- प्रज्ञा केळकर-सिंगपुण्यातील जनता वसाहतीचा परिसर. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची. भवतालचं वातावरणही अस्वच्छ, असुरक्षित. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी धुण्याभांड्याची कामं करून गुजराण करणाऱ्या, महिला आणि मुली. दिवसभर कामं उपसूनही फार काही पैसा हाताशी लागत नव्हताच. काटकसर, हलाखी नि कष्ट या साºयातून जाणारी अमिता कदम हे सारं पाहत होतीच. तिनं मग ठरवलं की, आपण काही वेगळं काम करू. असं काम, जे नव्या काळात समाजाची गरज आहे. मग तिनं वस्तीतल्याच तरुण मुली, महिलांना गोळा केलं. त्यांना नव्या कामाची माहिती देत, आत्मविश्वासही दिला की, आपण हे काम करू शकू. आपण स्वत:ची काळजी घेतो तशी इतर महिलांना संरक्षण देऊ शकू. त्यासाठी हे नवीन काम करू. आणि त्यातून या मुलींचा ग्रुपच उभा राहिला.त्या आता महिला बाउन्सरचं काम करतात. स्वामिनी ग्रुप असं त्यांच्या गु्रपचं नाव. ५० महिला मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊन, त्यांचा आत्मविश्वास जागवत हा ग्रुप आता महिला बाउन्सर म्हणून काम करतो. शहरातले विविध इव्हेण्ट्स, राजकारणी, सेलिब्रिटींचे कार्यक्रम ते अगदी कॉलेजमधील विविध इव्हेण्ट यांना हा ग्रुप महिला बाउन्सर म्हणून सिक्युरिटी पुरवतो.खरं तर बाउन्सर म्हटलं की काय येतं डोळ्यासमोर?धिप्पाड, भारदस्त, शरीर कमावलेले, काळा कोट किंवा काळा तंग टी-शर्ट घातलेले, पिळदार बाहुंचे पुरुष. मेट्रो शहरातले विविध क्लब, विशेषत: नाइट क्लब ते अगदी लॉन्सवरील विविध शाही लग्न ते बड्या स्टार्सचे सिक्युरिटी. इथं हे बाउन्सर दिसतात. नाचून-पिवून अनेकदा बेहोश होणाºया पब्लिकला ताळ्यावर ठेवणं आणि कार्यक्रमात सिक्युरिटी राखणं, काही गडबड होणार नाही हे पाहणं, कुणी गडबड केली, पंगे घेतले, राडे झालेच तर ते निस्तरायचं कामही या बाउन्सरकडेच असतं. हे सारं झगमगाटी जग रात्रीच जागं होतं त्यामुळे काम रात्रीच सुरू होतं. इतकी वर्षे पुरुष हे काम करत होते, आता फीमेल बाउन्सरही दिसायला लागल्या. बदलत्या नाइट लाइफ कल्चरचा प्रभाव ते बदलता साजरीकरणाचा कल पाहता महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला बाउन्सरचीही गरज निर्माण झाली. एक नवीन व्यावसायिक संधीच ती. ही नवीन संधी अमितानं हेरली आणि ‘स्वामिनी ग्रुप’ स्थापन करत लेडी बाउन्सरची एक फळी तयार केली. लेडी बाउन्सर म्हणून त्यांनी आपला एक आगळा दबदबाही या क्षेत्रात निर्माण केला आहे.अमिता कदम सांगते, ‘माझ्या बहिणीचे पती बाउन्सर म्हणून काम करायचे. त्यामुळे बाउन्सरचा दबदबा माहीत होता. जनता वसाहतीत राहत असल्यानं येथील स्त्रियांची हाता-पोटाची लढाईही मी रोज पाहत होते. धुणीभांडी असे काम करूनही पुरेसा पैसा हाती येत नव्हता. विविध संसारी गोष्टींचा दररोज सामना करावा लागायचा तो वेगळाच. पण या बायका मुळुमुळु रडत बसणाºया नव्हत्या. परिस्थितीशी झगडून त्या कणखर झाल्या होत्या. त्यांचा हाच कणखरपणा योग्य दिशेने वापरता आला तर वेगळं काम करता येईल आणि रोजगाराचा प्रश्नही सुटेल अशी कल्पना माझ्या डोक्यात आली. त्यातूनच ‘लेडी बाउन्सर’ची ही कल्पना सुचली आणि सुमारे दोन वर्षांपूर्वी प्रत्यक्षात त्या दिशेनं काम सुरू केलं.’