सुबोध पाटणकर
साधारण सात-आठ वर्षापूर्वीची गोष्ट. ‘वेडा आहेस का, काय अवदसा आठवली तुला.?’ असे अनेक कौतुकोद्गार कानावर पडत असूनही मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. ठरवलंच होतं, शेतकरी व्हायचं. आणि शेतकरी झालो. कॉम्प्युटर इंजिनिअर आणि आयआयएममधून एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंटचा कोर्स करून, चांगली नोकरी चालू असताना, ‘शेती करतो’ म्हणणारा वेडाच म्हणायला हवा, नाही का? त्याचं असं झालं.
आयआयएममध्ये प्रत्येकाच्या डोक्यात एक किडा घुसवला जातो आणि तो म्हणजे स्वत:चा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा. त्यावेळेस अनेक ऑनलाइन आणि सेवा क्षेत्रातील व्यवसाय बहरत होते. कुठचा व्यवसाय सुरू करता येईल याचा अभ्यास करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली, की देशातील 60 ते 70 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत; पण त्यांचं सकल राष्ट्रीय उत्पदनातलं योगदान फक्त 16 टक्के आहे. आज अनेक लोक शेतीमधून बाहेर पडत आहेत. शेती नकोच, नाहीच करणार असं म्हणणारे तरुण आहेत. ‘शेतकरी आत्महत्या’ ही समस्या तर हादरवून टाकत आहे. एक मोठा गंभीर प्रश्न मला पडला. जर 70 जनता जो व्यवसाय करत आहे तो नुकसानदायक असेल तर ती तो करणार नाहीच; पण मग आपल्याला अन्न कोण देणार? हा व्यवसाय एवढा मागे का पडला? बरं, दुसरीकडे ग्राहकही समाधानी नाही. अन्न चांगलं मिळत नाही. रसायनयुक्त आणि भेसळयुक्त आपण खातो, असं अनेकजण म्हणतात.
दुसरीकडे आज आयआयटीमधून उच्चशिक्षित मुलं देशाबाहेर जातात त्याला आपण ब्रेनड्रेन होतंय असं म्हणतो. तेच अनेक वर्षे शेतीमध्ये होत आहे. उदाहरण पाहा, अनेक वर्षापूर्वी एका शेतकर्याची चार मुलं. त्यातील तीन मुलं शहरामध्ये नोकरीसाठी गेली. उरला एक ज्यानं पारंपरिक पद्धतीची शेती तशीच चालू ठेवली. शिकलेसवरले ते शहरात पळू लागले. अशा प्रकारे कृषी व्यवसायातदेखील एक प्रकारचा ब्रेनड्रेन झाला. निसर्गावरच्या अवलंबित्वाला, राजकारण्यांच्या उदासीनतेला आणि व्यापार्यांच्या पुरवठा साखळीला दोष देतो. पण जर चांगली शिकलेली माणसं या क्षेत्रात आली तर?कृषी व्यवसाय शेतकर्यांना संपन्न करेल का? आपला बहुसंख्य समाज हालाखीच्या परिस्थितीतच आहे आणि नफा हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रात मोठय़ा कंपन्या येत आहेत; पण त्यानं शेतकर्यांचं जीवनमान बदलणार नाही. व्यावसायिक आणि त्याचवेळी सामाजिक विचारदेखील करणारे, संवेदनशील लोक या क्षेत्रात उतरायला हवेत. पण हे सारं कुणी करायचं. मी स्वतर्लाच म्हटलं की तूच करून बघ! याच विचारानं माझ्या मनाची घट्ट पकड घेतली. आसपासची कुचेष्टा, टोमणे याकडे दुर्लक्ष करून मी शेवटी शेतीत उतरलो.
माझी तीन स्पष्ट उद्दिष्ट होती. 1) माझ्या पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन चांगलं हवं.2) ती चांगल्या भावानं विकता यायला हवीत. 3) पहिले दोन मुद्दे सिद्ध झाले की बाकी शेतकर्यांनाही त्याचा फायदा करून द्यायला हवा.
आज सात-आठ वर्षे झाली मी शेती करतोय. जैविक (ऑरगॅनिक) कृषी उत्पादनं सर्वोत्तम उत्पादन क्षमतेनं करण्याचा पहिला उद्देश साध्य झाला आहे. दुसर्या आणि तिसर्या उद्देशातदेखील, आसपासच्या शेतकर्यांच्या सहभागानं आणि अनेकांच्या मदतीमुळे आम्ही ‘पाटणकर फार्म प्रॉडक्ट्स’ची मध, जायफळ, मिरी, तूप, सुंठ इ. उत्पादनं ग्राहकांर्पयत पोहोचविण्यात समाधानकारक प्रगती केली आहे. ग्राहक आणि शेतकरी यांमध्ये एक अदृश्य भिंत असते ज्यामुळे ग्राहकांना शेतीत चांगलं-वाईट काय चालू आहे हे समजत नाही आणि शेतकर्यांनादेखील ग्राहकांना नक्की काय हवंय, काय मिळतंय आणि मालाला भाव का नाही ते समजत नाही. मी शेती करणं, शेतमाल ग्राहकांर्पयत पोहोचवणं, तो विकणं आणि स्वतर्देखील शहरातील ग्राहक असल्यामुळे ही भिंत पारदर्शक करणं असा प्रयत्न मी करतो आहे.
ते जमलं कसं, चुकलं काय, याविषयी पुढच्या लेखात...