-आमीन चौहान,
एका प्रशिक्षणासाठी हैदराबादला गेलो होतो. तिथं देशभरातून शिक्षक आलेले होते. मणीपूरचा एक संवेदनशील शिक्षक तिथं मला भेटला. मी यवतमाळचा असल्याचं कळलं तसा तो चटकन माझ्याकडे आला. त्यानं विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांविषयी वाचलेलं होतं. त्याविषयी माझ्याशी बोलला. रोज एक तरी बातमी येते या भागातून हे खरंय का म्हणाला? मी जमतील तशी त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. मात्र त्यानं विचारलेला एक प्रश्न मला अनुत्तरीत करून गेला. तो मला म्हणाला, याविषयात तुम्ही शाळा म्हणून काही करता आहात की नाही? मी गप्पच झालो. कारण मी यासंदर्भात कुठलाच सामाजिक उपक्र म शाळेत राबवला नव्हता. परत आलो पण त्या शिक्षकाचा तो प्रश्न मला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यातूनच ‘पालक संवाद’चा पाया घातला गेला. मला वाटलं, शेतकरी निराश आहेत. वास्तव भयंकर आहे. पाऊस कमी झाला. अशा उदास वातावरणात शेतकर्यांना उमेद कशी द्यायची, कोण देणार? आत्यंतिक निराशेच्या गर्तेत गेलेल्या शेतकर्यांच्या मनात त्यांची मुलंच जगण्याचा ‘हा’ आशावाद निर्माण करू शकतील. आपली लेकरं गुणवंत आहेत. त्यांचं आणि आपलंही भविष्य सुरक्षित असून, किमान या मुलांसाठी तरी आपण जगलो पाहिजे असा विश्वास पालकांना वाटला पाहिजे. त्यासाठीचा उपक्रम शाळेत करायचं ठरवलं. मुलांशी अशा विषयांवर जाणीवपूर्वक बोलणार्या पालकांची संख्या फार कमी. मुळात मुलांचं-पालकांचं बोलणंच कमी. मग सहज संवाद कसा होणार? पण ते होत नाही तर तेच करायला हवं असं मनात आलं. तसा संकल्प मनात धरून ‘पालक संवाद’ उपक्रमाला शाळेत सुरुवात केली. मुलांशी पालकांचा नियमित संवाद व्हावा हा धागा धरून उपक्र माची आखणी केली. ‘पालक संवाद’ उपक्रमात पालकांऐवजी मुलांनी पालकांशी संवाद सुरू करावा असं ठरवलं. म्हणजे लहानांनी मोठय़ांशी बोलायचं. मुलांनी शाळेत घडलेल्या चांगल्या बाबी पालकांना सांगाव्यात. गाणी, कविता, प्रार्थना म्हणून दाखवाव्यात. परिपाठ किंवा शाळेत घडलेला एखादा किस्सा, विनोद सांगावा. इंग्रजी पाढे, कविता, संभाषण, छोटे इंग्रजी शब्द व वाक्यांचा घरी जाणीवपूर्वक वापर करावा. शाळेत मिळालेली शाबासकी घरच्यांना सांगावी. बक्षीस दाखवावं. शाळेत झालेल्या कार्यक्र माची घरी चर्चा करावी. आपले शिक्षक, मित्र यांच्या चांगल्या गोष्टी आईबाबांना सांगाव्यात. एखादा विषय, घटना यावर आपली मतं मांडावीत. पालकांना या विषयावर बोलतं करावं. आपला गृहपाठ, प्रकल्प तयार करताना पालकांची मदत घ्यावी असं मुलांशी बोलून कृती करणं सुरू केलं. पालकांना वाटलं पाहिजे की, आपलं मूल शिकतंय, आनंदी आहे. त्याच्याकडे पाहून जगलं पाहिजे. आमच्या निंभा गावात आतार्पयत एकाही शेतकर्यानं आत्महत्या केलेली नाही. ही जमेची व अभिमानास्पद बाब आहे. त्यात शाळेच्या मुलांचाही वाटा आहे. या उपक्रमानं शाळेची पटसंख्याही वाढली. शाळेच्या अनेक चांगल्या गोष्टी विनासायास पालकांर्पयत पोहोचल्या. एकप्रकारे शाळेचा मॉक प्रचार खूप चांगल्या प्रकारे झाला. त्यामुळे पालक शाळेकडे आकर्षित झाले. गावातील 61 मुलं शहरी शाळा सोडून खेडय़ातल्या आमच्या शाळेत दाखल झाले. पालक व मुले यांच्यामध्ये संवाद सुरू झाला. शिक्षक-पालक-मुलं अशी एक चांगली टीम तयार झाली. एक छोटा उपक्रम पण आम्हालाही उमेद मिळू लागली.
( शिक्षक, जि. प. शाळा, महागाव ता. दिग्रस जि. यवतमाळ)