- रचना साठे
मी सातवीत असताना पहिल्यांदा योग माझ्या जगण्यात आला. तेव्हा मी योगासनं करायला लागले. शाळेत व्यायामाच्या तासाला, मैदानावर योगासनं करायचे. स्ट्रेचिंग, योगासनं करायला मला आवडायची. किती लवचिक आहेस, किती छान करते अशी शाबासकीही मिळायची. पुढे करिना कपूरच्या निमित्तानं कळलं की, योगासनं, पॉवर योगा करून कसं तिनं आपलं वजन कमी केलं. त्यातूनही योगासनं करत राहण्याचा माझा सराव कायम राहिला.दरम्यान, मी कायद्याची पदवी घेतली. एका कॉर्पोरेट फर्ममध्ये कामालाही सुरुवात केली. साधारण डिसेंबर 2016 च्या आसपासची ही गोष्ट. त्याच दरम्यान मला एक योगशिक्षक भेटले. त्यांनी मला एका टीचर्स ट्रेनिंग कोर्सची माहिती दिली. अर्थात योगाचा कोर्स. मला त्याचं फॅसिनेशन वाटलं. मी योगासनं करतच होते, या विषयात अधिक खोलात जाऊन अभ्यास करावा असं मनात होतंच. म्हणून मग मी मदुराईच्या शिवानंद योगा वेदांत सेण्टर इथल्या त्या कोर्सला प्रवेश घेतला. स्वामी विष्णूदेवानंद यांनी त्या आश्रमाची स्थापना केली आहे. त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी काही प्रवेशपरीक्षा नव्हती, हे ऐकून मला जरा नवलच वाटलं. पण पुढे आश्रमात त्याचं उत्तर मिळालं. स्वामी विष्णूदेवानंद म्हणाले, नुस्ती शारीरिक परीक्षा नाही ही, त्यापलीकडे मानसिक, आत्मिक स्तरावरची ही परीक्षा आहे. एकदा तुम्ही मानसिक, भावनिक पातळीवर तयार असला की तुम्ही आपोआप इथवर पोहचता.या आश्रमातलं जगणं सोपं नव्हतं. त्यावेळी खर्या अर्थानं स्वामिजींच्या शब्दांचा अर्थ कळला. सुरुवातीला वाटलं, काय महिनाभराचा तर अभ्यास आहे. ते झालं की, मीही योगा टीचर होईल. पण अभ्यास सुरू झाल्यावर तो एक महिना एक नाही दोन वर्षासारखा भासू लागला. पारंपरिक गुरु-शिष्य परंपरेप्रमाणे इथलं शिक्षण सुरू झालं. केवळ योगासनं नाही, तर स्वतर्शी संवाद साधत, विविध कामं करत एक उत्तम व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रवास सुरू झाला. टीचर्स ट्रेनिंग कोर्स (टीटीसी) हा एक वेगळा, समृद्ध करणारा अनुभव होता. इतका वेगळा की त्यावेळचा एकेक क्षण मला बरंच काही शिकवून गेला. योग शिरोमणी हा अभ्यासक्रम तिथं मी यशस्वीरीत्या पूर्ण केला.तिकडून परत आल्यावरचा निर्णय जास्त महत्त्वाचा होता. मी ठरवलं की, यापुढे योग या विषयातच करिअर करायचं. योगशिक्षण द्यायचं. त्याप्रमाणे मी योग शिकवायलाही सुरुवात केली. ते शिकवताच मी योग अधिक चांगला शिकतेय असं मला वाटतं. योग्यवेळी आपण योग्यस्थानी आहोत, योग्य माणसांसोबत काम करतोय असं मला वाटू लागलं. या जगाला या कामाची गरज आहे असं वाटलं. आपलं मन स्थिर ठेवून, आपली ऊर्जा योग्य जागी लावणे, उत्तम सक्षम चॅनलाइज्ड करणं याची गरज आहे.दुसरीकडे असंही वाटतं की, प्रत्येकाला एका शिक्षकाची, मित्राची गरज असते. अशी व्यक्ती जिचं मैत्र निरपेक्ष असतं. त्याला तुमच्याकडून काहीही नको असतं, फक्त तुमचं भलं व्हावं हीच इच्छा असते. ती व्यक्ती जजमेण्टल होत नाही उलट तुम्हाला समजून घेते. तुमची परिस्थिती, मनस्थिती समजून घेऊ शकते. योग आपल्यासाठी तोच मित्र आहे. तोच सांधा आहे, मनाला शरीराशी जोडणारा. उदाहरणार्थ, एखाद्या दिवशी आपण सहज पुढे वाकून पश्चिमोत्तासन उत्तम करतो. पण आपल्या मनावर खूप स्ट्रेस असेल त्यादिवशी आपल्याला हे आसन करताना ताण जाणवतो. कारण आपल्या मनावर आलेल्या ताणामुळे आपल्या शरीरातले मसल्सही स्टिफ झालेले असतात. हे मनाचं आणि शरीराचं नातं योग करताना समजून घ्यावं लागतं.योगशिक्षक म्हणून आपल्या मनाचं हे शरीराशी असलेलं नातं विद्याथ्र्याना उलगडून सांगावं लागतं. मनावर काम करावं लागतं. प्रत्येक श्वासासह, प्रत्येक विचारासह, प्रत्येक कृतीसह ही जागृतावस्था यावी असा प्रय} करावा लागतो.म्हणून योगशिक्षक व्हायचं तर विद्यार्थीच व्हावं लागतं. विद्यार्थी राहूनच योगविद्या शिकून, ज्ञानाच्या स्रोतांशी जोडून घ्यावं लागतं स्वतर्ला. कुठलाही जेमतेम कोर्स करून हे साधेल असं मला वाटत नाही. त्यासाठी उत्तम योग शिकवणार्या संस्थेत, उत्तम शिक्षकाकडून ते शिकायला हवं.तुम्ही कुठल्याही संस्थेतून कोर्स केला तरी आता शासकीय पातळीवरही योगशिक्षक म्हणून प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आयुष मंत्रालयातर्फे आता एक परीक्षा घेतली जाते. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र असेल, तर त्याद्वारे आपल्याला जागतिक पातळीवर काम करण्यास सक्षम मानलं जातं. स्वीकृती मिळते.हे सगळं एकीकडे. पण योगातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सराव. सेल्फ प्रॅक्टीस. आसन आणि प्राणायाम यांचा सराव सतत, नियमित करायलाच हवा. मन आणि शरीर यांना परस्परांशी जोडणारं हे ज्ञान, नव्या काळात ते शिकून घेतलं तर त्यातून मिळणारा आनंद हा पुरेपूर समाधान देतो. ते समाधानही मोलाचं आहेच.
(कायद्याची पदवीधर असलेली रचना योगशिक्षक आहे.)yogawaypune@gmail.com