-निकिता बॅनर्जी
यंदाची दिवाळी ‘पर्सनल टच’ची आहे असं नाही का वाटत? म्हणजे काय तर पाहा, अनेक सोशल मीडिया ग्रुप्सवर घरीच आकाशकंदील बनवणं, घरीच उटणं तयार करणं, घरीच फराळ करणं याच्या चर्चा सुरू आहेत. अनेकजणांचं तर घरी हे सारं करून झालंही. ज्यांना स्वत:ला करायला जमत नाही, त्यांनी घरगुती व्यवसाय करणाऱ्यांकडून ते विकत घ्यायलाही सुरुवात केली आहे. मात्र तरी प्रश्न आहेच की, यंदा दिवाळीला आपल्या अगदी जवळच्या माणसांना, मित्र-मैत्रिणींना गिफ्ट काय द्यायचं?
दुकानात तर सगळंच मिळतं, ऑनलाइनही सारं काही मिळतं. पण ते सगळ्यांसाठी कॉमन असतं, मग आपल्या माणसांना आपण असं काय गिफ्ट देणार जे खास असेल, पर्सनल टचचं असेल, त्या त्या माणसासाठी तयार केलेलं असेल?
तर त्यासाठी मदत करतील अशा या काही आयडिया. मुळात हे लक्षात घ्यायला हवं की, आपलं नातं त्या माणसाशी कसं आहे. त्याच्या आवडी-निवडी काय आहेत, आपल्याला त्याच्यातलं काय आवडतं, त्या व्यक्तीचं आवडतं काय आहे, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की मग आपलं सुपीक डोकं चालवून खास असं काहीतरी तयार करता येतं. आणि ते करायला पैसे फार कमी लागतात. खर्च कमी होतोच; पण माया मात्र अपार खर्च करावी लागते.
काय करता येईल, असं काही
सगळ्यात महत्त्वाचं, फक्त गर्लफ्रेण्ड, बाॅयफ्रेण्ड, मित्र-मैत्रिणी यांनाच गिफ्ट देता येईल असं नाही. आपली भावंडं,आईबाबा, आजी-आजोबा यांनाही भेट देता येऊच शकेल. पर्सनल टच गिफ्ट.
१.आवडता पदार्थ ही सगळ्यात सोपी बेट. आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीला त्याला आवडणारा पदार्थ स्वत: करून गिफ्ट देता येऊ शकतो.
२. गिफ्ट दे एक्सपिरीअन्स असा सध्या एक नवीन ट्रेण्ड आहे. म्हणजे काय तर अनुभव गिफ्ट द्यायचा. उदा. एखादा सिनेमा, गाणं, एखादी भ्रमंती, छान जेवणाचं सजवलेलं टेबल. उत्तम फुलं. छानसं परफ्यूम, काहीही. असं काही जे अनुभवाचा भाग होईल.
३. स्वत: बनवलेलं ग्रिटिंग, हातानं छान मनापासून लिहिलेलं पत्र हे ऑप्शन तर आहेच.
४. हातानं रंगवलेला टी-शर्ट, एखादा छान रंगवलेला मग किंवा चित्र.
५. रुमालावर स्वत: काढलेली एम्ब्रॉयडरी.
६. क्रोशाचे, दोऱ्यांचे, कागदाचे दागिने, मण्यांचे दागिने.
७.असं बरंच काही तुमचं तुम्हालाही सुचू शकेल, जरा आपल्या माणसांचं मन वाचायची फक्त तयारी ठेवा.
मग आहेच, हॅपी दिवाळी, ती ही मायेची.