माणूस जन्माला आल्यापासून चालणं, बोलणं, लिहिणं, वाचनं कुणाचं ना कुणाचं बघून शिकतो. माणसाला समज येईपर्यंत शिकण्यासाठी इतरांची गरज भासते.
इतर व्यक्तींचा थोडका का होईना प्रभाव आपल्यावर पडत असतो. मग आपल्याला आवडत्या क्षेत्रात सगळ्यात भारी कोण? मग ते आपले शिक्षक असतात, एखादा नट-नटी असू शकते, एखादं राजकीय व्यक्तिमत्त्व असू शकतं, एखादा क्रिकेटरही असतो. भारतात तर पावलाला पन्नास आदर्श लोक भेटतील एवढी आदर्श व्यक्तींची घनदाट लोकसंख्या आहे. आवडत्या व्यक्तीच्या विचारधारेवरून चालणे, आवडत्या खेळाडूसारखी हेअरकट करणे, आवडत्या नटाच्या आगामी सिनेमातील शर्टासारखा शर्ट घालणे, राजकारण्यांसारखा अभ्यासूपणा नको तिथे दाखविणे अशा अनेक कृतींतून आपण त्यांना फॉलो करीत असतो.
पण, तरुण पोरापोरींच्या जगात एकदम ‘आयकॉन’ कायमस्वरूपी असतात किंवा आहेत असं काही असतं का?
१. खरं सांगायचं तर अलीकडे मिनिटाला एक नवा हीरो मिळू शकतो. गेल्या वर्षी एका प्रसिद्ध हिंदी अभिनेत्याच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर न्याय मागितला जात होता. रस्त्यावर, सोशल मीडियातून किती जणांनी न्याय हक्कांची मागणी केली, रडारड केली. आज त्या अभिनेत्याचा विसर पडू लागलाय. कारण
टीव्ही, पोर्टल, व्हॉट्सॲप विद्यापीठातून आपोआप येणाऱ्या माहितीआधारे तेवढ्यापुरते हीरो ठरविले जातात. तेवढ्यापुरतचे व्हिलन. काही दिवसांत पुन्हा मेमरी लॉस.
२. गेल्या दहा वर्षांत सोशल मीडिया ज्या वेगाने वाढून जगभरातील ढीगभर माहिती देतो आहे त्यामध्ये आपण तपासलं असेल तर लक्षात येतं की, इकडे एखादी चांगली गोष्ट करून व्यक्ती प्रसिद्धी पावली की दुसऱ्या टोकाला त्या व्यक्तीचे दोष शोधले जाऊन ‘तिकडचा विरुद्ध इकडचा’ असा गट तयार होतो, ट्रोलिंग होतं. आणि मग पुढे जाऊन दोन्हीकडचे लोक नवा विषय शोधून तिसऱ्याच लढाईला पोहोचतात.
३. राजकारण, क्रिकेट आणि सिनेमा या तीन गोष्टी भारतीयांचे जीव की प्राण आहेत. पण, आता दिवसाला नवनवे आयकॉन येतात. त्यात तरुण पिढीची काही चूक नाही. आयुष्यभर एखाद्यावर निष्ठा ठेवावी आणि कडेला जाऊन त्याचेच पाय मातीचे निघावेत, यापेक्षा ज्या व्यक्तीत जे चांगलं दिसतं, आवडतं, ते ते त्यांच्याकडून घेऊन आपला प्रवास गतिमान ठेवला जातो. पोरं अशी प्रॅक्टिकल झालीत आता.