२९ वर्षांची अमिता स्वत: पदवीधर आहे. वयाच्या अठराव्या वर्षीच तिचं लग्न झालं. आता तिला १२ वर्षांचा एक मुलगा आहे. तिच्या पतीचा लॉण्ड्रीचा व्यवसाय. मेव्हण्यांचं बाउन्सर म्हणून काम करणं ती पाहत होतीच त्यात ती सलमान खानची फॅन. त्याच्या बाउन्सरच्या कहाण्या ती ऐकत वाचत होतीच. लग्नानंतर तिनं चिकाटीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. पदवी मिळाली; पण नोकरी मिळाली नाही. या साºया काळात तिच्या डोक्यात आलं की पुरुष बाउन्सरची गरज आहे, तशीच आता बदलत्या काळात महिला बाउन्सरचीही गरज आहे. मग तिनं ठरवलं आपणच हे काम करू. तिनं पतीला कल्पना सांगितली, त्यांनीही पाठिंबा आणि प्रोत्साहन दिलं आणि अमितानं प्रत्यक्षात बाउन्सर म्हणून मुलींना तयार करण्याचं काम सुरू केलं.अमिता सांगते, ‘लेडी बाउन्सर ही कल्पना चांगली असली तरी या महिला तयार होतील की नाही, अशी शंका वाटत होती. दुसरीकडं या कामाची आता गरज आहे हे माझ्या लक्षात यायला लागलं होतं. बायकांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे यात तर काहीच शंका नव्हती. मी नवºयाशी बोलले, पुरुष बाउन्सर आहेत तशा महिलाही हव्यात. त्यानं महिलांना सुरक्षा देणं, सुरक्षित वाटणं अधिक सोपं होईल. त्यांनाही ही कल्पना पटली. पण प्रश्न होता, अवतीभोवतीच्या महिलांना या कामाचं, नव्या क्षेत्राचं आणि संधीचं महत्त्व पटवून देणं. त्यासाठी खूप आटापिटा करावा लागला. ज्या मुलींशी, स्त्रियांशी मी संपर्क केला त्यापैकी काहींच्या कुटुंबातील सदस्यांनीही खूप विरोध केला. मी त्यांची जबाबदारी घेईन, अशी खात्री मी वारंवार दिली. पटवून दिलं की आपल्याकडे शारीरिक आणि मानसिक ताकद आहे, आत्मविश्वास आहे. या नव्या क्षेत्रात काम केल्यानं रोजगार उत्तम मिळेल, सन्मानाने जगता येईल. खूप प्रयत्न केल्यानंतर फक्त तिघी जणी तयार झाल्या. पण सुरुवात तर झाली. कामाचं स्वरूप, प्रशिक्षण अशा टप्प्यांवर तयारी सुरू झाली. स्वसंरक्षणाचे धडे, आत्मविश्वास, आहारविहार, व्यायाम अशी सारीच तयारी सुरू केली. हळूहळू आमच्या कामाची खात्री महिलांनाच वाटू लागली. मग त्यांचीही संख्या वाढली. महिलांची संख्या हळूहळू वाढत जाऊन आता ५० पर्यंत पोहोचली आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड, बारामती अशा विविध भागांमधील महिला आणि तरुणी स्वामिनी ग्रुपमध्ये आता काम करतात.एक साधी वस्तीत राहणारी तरुणी/महिला ते लेडी बाउन्सर हा प्रवास करताना एम बाउन्सर टीमचे योगेश मानकर, अजित इनामदार, रिशी पाल, महेंदर सर यासह अनेकांची खूप मदत मिळाली. त्यांनी महिलांना स्वसंरक्षणाचं उत्तम प्रशिक्षण दिलं. कराटेही शिकवलं. संवाद कौशल्य, नेमकं कसं बोलायचं याची रीत, इंग्रजी बोलणं हे सारंही आम्ही एकेक करत शिकलो. प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला. विविध कार्यक्र मांसाठी बाउन्सर म्हणून येण्याची आम्हाला विचारणा होऊ लागली. सुरु वातीला काही लोकांना वाटलं की या महिलांना हे काम जमेल का, काहींनी थेट विचारलं नाही तरी त्यांच्या