-अभिजित पानसे
आयपीएल म्हणजे ग्लॅमर आणि मनोरंजन. मैदानावर सतत कॅमेऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी कित्येक खेळाडूही इमेज कन्सल्टंटद्वारे किंवा पीआरद्वारे स्ट्रॅटेजीही तयार करतात. वर्षातून एकदा आयपीएलचा मेळा सजतो, अनेक खेळाडू स्वत:लासुद्धा कॅमेरा मॅग्नेट बनवतात. आयपीएलच्या सीझनसाठी वेगवेगळी सीजनल हेअरस्टाइल, हेअरकट, टॅटू करतात.
आयपीएल २०२० मध्ये चर्चेत असलेल्या या स्टाइल्स
१. महेंद्रसिंह धोनी. यंदा सगळ्यात मोठं आकर्षण होतं. त्यानेही ग्रॅण्ड एण्ट्री मारताना लूक्ससह दाढीवर प्रयोग केले. दुराई सिंघम या तामिळ चित्रपटातील सूर्याप्रमाणे त्याने बिअर्ड कट केला. फ्रेंच कटला गालावर दोन्ही बाजूंनी एक्स्टेंशन दिलेला हा लूक धोनीच्या फॅन्सला भारी वाटला. तर मिमर्सला नवं खाद्य मिळालं. आयपीएल सुरू होण्याआधी धोनीचा पिकलेल्या केसांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्या पार्श्वभूमीवर धोनीचा हा न्यू बिअर्ड लूक ‘धोनी इज बॅक’ हा फील देणारा वाटला. त्याने हेअरकटदेखील बदलला होता. शाळेतील मुलाप्रमाणे छोटे केस ठेवत त्याने क्यूट व ॲटिट्यूड यांचा संगम साधला. मग आयपीएल मध्यावर आल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यात उतरताना धोनीचा एकदम वेगळा लूक समोर आला. आयपीएलच्या सुरुवातीचा लूक बदलून त्यानं वाढलेली दाढी व केस कट करून केसांचा झिरो कट केला आणि दाढी सपाचट केली. असाच हेअरकट व लूक त्याने २०११ चा वर्ल्डकप जिंकल्यावर केला होता. धोनीला ती स्टाइल लकी ठरली. शेवटी सलग तीन सामने सीएसकेने जिंकलेसुद्धा.
२. हार्दिक पांड्या. कायमच ऑन ग्राउण्ड आणि ऑफ द ग्राउण्ड स्वत:ला लाइम लाइटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. विविध हेअरस्टाइलचे प्रयोग तो आयपीएलमध्ये करतो. यावेळी त्याने आंद्रे रसेलसारखा हेअरकट केला आहे. तू खिलाडी मैं अनाडी चित्रपटामध्ये शक्ती कपूरच्या कंपूतील प्रमुख व्हिलनचा जसा हेअरकट होता तसाच हा आहे. डोक्यावर दोन्ही बाजूला वाळवंट व मधून नदी किंवा काळं वन अशी या दोघांची हेअरस्टाइल आहे.
३. दक्षिण आफ्रिकेची स्टेनगन, डेल स्टेन. यावर्षी पहिल्याच सामन्यात मिमर्सचं लक्ष स्वत:कडे वेधून घेतलं ते त्याच्या हेअरस्टाईलमुळे. मागे केस वाढवून हेअरबॅण्ड घालून तो मैदानात उतरला; परंतु तो अत्यंत महागडा आणि अपयशी ठरला. शिवाय यावर्षी रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोरने त्याला पुरेशी संधी दिली नाही. कधी लाल रंगाचा, कधी काळ्या रंगाचा हेअरबॅण्ड घालून डेल स्टेन खेळला; पण अपयशी ठरला. (मिमर्सचा आवडता अशोक डिंडासुद्धा हेअरबॅण्ड लावूनच बॉलिंग करायचा.)
४. ऑस्ट्रेलियन खेळाडू व सनरायजर्स हैदराबादचा तडफदार कॅप्टन डेव्हिड वॉर्नर. दरवर्षी डाऊन झिरो हेअरकट करतो; पण यावर्षी त्यानं खास भारतीय मिडलक्लास माणूस मिशी ठेवली आहे. हा मिनी डायनामाइट त्यात हॅण्डसम दिसत आहे.
( अभिजित ब्लॉगर आहे.)
abhijeetpanse.flute@gmail.com