- चिन्मय लेले
गाडी चालवताना, मान वाकडी करुन, कानात इअर फोनच्या वायरी खुपसून फोनवर बोलू नये हे सगळ्यानांच माहिती असतं. फोनवर बोलत बोलत गाडी चालवू नये, मान तिरकी करकरुन बोलू नये हा तर काय कॉमन सेन्सच आहे. मुळात गाडी चालवताना फोनवर बोलावं असा काय अर्जण्ट फोन कॉल आपल्याला येत असतो? आणि एखादा फोनजर इतकाच अर्जण्ट असेल तर गाडी बाजूला घ्यावी, शांतपणे त्या फोनवर काय बोलायचं ते बोलून घ्यावं आणि मग पुन्हा गाडी चालवावी हे सांगायला कुणी तज्ज्ञ कशाला हवा? पण नाही जगभरातच लोक फोनवर बोलण्यासाठी इतके आतूर असतात की, गाडी चालवताना थोडंसं दुर्लक्ष झालं तरी त्यात आपला जीव जावू शकतो हे त्यांच्या लक्षातही येत नाही. आणि हे फक्त आपल्याचकडे होत असं नाही, जगभरातल्या तरुणांना विचारा की, गाडी चालवताना फोन वापरणं कधी थांबवाल, उत्तर एकच, आमचा फोनवर बोलताना अॅक्सिडण्ट झाला तरच!अलिकडेच लंडनमध्ये एक सर्व्हे करण्यात आला. त्याचं नाव होतं बी स्मार्टफोन कॅम्पेन. म्हणजे काय तर स्मार्ट फोन वापरताना जरा स्मार्ट व्हा. लंडनमध्ये राहणाºया विविध देशातल्या, विविध धर्मा-वंशाच्या आणि स्थानिक ब्रिटिश तरुणांनाही हाच एक प्रश्न विचारण्यात आला की, गाडी चालवताना फोनवर बोलू नये हे तुम्हाला मान्य आहे का? आणि असेल तर तुम्ही का बोलता फोनवर?त्यावर १० टक्के मुलांनी सांगितलं की, गाडी चालवताना फोनवर बोलू नये असं आम्हाला वाटतं, पण अनेकदा सवयीनं बोलतो. ही सवय मोडायला हवी हे आम्हाला मान्यच आहे.उरलेल्या ३० टक्केंचं म्हणणं की, त्यात काय एवढं, आमचा गाडीवर उत्तम कण्ट्रोल असतो. काही बिघडत नाही बोललं तर? लगेच काय अपघात होत नाही.उरलेले ६० टक्के तर म्हणतात की, बोलू नये हे कळतंच आम्हाला. पण जोवर आमचा गाडी चालवत फोनवर बोलताना अॅक्सिडण्ट होत नाही, तोवर मात्र आम्ही असंच वागू. झालाच अपघात तर पुढचं पुढे!आता अशी बेर्पवाई असेल तर कुठं कुणाला सामान्य ज्ञान शिकवायचं आणि कुठं कायद्याचे धाक दाखवायचे नाही का? मनाचा ब्रेकच लागत नाही तिथं कोण काय करू शकतं?