- डॉ. प्रथमेश हेमनानी
मी बॉण्ड पूर्ण करायचं ठरवलं. म्हणजे काय तर तो पूर्ण करण्याचं बंधनच होतं. मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकलो, त्यानंतर वर्षभर ग्रामीण भागात जाऊन काम करणं सक्तीचं होतोच. मीच ठरवलं की आपण गडचिरोली जिल्ह्यात जाऊन काम करायचं. मलाच राज्यातल्या दुर्गम, आदिवासी भागात जाऊन काम करायचं होतं. भविष्यातही आपण आदिवासी भागातल्या आरोग्य सुविधांसाठी काम करू असं डोक्यात होतं. त्यामुळे मग आरोग्यनिर्देशांकात अगदीच मागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काम करायचं ठरवलं.माझे अनेक मित्र उच्चशिक्षण घेण्यासाठी जाणार होते. पीजीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होते. आणि मी बॉण्ड पूर्ण करायचं ठरवलं. निर्णय अर्थातच सोपा नव्हता. कारण माझ्या अवतीभोवतीचे अनेकजण वेगळंच काही ठरवत होते. बॉण्ड पूर्ण करू म्हणणारे फारच कमी होते. पण मी गडचिरोलीला जायचं ठरवलं. ‘एमओशिप’ घेतली. गडचिरोली जिल्ह्यातले आरोग्य सुविधांचे प्रश्न पाहून अस्वस्थही झालो. ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या आरोग्य सुविधांचं चित्र पाहून हादरलोच. जागतिक आरोग्यव्यवस्थेने सुचवलेल्या नियमांनुसार दरहजारी रुग्णांमागे किमान एक डॉक्टर पाहिजे (अर्थात हे प्रमाणही आदर्श नाही); पण आपल्या ग्रामीण भागात १७०० लोकांमागे एक डॉक्टर आहे. २०१५ च्या जागतिक आरोग्यसंस्थेच्या अहवालात ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. (प्रचंड लोकसंख्येच्या चीनमध्ये पण १६०० रुग्णांमागे एक डॉक्टर आहे.) ही आकडेवारी ढोबळ असली तरी बहुसंख्य डॉक्टर हे शहरांतच प्रॅक्टिस करतात. ग्रामीण भागात परिस्थिती बिघडत जाते. मी ज्या आरोग्य केंद्रात काम करतो, ते आरोग्य केंद्र आणि संलग्न केंद्रामध्ये मिळून ३ डॉक्टर आहेत आणि सुमारे १४,००० आदिवासींवर आम्ही उपचार करणं अपेक्षित आहे. म्हणजे माझ्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात एक डॉक्टर आणि ४ हजार रुग्ण असं प्रमाण आहे. पण हे बरं कारण नंतर लक्षात आलं की काही आरोग्य केंद्रांत तर डॉक्टरच नाहीत, जागा रिक्त आहेत. कारण एमबीबीएस झालेले अनेकजण हा बॉण्ड करण्यापुरतेही मेडिकल आॅफिसर म्हणून आदिवासी-ग्रामीण भागात येत नाहीत.सध्या जगभर माणसांना परवडेल अशा आरोग्य सुविधांची चर्चा आहे. आपण मात्र समाज म्हणून आजही अगदी सामान्य आरोग्य सुविधाही लोकांपर्यंत पोहचवू शकलेलो नाही. ७० वर्षे झाली स्वातंत्र्याला आपण आजही मलेरिया, डेंग्यू, टीबी यांसारख्या आजारांशी लढतो आहोत. (गेल्याच महिन्यात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगात टीबीचे सर्वाधिक मृत्यू भारतात होतात.) गडचिरोलीत तर मलेरियाची साथ सर्रास दिसते. अजूनही घरातच प्रसूती होतात, त्यात बाळं दगावतात. न्युमोनिया, सेप्सिस सारख्या आजारांना मुलं बळी पडतात. त्यात आरोग्य केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी वाहन व्यवस्था नसते, रस्ते नसतात. आणि त्यात रुढींचा पगडा. म्हणजे ज्या गावात १९८० पासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या गावचे आणि आजूबाजूचे लोकही अजून भगताकडे जातात, आणि दवाखान्यात येत नाही. अजूनही त्यांचा भगतावर जास्त विश्वास दिसतो, डॉक्टरवर नाही. हे फार हतबल करणारं आहे. कितीदा हे चित्र पाहून माझ्या पोटात कालवलं आहे.हे मान्य आहे की आपल्या देशात प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि केंद्राच्याही अनेक समस्या आहेत; पण त्या कुठे नाहीत. सगळ्याच क्षेत्रात प्रश्न आहेत. पण म्हणून बदल होत नाही असं नाही. ते होत आहेत. मी माझ्याच आरोग्य केंद्रात ते बदल पाहतोय. कधीही औषधं संपली, वैद्यकीय साहित्य नाही असं आता केंद्रात घडत नाही. मेडिकल आॅफिसर म्हणूनही आम्हाला शासनाकडून काही निधी मिळतात आणि ते प्राथमिक आरोग्य केंद्रात काही कल्याणकारी योजना राबविण्यासाठी आम्ही वापरू शकतो. काही औषधं, साधनं मागविण्यासाठी मी गरज पडेल तसा तो निधी वापरलाही आहे. वरिष्ठांनीही त्याकामी सहकार्य केलं. त्यांना भरवसा वाटला की हे नवीन डॉक्टर खरंच आरोग्य सुविधा देण्यासाठी मनापासून काम करत आहेत. नुस्ती ‘ड्युटी’च्या वेळा भरत नाहीत.या वर्षभराच्या एमओशिप बॉण्डने डॉक्टर म्हणून माझे व्यावसायिक कौशल्यही वाढवले, माणूस म्हणून तर मी खूप शिकलो. घरापासून लांब राहिलो. कनेक्टिव्हिटी अगदी जमते. वीज नसणं हे तर कायमचंच, तरीही या भागात माणसं कशी जगतात, एकमेकांसोबत असतात हे मी फार जवळून पाहिलं. घरी असताना वाय-फायचा स्पीड जरा कमी झाला तरी मी ब्रॉडबॅण्डवाल्यांना तातडीने फोन करून कामाला लावायचो. पण हे जग मात्र फार वेगळं होतं. म्हणून त्या एका वर्षानं मला शिकवलं की वीज असणं, घरात इंटरनेट, त्याचा उत्तम स्पीड हे सारं लक्झरी आहे. साध्याशा आरोग्य सुविधा मिळणं मात्र सगळ्यांसाठी गरजेचं आहे. आणि काहींना तर त्या परवडतही नाही, हाती पैसा नाही. आणि त्यासोबत आरोग्य व्यवस्थाही त्यांच्यापर्यंत पोहचत नाही.ती पोहचायला नको का?
( डॉ. प्रथमेश हेमनानी गडचिरोली जिल्ह्यातल्या पेंढारी प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल आॅफिसर वर्षभर काम केलं आहे. हे पेंढारी गडचिरोलीपासून ६० किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात आहे.)