बेदरकार गाडय़ा चालवणा-या तरुणांपेक्षा कित्येकपट चांगलं ड्रायव्हिंग मुली करतात!
स्त्रियांचं ड्रायव्हिंग हा कायमच चेष्टेचा विषय!
त्यांच्या ड्रायव्हिंगवर अनेक जोक्स होतात. त्यातही तरुणींना तर अजिबात गाडय़ा चालवता येत नाहीत, फोर व्हीलर कशाला टू व्हीलरही त्या घाबरत घाबरत चालवतात.
मुली चालवत असलेल्या टू व्हीलरला दोन लॅण्डिंग गिअर असतात, ते म्हणजे त्यांचे पाय, कुठंही वळायचे असो, स्पीड ब्रेकर येवो, थांबायचे असो, सिग्नल दिसो हे दोन लॅण्डिंग गिअर लगेच स्कूटरवरून खाली जमिनीच्या दिशेने धावतात. बाहेर तरंगतात..
असे जोक्स तर सर्रास होतात. जगभरातल्या पुरुषांचा हा समज प्रचलित आहे की, बायकांचं ड्रायव्हिंग कच्चंच असतं! त्यांना काही केल्या धड गाडय़ा चालवता येत नाहीत आणि बडबड करकरून, सूचना दे देऊन भंडावून सोडत पुरुषांनाही त्या धड गाडय़ा चालवू देत नाहीत!!
मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्येही मुलींच्या ड्रायव्हिंगवरून अमाप थट्टामस्करी केली जाते.
आणि मुली?
त्याही बिचकत बिचकत गाडी चालवत हमखास गाडय़ा कुठंतरी ठोकत असतात!
मात्र आता या सा-या समजालाच छेद देणारा एक अभ्यास प्रसिद्ध झालेला आहे.
अभ्यास आणि तोही ब्रिटिश! त्यामुळे त्या अभ्यासात मांडलेली निरीक्षणं गांभीर्यानं घेत आता याविषयात अधिक खोलात अभ्यास होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
लंडनमधलं एक अत्यंत ट्राफिकवालं बिझी जंक्शन आहे हाइड पार्क कॉर्नर!
ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर असलेले नील बीसन यांनी या टेस्ट तिथं घेतल्या महिलांसाठी आणि पुरुषंसाठीही!
उत्तम ड्रायव्हिंगसाठी आवश्यक 14 गोष्टी त्यांनी ठरवल्या होत्या. त्या 14 गोष्टींपैकी किती गोष्टी ड्रायव्हर उत्तम आणि सफाईनं सहज करतो याच्या त्यांनी चाचण्या घेतल्या.
त्यावेळी लक्षात असं आलं की या चाचण्यात महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त पॉइण्ट स्कोअर केले. पुरुषांचं ड्रायव्हिंग हे महिलांपेक्षा उत्तम तर सोडाच; पण त्यांच्यापेक्षा बरंच वाईट होतं!
हा अभ्यास असंही म्हणतो की, बरेच पुरुष झपाटय़ानं गाडी चालवतात, सुसाट निघतात, त्या तुलनेत बायका शांतपणो गाडी हाकतात. वाहतूक नियमांशी तर पुरुषांचं वैरच असावं, समोर पिवळा सिगAल दिसत असेल तर बायका शांतपणो गाडी चालवत स्पीड कमी करत सिगAलला थांबायची तयारी करतात. त्याउलट पुरुष, सिग्नलला थांबणं त्यांना अपमान वाटत असावा अशा स्पीडने ते पिवळा दिवा दिसताच जास्त वेगानं गाडी हाकतात. पिवळ्या दिव्याला जुमानतच नाहीत.
ज्यांनी ही टेस्ट घेतली ते बीसन सांगतात की, ‘‘ड्रायव्हिंगसारखं स्किल खरं तर पुरुष बायकांपेक्षा कितीतरी जास्त वेगानं आणि सफाईनं शिकतात. जे शिकले ते कुशलतेनं अमलात आणतात. आता मात्र या टेस्टवरून असं दिसतंय की, स्त्रिया उत्तम शिकू तर लागल्या आहेतच; पण नवनवीन कौशल्य प्राप्त करून त्या अधिक आत्मविश्वासानं आणि तरीही सुरक्षित ड्रायव्हिंग करत आहेत!!’’
हे सगळं वाचल्यावर असं वाटतं की, जग बदलतं आहेच! गरज आहे ती मुलींनीच आपल्यावर केले जाणारे रिमार्क्स गांभीर्यानं न घेता आणि आपलं ड्रायव्हिंग कच्चंच आहे असं न मानता, थेट आत्मविश्वासानं स्टेअरिंग हातात घेतलेलं बरं!!
- अंकिता जोशी