुख गोष्टी स्पष्ट दिसतात.
मुलींमध्ये स्वओळख तयार होताना दिसतेय. आपल्याला काय हवंय आणि काय नकोय याबाबतची स्वच्छ नजर येण्याकडे त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. आपले विचार आपल्या पालकांर्पयत पोचवावेत अशी इच्छा आहे. त्यासाठी प्रय} करण्याची तयारीही आहे. पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद आहे असं अजूनही म्हणवत नाही. पण दोन्ही गट आपापल्या बाजूने प्रयत्न करायला लागले आहेत हे मात्र नक्की. पूर्वापार चालत आलेल्या चौकटी मोडण्याची धडपड आहेच पण त्याचबरोबर नव्या चौकटी बांधणंही चालू आहे. चौकट मोडायची म्हणजे काय? या प्रश्नावर तमाम पिढय़ांमध्ये असलेला घोळ याही तरुणींच्या मनात आहेच. त्यामुळे ‘सारे नियम तोड दो’ असलं काहीही करण्याच्या भानगडीत त्या पडत नाहीत. उलट स्वत:च्या सोयीनी आहे त्याच चौकटी जराशा बदलून घेतायेत. चौकटीची जातकुळी मात्र साधारण तीच आहे. फक्त त्याचा रंग निराळा आहे. आपण घराचा रंग नाही का बदलत अधून मधून तसंच.
अजून सोपं करून सांगायचं तर, स्वत:ला इतरांच्या नजरेतून, विशेषत: पुरुषांच्या नजरेतून बघायचं ही पूर्वापार बायकी चौकट आहे तशीच आहे. फक्त त्याचं रुपडं बदलेलं आहे. फेअरनेस क्रिम्स लावून माझा आत्मविश्वास वाढतो असं म्हणणा:या मुलींचा आत्मविश्वास एखाद्या मुलाच्या स्मितहास्याची पावती किंवा डेटसाठीचं आमंत्रण मिळाल्यानंतरच बळावतो. हे म्हणजे चौकट तिचं, मुलामा वेगळा. स्वओळखीचा अजून एक परिणाम दिसतोय. स्वत:च्या लैंगिकतेविषयी किंचितशी आलेली जाग. सेक्स या अजिबात ‘न बोलण्याच्या’ विषयावर काहीसं घाबरत, संकोचून का होईना. पण मुली आता बोलायला लागल्या आहेत. त्यांच्या स्वत:च्या गरजांनाही आता आवाज फुटू लागले आहेत. अर्थात आपल्या समाजाला हे चालत नाही. एखाद्या मुलीनं ‘त्या’ विषयाबद्दल उघड काही बोललं तर लगेच तिला ‘तसलीच आहे’ हे दूषण लागतं. अर्थात हल्ली अनेक तरुणी हे समाजानं देऊ केलेलं लेबल फारसं मनावर घेत नाहीत, असंही दिसतंय.
सध्या आजूबाजूचं वातावरण स्त्रीला समानतेचं वागवा असं ओरडून सांगणारं आहे. स्त्रीभ्रूण हत्त्येपासून निर्भया प्रकरणार्पयत अनेक गोष्टी सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमुळे कानाकोप:यात जाऊन पोहचल्या. त्यामुळे आपण दुय्यम नाही ही जाण अनेकींना येते आहे. दुय्यमतेची कात टाकायची आहे, पण कशी ते नीटसं ठाऊक नाही. त्याविषयी पुरेसं मार्गदर्शन नाही. त्यातृून मग धाडसी प्रयोग, पुरेसा विचार न करता उचलेली पावलं, त्यातून अनेकदा सालटी सोलून निघतात. त्यातून निर्माण होणारा गोंधळ आहे तसाच अनुभवातून येणारा समंजसपणा आहे. हक्क आणि अधिकाराचा आग्रह आहे तसं पुरुषाला समजून घेतलं पाहिजे ही समज आहे. स्त्री-पुरुष परस्परांचे वैरी नाहीत तर आपण एकमेकांना पूर्ण करण्यासाठी आहोत याची नव्याने ओळख होण्याचा हा काळ आहे. निसर्गानं दिलेलं एकमेकांविषयीचं आकर्षण, औत्सुक्य उलगडून बघण्याची इच्छा आहे. थोडीशी घाईही आहे. त्यातून एकीकडे आत्मविश्वास, आत्मनिर्भरता येतेय, निर्णयक्षमता काम करतेय. पण यासा:यात आणखीही काही घडतंय. दुसरी एक बाजूही प्रकर्षाने दिसते आहे. ती म्हणजे मुली प्रचंड वाचाळ झाल्या आहेत. मनात येणारा प्रत्येक विचार, भावना मांडताना ती आपण का मांडतोय, ती आपल्याला खरंच मांडावीशी वाटतेय का, जगापुढे ती मांडल्याने आपल्या जगण्यात असा काय फरक पडणार आहे याचा विचार अनेकींनी केलेला नसतो. अनेकदा मोह असतो तो लाईक्सचा. येनकेन प्रकारे सभोवतालच्या नजरेत राहण्याचा. त्यातूनच कधीतरी स्वत:ला सोशल मीडियासमोर मांडताना भान हरपतं. सुटतं. स्वत:च्याच हातून स्वत:चं नुकसान करण्यार्पयत तरुणी जातात. हे सगळं घडतंय. बरं वाईट त्यातही आहेच. पण तेही घडत राहिलंच पाहिजे कारण त्यातूनच प्रत्येकीला स्वत:ची खरी ओळख मिळणार आहे. मी कोण? कशी? माङया गरजा, भावना, स्वप्न, महत्त्वाकांक्षा, अपेक्षा यांची खरी ओळख होणार आहे. कुणीतरी दुस:यानं मला मी कोण-कशी हे सांगण्यापेक्षा; ठेचा खाऊन, रक्तबंबाळ होऊन, पडून, उठून माझं मी शिकलेलं बरं असं मुलींना वाटू लागलंय.
त्यांची ही वाट, हे ठेचकाळणं, चालणं ङोपत असेल तर समजून घ्या. नाहीतर सोडून द्या..
- मुक्ता चैतन्य
( ‘तेरा ते तेवीस - उमलत्या मुलींच्या भावविश्वातली अनसेन्सॉर्ड पाने’ या पुस्तकाच्या लेखिका. उमलण्याच्या टप्प्यावर या मुलींच्या आयुष्यात नेमके काय बदल होतात, याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे.)