-डॉ. प्रवीण घोडेस्वार
आज १० डिसेंबर. मानवी हक्क दिन. मानवी हक्क म्हणजे मानवाचे स्वभाविक, वैश्विक आणि परस्परावलंबी हक्क. हे आपणांस निसर्गत:च प्राप्त होतात. यांची चोरी होऊ शकत नाही किंवा कोणी आपल्याला बहाल करत नाही. हे वैश्विक आहेत. जात, धर्म, वंश, लिंग, भाषा, सामाजिक व आर्थिक स्तर याचा त्यावर परिणाम होत नाही. माणूस असणं हीच हे हक्क उपभोगायची पूर्वअट.
मानवी हक्कांची पायमल्ली म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणे पाहू..
उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथं एका १९ वर्षीय दलित मुलीवर उच्च जातीच्या तरुणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्याची घटना या वर्षी १४ सप्टेंबरला घडली. तमिळनाडूमध्ये एका ६० वर्षीय इसमाला आणि त्याच्या ३१ वर्षाच्या मुलाला पोलिसांनी केलेल्या अमानुष छळामुळे पोलीस स्टेशनातच प्राण गमवावे लागल्याची घटना याच वर्षी १९ जूनला घडली. एक वर्षापूर्वी उत्तर परदेशातल्या एका सरकारी शाळेत एक दलित विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांपेक्षा लांब बसून दुपारचे भोजन करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमधून प्रक्षेपित झाला होता.
वरील तिन्ही उदाहरणांतून दिसून येणारा हिंस्र लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्या, पोलिसांची अमानुषता आणि जातीवर आधारित भेदभाव म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मानवी हक्कांची पायमल्ली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जात,धर्म, लिंग, लिंगभाव व लैंगिक ओळख यावर आधारित केला जाणारा भेदभाव हा मानवी हक्कांचे उल्लंघन होय.
या पार्श्वभूमीवर शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मानवी प्रतिष्ठा-सन्मान नि हक्क यांचा भंग होणार नाही, याबाबत तरुणांनी जनजागृती केली पाहिजे. आपल्या समवयस्कांना व्यक्तीचे मूलभूत हक्क,अधिकार आणि मानवी हक्क यांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा आणि त्यातल्या तरतुदी विद्यार्थ्यांना समजून सांगितल्या पाहिजेत. जेणेकरून शांतता-लोकशाही प्रणाली व मूल्ये-सामाजिक सौहार्द याची जाणीव होईल.
समानता, स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा, व्यक्तीचे हक्क व अधिकार, इतरांविषयी सहानुभूती, सहिष्णुता, संयम, दुसऱ्यांच्या हक्कांचा आदर व स्वीकृती याबाबत सजग करण्याची गरज आहे. ते तरुणांनी करायला हवेच.
(लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)
gpraveen18feb@gmail.com