- सॉफ्ट स्किल्स
- समिंदरा हर्डीकर-सावंत
‘द ओन्ली कॉन्स्टण्ट इन अ लाईफ इज अ चेंज!’ हेराक्लायट्स नावाच्या ग्रीक तत्त्ववेत्त्याचं वाक्य आहे. आपणही मारतोच ना, डायलॉग की परिवर्तन संसार का नियम है!
पण हे बदल कायम आपल्याला सोयीचे आणि सुखाचे असतीलच असं नाही! काही वेळा प्रतिकूल अशा घटना अगदी अचानक, कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्या समोर येऊन धडकतात. ध्यानीमनी नसताना एकामागून एक काही ना काही समस्या उभ्या राहतात. त्यालाच आपण संकट किंवा क्रायसिस असं म्हणतो!
कामाच्या ठिकाणी तर हे असं क्रायसिस अनेकदा वाट्याला येतं. ही अशी संकट परिस्थिती हाताळण्याची कला फारच वेगळी असते. त्यात आपल्याकडे खूप विचार करून निर्णय घ्यायला वेळच नसतो, काय करायचं काही सुचत नाही आणि निर्णय तर अगदी काही क्षणात घ्यावे लागतात.
वेळ फार थोडा असतो, आणि निर्णय घेण्याची जबाबदारी मोठी ! हे निर्णयही तुम्हाला पुरेशी माहिती हाताशी नसताना घ्यावे लागतात. संकटकाळात तुम्ही कसे निर्णय घेता, तुम्ही परिस्थिती कशी हाताळता, किती संयमाने निर्णय घेता, इतरांना सांभाळून घेता यावर बर्याच गोष्टी ठरतात!
क्रायसिस मॅनेजमेण्ट जमत नाही, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील संकटं हाताळता येत नाही, त्यात तोल जातो किंवा सुटतो असं अनेकांचं होतं !
तसं होऊ नये म्हणून हे स्किल आपल्याला शिकायचं आहे हे तरी किमान लक्षात ठेवायलाच हवं!
संकट व्यवस्थापन नेमकं करतात कसं?
१) संकट किती गंभीर आहे, याचा आधी विचार करा. समस्या किती छोटी-मोठी आहे हे तपासा, उगीच अतिटेन्शन न घेता, फक्त आता समोर असलेल्या संकटाचा आपल्या कामावर आणि कंपनीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम काय होऊ शकतो, याचा विचार करा!
२) पॅनिक होऊ नका. काहीजण घाबरून जाऊन अचानक पॅनिक होतात. वस्तुस्थिती पहा, अशावेळी भावना बाजूला ठेवून वास्तव काय आहे, एवढंच पहा. तेवढाच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
३) आपलं आणि आपल्या संस्थेचं कमीत कमी आर्थिक नुकसान होऊन जास्तीत जास्त सेफ कसं राहता येईल, याचा त्याक्षणी विचार करायला हवा. जीव आणि वित्तहानी टाळणं हे प्रथम प्राधान्य.
४) अशावेळी तुमचा सराव, धीर आणि प्रसंगावधान उपयोगी पडेल. तुम्ही इतर सहकार्यांची कशी मदत घेता, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गोष्टी करून कसं तरून जाता हे महत्त्वाचं! तुमचं संवादकौशल्य चांगलं असेल तर तुम्ही नक्की तरून जाऊ शकाल!
५) आता भावनांचा विचार करू. हा बदल कुणालाच आवडत नाही. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं सर्वांसाठीच अवघड असतं. कदाचित होणारा बदल तुमच्या मनासारखा नसेल, थोडी अनिश्चितता घेऊन येईल, पण तो वाईटच असेल असं मानायचं काही कारण नाही. अनेकांना कुठलाही बदल हा संकटच वाटतो, ही भावना मनातून काढून टाकली की काम सोपं होईल!
६) स्वत: शांत राहून इतरांना शांत ठेवणंसुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे. परिस्थिती कितीही भयाण असो तुम्ही शांत राहून, आवाज न चढवता, धीरानं काम करायला हवं. ते शिकायलाच हवं.
७) संकट आलं की अनेकदा वाटतं, आपल्या हातात काय आहे? नशीब आपलं. तेच फुटकं. असं म्हणू नका. जेवढं जमेल, जेवढं वास्तव आहे, तेवढं लढाच. प्रयत्न कराच. वादळात तुम्ही तुमचं घर वाचवलं हेच खूप असं म्हणायचं!
८)सगळ्यात महत्त्वाचं संकटातून जो सहीसलामत बाहेर पडून जो नव्यानं लढायला उभा राहतो, तोच खरा सिकंदर. तुम्हाला सिकंदर व्हायचं की नाही, हे ज्यानं त्यानं ठरवायचं!