चेहºयावर शंका/संशय दिसायचा. इव्हेण्ट देताना जरा साशंकच असायचे लोक. हळूहळू परिस्थिती बदलत गेली. एका इव्हेण्टला एका महिलेला आता साधारण सातशे ते हजारभर रुपये मिळतात. महिन्याला आता आम्ही साधारण १० -१५ कार्यक्रमांचं कंत्राट मिळतं. प्रत्यक्ष कामाचा अनुभव वाढला तशा आता आमच्या महिला बाउन्सर अत्यंत आत्मविश्वासानं काम करतात, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत आता आम्ही कमावली आहे.’काम सुरू तर झालं; पण रात्रीबेरात्रीचं असतं हे काम अनेकदा. घरी यायला पहाट होते. जिन्स, काळा टी-शर्ट हा त्यांचा गणवेश. गर्दीला आवर घालणं, महिलांच्या गर्दीचं योग्य नियोजन करणं हे त्यांचं मुख्य काम. आता यासाºयाजणी आपल्या तब्येतीचीही काळजी घेऊ लागल्या आहेत. पूर्वी अनेकजणी जेमतेम पोळीभाजी जेवत, आता त्या अधिक प्रोटीनयुक्त पदार्थ, दूध, फळं खाऊ लागल्या आहेत. व्यायाम करत आहेत. मुलांच्या उत्तम शिक्षणाची, आपल्या उत्तम आर्थिक परिस्थितीची स्वप्न पाहत आहेत. त्यातल्या काहीजणी तर कॉलेजमध्ये शिकून आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. दिवसा कॉलेज आणि रात्री बाउन्सर म्हणून काम करत आहेत. पुढं जाऊन पोलीस आॅफिसर व्हायचं स्वप्न पाहणाºयाही काही मुली आहेत. काहीजणी पूर्वी घरकाम करत चारघरी, आता हे काम करून चार पैसे जास्त कमवत आहे. त्यांची मुलंही आईच्या कामाकडे सन्मानानं पाहत आहेत.अमिता सांगते, अमुक काम पुरुषाचं, तमुक बायकांचं हे गृहीतकच आम्ही मोडलं. आम्ही आमचं काम उत्तम करतो. महिलांची काळजी घेतो. विविध इव्हेण्ट, लग्न यांची सुरक्षितता चोख ठेवतो. पोलीसही आम्हाला उत्तम सहकार्य करतात. प्रतिसाद, एफआयआर अशा विविध अॅप्लिकेशनच्या माध्यमातून महिलांना स्वसंरक्षणाचे विविध पर्याय वापरण्याबाबतचे धडे त्यांच्याकडून दिले जात आहे. सध्या होमगार्डचे ट्रेनिंग सुरू असून, एनसीसी, स्काउट गाइड, पोलीस भरतीतील तरुणीही ‘स्वामिनी’मध्ये सहभागी होत आहे.स्वत:च्या पायावर उभं राहत, सन्मानानं काम करण्याची एक संधी नव्या लाइफ स्टाइलने या मुलींना दिली आहे. आणि त्यांनीही ती खमकेपणानं स्वीकारली आहे, हे विशेष!
रणरागिणी बाउन्सर‘स्वामिनी ग्रुप’प्रमाणेच पुण्यात दीपा परब यांनीही ‘रणरागिणी लेडी बाउन्सर ग्रुप’ प्रत्यक्षात साकारला आहे. दीपा परब यांचं पोलीस होण्याचं स्वप्न होतं. परंतु काही करणास्तव त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. दोन वर्षांपूर्वी त्यांनी काही महिलांना घेऊन एक बाउन्सर टीम तयार केली. विविध अडचणींवर मात करत त्यांनी एकूण ४२ महिलांना एकत्र आणलं आहे. या टीममधील महिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा गृहिणी आहेत. त्यांना शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने योग्य प्रशिक्षण दिलं जातं. पुण्यासारख्या शहरात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक कार्यक्रम होत असतात, मोठमोठे फॅशन इव्हेण्ट्स, सांस्कृतिक, चित्रपट इव्हेण्ट्स होत असतात. खासकरून महिलांचे अनेक कार्यक्र म होत असतात. त्यासाठी या बाउन्सरही काम करतात. pradnya2211@gmail.com