- प्राची पाठक
.. हे कधी साफ करणार?
दिवाळी आणि साफसफाई यांचं नातं आहेच. सगळीकडे स्वच्छता-चकाचक सफाई झाल्याशिवाय दिवाळीचा फील येतच नाही. नकोशा वस्तू घरातून काढल्या जातात. नवीन वस्तू घरात येतात; पण ही एवढीच म्हणजे सफाई का? यंदा दिवाळीपूर्वी सफाईचाही वेगळा विचार करू.
१. दिवाळीच्या काहीच दिवस आधी दसऱ्याला आपापली गाडी धुऊन काढून तिला हारबीर घालायला लोकांना आवडत असतं; पण त्यातल्या डिक्कीत आणि इतर कप्प्यांमध्ये अनेक वस्तू पडलेल्या असतात. अगदी सायकलीच्या सीटखालीदेखील जीर्ण फडकी कोंबून ठेवलेली असतात. असा कचरा आपण वरचेवर आवरत नाही. आता यानिमित्ताने दुचाकीची डिक्की नीट साफ ठेवायला शिकू शकतो.
२. सायकली, दुचाकी ह्यांची सीट्स फाटलेली असू शकतात. ती बदलून घेऊ शकतो. सुट्टीमध्ये घरीच गाडीची सर्व्हिसिंग, जरासं ऑइलिंग, ग्रीसिंग करायला शिकू शकतो. या जराशा वेळीच झालेल्या मेंटेनन्समुळे गाडीच्या लहानसहान कुरबुरी नाहीशा तर होतातच, पण तिचं आयुष्यदेखील वाढतं.
३. घराच्या सर्व खोल्यांची साफसफाई झाली तरी बाल्कन्या, खिडक्या, दारं वगैरेंच्या कानाकोपऱ्यांची स्वच्छता मात्र होईलच असं नाही. कुठलेसे स्टिकर्स चिकटवून ठेवलेले असतात. खिडक्यांच्या कट्ट्यांवर अनेक वस्तू येता- जाता ठेवल्या जातात. कुठून कुठे कधी काळी बांधलेल्या दोऱ्यांचे तुटलेले धागे लटकत पडलेले असतात. अगदी संडास, बाथरूमच्या काचा-खिडक्यांपासून ते बाल्कनीतल्या कानाकोपऱ्यांपर्यंत कुठे-कुठे काय-काय आपण सहजच दडपून ठेवत असतो, त्याचा आढावा घ्या. किती कचरा ह्या जागांमधून काढून बाहेर फेकता येईल, ते आपल्या लक्षात येईल.
४. नकोसं सामान तात्पुरतं नजरेआड करायच्या अनेक जागा घरात, घराबाहेर असतात. कपाटांच्या वरती सामान टाकत जाणं. माळ्यावर सामान कोंबत जाणं. घराच्या अंगणातले कोपरे अशा सामानाने व्यापून ठेवणं. अशा सर्व कानाकोपऱ्यांवर एक नजर फिरवता येईल आणि नकोसं सामान काढून टाकता येईल. अनावश्यक असा किती पसारा आपण उगाच साठवून ठेवलेला असतो, ते आपल्या लक्षात येईल.
५.आपले जे कपडे आपण वापरत नाही, ते कपटांमध्ये कोंबून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. इतके कपडे असूनही कुठे जायचं असेल, तर ‘घालायला काहीच धड नाही’, ही तक्रार आजन्म सुरूच राहणार असते. त्यामुळे, आहेत ते कपडे पुरेपूर वापरून काढून टाकल्यावरच नवीन कपडे आणायचे, अशी सवय आपण स्वतःला लावून घेऊ शकतो.
६. आपल्या बॅगा, पर्सेस, शूज, चपला हेसुद्धा चकाचक, नेटकं करता येतं. रोजच्या वापरातल्या बॅगा, पर्सेस, सॅक ह्यांची थोडीशी दुरुस्ती करून घेता येते. त्यातलं नकोसं सामान काढून टाकता येतं.
७. अनावश्यक किंवा अर्धवट वापरलेले कॉस्मेटिक्स, उगाचच साठवून ठेवलेली औषधंदेखील नीट तपासून घरातून काढून टाकता येतात. एक्सपायरी उलटलेले कितीतरी औषधं, क्रीम्स, तेलं, गोळ्या, पावडरी घरात पडलेले असतात. त्यांना एकदाची मुक्ती देऊन टाकावी.
८. घराची साफसफाई करतानाच आजकाल आपल्या मोबाइल्समधला कचरा दूर करणं, स्पेस रिकामी करणं हे ही एक कामच होऊन बसलेलं आहे. अनावश्यक फोटोज, व्हिडीओज, फॉरवर्ड्स, नंबर्स हे सगळं डिलीट मारणंदेखील तितकंच आवश्यक होऊन बसतं. बघू-बघू, काय भारी आहे, लागेल कधीतरी करत खूप डेटा आपण पेन ड्राईव्हज, हार्ड डिस्कमध्ये कोंबून ठेवलेला असतो. आवडणारी गाणी डबल- डबल सेव्ह होऊन जागा अडवून बसतात. त्यांनाही उडवत जाणं, हे एक कामच होऊन बसलेलं आहे. या सर्व सफाई अभियानाची सुरुवात अधूनमधून करत राहावीच लागते. दिवाळीचं आणखीन एक निमित्त!!
(प्राची मानसशास्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्राची अभ्यासक आहे.)
prachi333@hotmail.com