- श्रुती मधुदीप
‘मला खूप खूप भेटावंसं वाटतं तुला. आज दिवसभर सोबत असलो तरी उद्या नव्यानं सोबत असावंसं वाटतं. कधी एकदा आपण भेटू असं वाटतं राहातं,’ - तो म्हणाला. ती क्षणभर लाजलीच. आपल्याला लाजताही येऊ शकतं हे तिच्या अलीकडेच लक्षात आलं होतं. ‘मग भेटायचं!’ - ती थट्टेनं त्याला म्हणाली. ‘हो मग ! - इतका भेटीन इतका भेटीन की.’ ‘हो ! हो !’ ती त्याला मधेच थांबवत म्हणाली. ‘ए, ऐक ना! तुला काल रात्नी माऊने माझे काढलेले फोटो दाखवायचेच राहिले. हे बघ!’ असं म्हणून तिनं त्याच्यासमोर गॅलरी ओपन करून रिसेंट फोटोजचा अल्बम काढून दिला. आपले असे वेगवेगळ्या कपडय़ातले, पोजमधले फोटो पाहून त्याचं वेड होणं तिला जाम मोहवून टाकत असे! प्रत्येकवेळी छान दिसावं, त्यानं आपल्याला पाहावं, आपल्यावर प्रेम करावं असं तिला वाटत राहायचं. तो फोटो पाहात होता नि ती त्याच्या चेहर्यावरच्या हावभावांकडे निरखून पाहात होती. फोटो बघताना कुठेतरी छोटंसं हासू, डोळ्यात आपण आवडल्याचे भाव तिला पाहायचे होते, साठवून ठेवायचे होते! तो अगदी मन लावून झूम इन, झूम आउट करून तिचे फोटो पाहात होता. पण त्याच्या चेहर्यावर नेहमीसारखे ‘आह!’ ‘वाह!’चे भाव उमटले नाहीत. मोबाइलमधली नजर वर उचलत तो तिला म्हणाला,‘हे फोटो खरे वाटत नाहीत गं! किती ग्लो झालीय स्किन. किती ते ब्यूटिफिकेशन. तू इतकी गोरी नाहीयेस. जानेदो ! काय करूया आता? कॉफी प्यायला जायचं?’ तो तिला तिचा फोन हातात देत म्हणाला. ‘हो.’ ती त्याला म्हणाली. आणि ती दोघं त्यांच्या आवडत्या कॅफेकडे निघाले. जाताना तो बराच वेळ तिच्याशी काहीतरी बोलत होता. ती त्याला ‘हं. हं.’ करत राहिली. तो असा प्रचंड मनापासून काहीएक सांगताना खूप देखणा दिसायचा, असं वाटायचं तिला, पण यावेळी ते वाटलं नाही. कॅफेमध्ये पोहोचल्या पोहोचल्या त्यानं त्यांच्या आवडत्या कॉफीची ऑर्डर दिली. आणि ‘.तर हे सगळं असं आहे, सुंदर मुली!’तिच्या चेहर्यावर एकदम प्रश्नचिन्ह निर्माण झालं. जणू ती ‘सुंदर मुलगी’ आपल्याला माहीत नाहीये, अशा फणकार्यात ती त्याला म्हणाली, ‘कोण सुंदर?’‘कोण म्हणजे काय? तू!’ - तो सहजतेने म्हणाला. ‘अच्छा! क्षणाक्षणाला मत बदलतं वाटतं तुझं.’- ती म्हणाली.‘अरे, हे काय नवीन?’‘मग! मघाशी नाही का म्हणालास, इतकी गोरी नाहीयेस तू, इतका ग्लो नाहीय तुझ्या स्किनवर.’ तिच्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखं वाटलं त्याला. ‘अगं, तेच तर सांगतोय मी, तू इतकी गोरी नाहीयेस, तुझी स्किन इतकी क्लीन नाहीय. तो कॅमेरा खोटं खोटं रूपडं बनवतोय ना तुझं! मग मला ती व्यक्ती ओळखीचीच वाटली नाही.’‘हं!’’- ती जरा घुश्श्यातच म्हणाली. ‘‘आणि बाईसाहेब! तुमच्या चेहर्यावर हे छोटे छोटे डाग आहेत, तुमचा रंग गोरा नसून सावळा आहे, यात काही अडचण आहे का ?’ - त्यानं विचारलं.‘मी कुठे असं म्हटलं!’ जणू आपल्याला त्या वाक्यातलं काही लागलेलं नाही अशाप्रकारे ती त्याला म्हणाली. ‘वेडू! तुझं सावळं असणं, तुझ्या चेहर्यावरले डाग तुला डिफाइन करतात! तुझं सौंदर्य आहे त्यात! तू गोरी असली असतीस तर कशी दिसली असतीस, असा मी विचार केला तरी मला नको वाटतं ते. तुझ्या सावळ्या असण्यात तुझ्यातल्या साधेपणाचं, हुशारीचं सौंदर्य आहे. तुला माहीत नाही, तू किती सुंदर आहेस ते!’ - तो म्हणाला. ‘गप्प बस’. - ती थोडीशी लाजत तरीही रागातच म्हणाली. ‘अगं, खरंच तर ! बघ पिरीअड्स सुरू असल्यानं फोड आहेत तुझ्या चेहर्यावर, तुझ्यातल्या स्त्नी असण्याच्या कारणातून उमललेत ते. हा तुझा गव्हाळ रंग, तो पांढरा नाहीय कारण तू काही बाहुली नाहीयेस फक्त गोरी गोरी पान! फुलासारखी छान! हो की नाही?’ त्यानं तिला बोलतं करण्यासाठी प्रश्न विचारला.‘ते सगळं ठीक आहे पण मी सुंदर दिसते फोटोमध्ये असं म्हणायला काय झालं होतं तुला ?’ तरीही लाडीक रागानेच म्हणाली ती त्याला. ‘कारण तू त्या फोटोमधल्यापेक्षाही खूप सुंदर दिसतेस! खूप सुंदर आहेस! तुझ्या असण्यातल्या सगळ्या खुणा तुझ्या या बोलक्या चेहर्यावर सापडतात बाबू! तुझा चेहरा तुझ्या असण्याचा आरसा आहे! तो जसा आहे तसा जास्त सुंदर वाटतो मला. कॅमेरा त्याला कधी टिपू शकतो की नाही, काय माहीत! पण तू आहेस तशी खूप सुंदर वाटतेस मला!’ - तो तिच्याकडे पाहत राहिला. तीही त्याच्या डोळ्यातली नजर आपल्यात साठवून घेता यावी, असं वाटून त्याच्याकडे पाहत राहिली. ‘‘म्हणून तू पावडर वगैरे लावलेली आवडत नाही मला. बघ! आज आल्या आल्या भेटलेली तू आणि तासाभराने पावडरचा इफेक्ट गेलेली घामेजलेली तुझी त्वचा, विस्कटलेलं काजळ, विस्कटलेले केस हे सगळं मला आता माझं वाटू लागतं, तेही एका तासाभराने ! कळतंय ?’’ - तो म्हणाला! ती त्याच्याकडे निव्वळ पाहत राहिली. आपण स्वतर्ला किती काळ आरशात पाहिलंच नाही की काय, असं वाटू लागलं तिला ! आपल्यापेक्षाही आपली ओळख या समोरच्या मुलाला झालीय, याचं आश्चर्य वाटलं तिला. या सार्या बोलण्यात तिच्या ओल्या झालेल्या डोळ्यांच्या कडा तिला जाणवल्या आणि तिला वाटलं, आता मी आणखीन सुंदर दिसत असेन! तिच्या डोळ्यांसमोरून ‘पाच दिन मे पाइये निखार’ म्हणणारी यामी गौतम, ‘इइ डाग’ करून ओरडणारी आलिया, क्लीन अॅण्ड क्लीअर स्किनची श्रद्धा कपूर तरळल्या आणि तिला वाटलं, किती दूर आहेत या स्वतर्च्या सौंदर्यापासून !इतक्यात त्यानं मोबाइलच्या कॅमेर्याचं ब्यूटिफिकेशन बंद करून तिचा फोटो काढला. आणि ती आणखीनच सुंदर दिसू लागली; पण तिला कळलेल्या सौंदर्याची जाहिरात नव्हती करता येत!