-अभिजित पानसे
सध्या भारतीय क्रिकेट टीममध्ये योयो टेस्टसोबत दाढी चाचणीसुद्धा उत्तीर्ण व्हावी लागते का, असं वाटण्याइतपत परिस्थिती आहे. सगळेच संघात दाढीधारी. दाढी, मिशी असणं हाच नवा कूल ट्रेण्ड आहे. नव्वदच्या दशकात परिस्थिती वेगळी होती. भारतीय क्रिकेटपटू त्या काळात फक्त मिशी ठेवत. सचिन तेंडुलकर नावाचा गोड मुलगा सोडल्यास इतर सर्व खेळाडू मिशीमध्ये आढळत.
१९९६ मध्ये सौरव गांगुली टीममध्ये पुन्हा आला तेव्हा गोलमालमधील रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मासारखी मिशी ठेवूनच.
कॅप्टन अजहर, भारताचा तत्कालीन बेस्ट बॉलर अनिल कुंबळे असो वा सगळ्यात वेगवान शाकाहारी बॉलर जवागल श्रीनाथ असो, सर्व नाकाखाली मिशीची बारीक रेष ओढून होते. त्याआधी धिप्पाड शरीरयष्टी असलेला कॅप्टन कपिल देवही जाडी मिशी ठेवायचा; पण या खेळाडूंनी मिशीची जोडीदार दाढी कधी ठेवली नव्हती. रेनकोटमधील वरचं जॅकेट फक्त घातलं जातं खालील पॅन्ट तशीच पडून राहाते तसं हे फक्त दाढी-मिशी कॉम्बोमध्ये फक्त मिशीच ठेवून सर्वसामान्य भारतीय लूक चेहऱ्यावर पांघरत.खेळाडूंशिवाय समालोचकसुद्धा मिशी ठेवत. तेव्हाचे मिशीवाले समालोचक व सूत्रसंचालक रवि शास्री आता ओळखू येणार नाही इतके वेगळे दिसायचे.
मात्र एकविसाव्या शतकातील पहिलं दशक सुरू झालं, मीडियाचा वावर आणि प्रभाव वाढला तसं क्रिकेटमध्ये आणि क्रिकेटपटूमध्ये ‘स्मार्टनेस’, प्रस्तुती, सादरीकरणाला महत्त्व येऊ लागलं. भारतीय क्रिकेट टीममधील सर्व रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा खेळाडू लक्ष्मणप्रसाद दशरथप्रसाद शर्मा बनले. सर्वांनी आपापल्या मिश्यांचा त्याग केला. या लूकमध्ये एक दशक भारतीय क्रिकेट टीमने घालवलं.
पहिलं दशक संपताना विराट कोहलीची भारतीय क्रिकेट संघात वर्णी लागली. २०१२ पासून तो भारतीय टीमचा अविभाज्य भाग बनला आणि स्टार होत गेला. नव्या युगातील भारतीय क्रिकेट टीममधील दाढीचा जनक विराट कोहली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याने आपल्या कव्हर ड्राईव्हसोबत आपल्या दाढीलाही त्याचं ‘सिग्नेचर’ बनवलं. त्याची दाढी त्याचं स्टाइल स्टेटमेंट झाली. हळूहळू संघाचा फिटनेस आणि फॅशन कंट्रोल विराट कोहलीकडे येत गेला तसे सर्व खेळाडू विराट कोहलीप्रमाणे दाढी ठेवू लागले. आता जवळपास संपूर्ण भारतीय क्रिकेट टीम दाढीमध्येच आढळते.
सध्या भारतीय टीमची ही दाढी क्रेझ बघून विदेशी गोरे खेळाडूसुद्धा दाढी-मिशी वाढवत आहेत. सरळसाधा न्यूझीलंडचा केन विलियम्ससुद्धा सोनेरी काळी दाढी, मिशी वाढवून खेळताना दिसतोय. डेव्हिड वॉर्नरने तर अगदी कॉमन मॅनसारखी मिशी ठेवली आहे. ‘ब्रेक द बिअर्ड ट्रेंड’ आलेत आणि गेलेतही. भारतीय क्रिकेट टीमचा नो शेव्ह नोव्हेंबर मात्र अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यावर गेली आहे. गेला २०१८ चा दौरा भारतीय टीमने जिंकला होता. दाढीच्या स्टाइलसह संघानं विजयी घोडदौडही कायम ठेवावी म्हणजे झालं!
( अभिजित ब्लॉगर आहे.)
abhijeetpanse.flute@gmail.com