- श्रुती मधुदीप
‘‘अरे, आहेस कुठं तू?’’ ‘‘आलोय. पोहोचतोच आहे.’’‘‘पण आहेस कुठं ?’’ ‘‘आलो. आलो.’’ असं म्हणत त्याने फोन ठेऊन दिला. ती कॅफेमध्ये केव्हाची त्याची वाट बघत होती. तीन-चारदा फोन केले तिने त्याला त्या अध्र्या तासात आणि तो फक्त ‘‘आलो आलो. पाच मिनिटांत. दहा मिनिटांत.’’ असं म्हणत होता. आता ती त्नासली होती. उठून निघून जावं किंवा तो ज्या रस्त्याने कॅफेकडे येतो तिथे त्याला शोधावं असं तिला वाटू लागलं. तो असा कधी न सांगता उशीर करायचा नाही म्हणून तिने स्वतर्ला सांगितलं ‘‘ठीक आहे. काहीतरी अडचण आली असेल. ट्राफिक लागलं असेल खूप. आजकाल त्या पुलाचं काम काढल्यापासून तिथलं ट्राफिक खूप वाढलंय.’’ तिने स्वतर्लाच धीर दिला. आणि तिने फोनमध्ये डोकं खुपसलं. मात्न तिला त्याच्या येण्याचेच वेध लागले होते. ‘‘अगं, ट्राफिक किती वाढलंय. सॉरी’’ स्वतर्च्यातच पुटपुटल्यासारखा तो तिला म्हणाला. तिने मोबाइलमधलं डोकं बाजूला घेत त्याच्याकडे पाहिलं तसं त्याने नजर चोरली. जणू समोरच्या खुर्चीवर बसण्यासाठी तिची परवानगी हवी असल्यासारखा तो खुर्चीभोवती घुटमळत राहिला. ‘‘अच्छा.’’ ती काहीशा अविश्वासानेच म्हणाली. ‘बस ना. असं काय करतोयस !’‘‘हो, बसतोय ना.’’ असं म्हणून तो अर्धा बसतोय ना बसतोय इतक्यात उठून म्हणाला, ‘‘थांब मी ऑर्डर करतो काहीतरी.’’ असं म्हणून तो ऑर्डर द्यायला गेला. तिला त्याचं हे वागणं विचित्नच वाटलं. इतक्यात तो दोन कॉफी घेऊन परतला. कॉफीचे मग पुढय़ात ठेऊन तो तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला. तिने त्याच्याकडे पाहिलं. तर त्याने कॉफीचा मग ओठांनादेखील लावला होता. तिला काय करावं तेच कळेना. ती त्याच्याकडे नुसतीच पाहत राहिली. त्याने चोरून तिच्याकडे पाहिलं तर ती त्याच्याचकडे बघत होती. हे पाहून त्याची नजर खाली गेली. तिला त्याचे डोळे पाणावल्याचा भास झाला. ‘‘काय लपवतोयस मघापासून तू?’’ -तिने त्याला विचारलं. ‘‘कोण? मी? कुठे काय! काहीतरीच !’’ तो तिच्या डोळ्यांत डोळे न घालता उत्तरला. ‘‘मी तुला विचारतेय, काय झालंय? खोटं बोलू नकोस हं प्लीज.’’ ‘‘अगं बाई ! काही नाही.’’‘‘उशीर का झाला यायला ?’’ ‘‘अगं ते ट्रॅफिक होतं ना.’’ ‘‘अच्छा. म्हणून तासभर उशीर झाला वीस मिनिटांच्या रस्त्याला?’’‘‘हं’’ ‘‘हं काय अरे ?’’‘‘तू काय माझी उलटतपासणी घ्यायचं ठरवलं आहेस का?’’ तो एकदम रागानं बोलला आणि क्षणात त्याच्या डोळ्यांतून खळकन पाणीच आलं. ‘‘ए असं काय करतोयस ? सांग ना काय झालं ?’’ तिने त्याचा हात हातात घेत विचारलं. त्याने त्याचे हात सोडवायचा प्रयत्न केला पण. ‘‘सांग ना रे, मी कुणी परकी आहे का? मी तुझी आहे ना!’’ ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून विश्वासाने त्याला म्हणाली. ‘‘तू परकी नाहीयंस गं पण, पण नको ना.’’ त्याने डोळे गच्च मिटले. तिच्या हातांना घट्ट पकडलं आणि तो बोलायचा प्रयत्न करु लागला.‘‘मी येत होतो कॅफेकडे. चौकात सिग्नल पडल्या पडल्या मी डावीकडे वळत असताना अचानक समोरचा एक मुलगा येऊन मला धडकला. मी खाली पडलो. म्हणजे मला काही फार लागलं नाही. पण त्याने मला शिव्या द्यायला सुरुवात केली. मला कळेचना. मी पण त्याला एक शिवी घातली. रागच आला मला खूप. पण मी उठतोय तोवर त्याने मला मारायला हात उगारला. आणि मी त्याच्याकडे पाहिलं तर.‘‘तर काय झालं रे?’’‘‘तर मला माझ्या बारीक शरीराची जाणीव झाली प्रिया. प्रिया मला समजलच नाही मी काय करु ? मीपण हात उगारला असता कदाचित पण मला जाणीव झाली की माझ्या शरीरात ती ताकद नाही जी त्या ताकदवान मुलामध्ये होती. माझी चूक नसताना मी त्याला सॉरी म्हटलं. म्हटलं, जाऊदे ना. कशाला एवढं मनावर घेतो. पण मला ते म्हणायचं नव्हतं. मला माझा राग व्यक्त करायचा होता प्रिया; पण मी त्या शक्तीपुढे नमलो ! माझ्या शक्तिहीनतेची मला जाणीव झाली. डोळ्यांत पाणीच आलं अगं. पण आजूबाजूचेही गंमत बघून हसणारे लोक मला दिसले. क्षणात मी कीक मारून निघालो. कुठे निघालो तेच कळलं नाही. मग तुझा चेहरा आला डोळ्यांसमोर. मला तुला भेटायचं होतं; पण मला भीती वाटली प्रिया.’’‘‘कसली भीती ?’’ तिने त्याच्या हातवरला हात आणखीन घट्ट केला. ‘‘तुला हे ऐकवल्यावर मला तू तुझा हिरो समजायचं बंद करून टाकशील असं वाटलं मला. खरं सांगू, रडू आलं प्रिया! काय माहीत मी का इतका इमोशनल झालो होतो आणि होतोय. पण प्रिया मला जाणीव झाली खरंच की, तुला बाकी लोकांपासून जपून ठेवायला, तुझं रक्षण करायला माझ्या म्हणून मर्यादा आहेत. मी हिरो नाही होऊ शकत गं तुझा.’’ हे म्हणून त्याने डोळे उघडले. डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहत होतं. त्याला जणू आपले डोळे स्वच्छ होताहेत त्या पाण्यानं असं वाटलं. ती उठली. तिने त्याला मिठीत घेतलं. आईच्या कुशीत जावं तसा बिलगला तो तिला. तिनं त्याचं डोकं आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं. तिचेही डोळे भरून आले होते. मग ती त्याला म्हणाली, ‘‘कोण कुणाचं आणि कशाकशापासून रक्षण करणार रे ? तू माझं रक्षण का करावंसं ? आपल्या आपल्या ताकदीवर आपण उभं राहावं. तू माझा आहेस आणि मला काय पाहिजे !’’ मग ती पुढे म्हणाली, ‘‘ तुला माहीत नाहीय, तूच माझा हिरो आहेस ते.’’‘‘अंहं तो म्हणाला. ‘‘जो मुलगा इतक्या प्रामाणिकपणे मी ‘हिरो’ नसल्याचं सांगतो त्याच्याइतका माझा हॅण्डसम हिरो कोण असणार आहे’’ -ती उत्तरली. ‘‘प्रिया’’ त्याने तिला हाक मारली. आणि तो पुन्हा तिच्या पोटाशी गेला..