प्रशासन, न्यायपालिका, माध्यमं
या तीन खांबांना बळकटी द्या, व्यवस्थेत शिरा !
चांगले नागरिक बना.
कॉलेजं ओलीस धरून ज्या लोकांसाठी
लढायचा तुम्ही आव आणताय
त्यांच्याचसाठी कॉलेजातून शिकून आधी बाहेर तर पडा.
वर्गाबाहेर मोर्चे-मोर्चे खेळून,
कॅम्पसवरच्या निवडणुकांमध्ये वेळ दवडून,
न्यायपालिकेने दोषी ठरवलेल्यांची श्रद्धं घालून,
आपली मुळं असलेल्या मातीच्या नापिकीचा दुवा मागून
आणि पाच वर्षाचा अभ्यासक्र म दहा र्वष रेटून
बदल घडत नसतात,
हे तुमच्या कधी लक्षात येणार?
अॅँग्री बर्ड्स नावाच्या एका खेळानं सात वर्षापासून नेटकरांना बांधून ठेवलंय. व्हच्यरुअल पक्ष्यांची व्हच्र्युअल अंडी व्हच्र्युअल डुकरांनी पळवून नेलीत. त्या पक्ष्यांचा व्हच्र्युअल संताप, व्हच्र्युअल सूड, व्हच्यरुअल बलिदान यावर कल्पनांचे इमले बांधले जाऊ लागले.
असाच एक अॅँग्री बर्ड्स खेळ ख:या आयुष्यातही अनेक पिढय़ा चालू आहे. ‘‘श्या.. सगळंच गंडलंय. ही सिस्टीम, हे शिक्षण, हे राज्यकर्ते, आपला समाज, आपले शेजारी, आपल्याला समजून न घेणारे घरचे, आपणही. बदल हवा. आत्ता हवा ! सुरु वात कुठून करावी? माहीत नाही. कुणापासून करावी? (हा प्रश्नही कसा पडू शकतो?) तेही माहीत नाही. पण पहिला दगड भिरकवायला तर हवा !! चला, क्र ांती करू !’’ (यानंतर जे काही केलं जातं त्यात क्र ांती कुठे येते हाही पिढीजात प्रश्न आहेच.)
आजूबाजूला जे सगळं दिसतं त्याला ‘व्यवस्था’ नाव पडतं.
ही ‘व्यवस्था’ इतकी सडलेली वाटते की, संतापाला तिचंच खतपाणी मिळतं. आपण सगळेच शोषित असल्याचा साक्षात्कार होतो. शोषितांच्या रागातून व्यवस्था कशी हादरवता येईल याचं स्वप्नरंजन होतं. सिस्टममधल्या शत्नूंची यादी बनू लागते.
लाल दिव्याची गाडी? शत्नू !
संगमरवरी माडी? शत्नू !
खाकीमधला माणूस? शत्नू !
टेबलावरचा कारकून? शत्नू !
केबिनबाहेरचा प्यून? शत्नू !
धर्माचे अनुयायी? शत्नू !
अमुकतमुकशाही? शत्नू !
अशी शत्नूंची ओळखपरेड होते, आणि त्यांच्यात व्यवस्थेचं सार पाहिलं जातं. अशा सत्ताकेंद्रांतून आलेलं अक्षरन्अक्षर जनताविरोधी असल्याचा समज दृढ केला जातो. केंद्रात सरकार कुणाचंही असो, ‘ये सरकार निकम्मी है’, ‘.नाहीतर खुर्ची खाली करा’, ‘अशा सरकारचं करायचं काय?.’ अशा घोषणांचे फलक घेऊन अनेक चेहरे मोर्चावर दिसू लागतात.
चला, मानूयात, चूक सिस्टमची किंवा व्यवस्थेचीही असतेच.
जगातला प्रत्येक भूभाग कुठल्यातरी व्यवस्थेच्याच मार्गदर्शनाखाली चालला आहे. अमेरिकेपासून इसिसव्याप्त प्रदेशार्पयत, आणि ब्रुनेईच्या राजवटींपासून सोमालियाच्या अराजकतेपर्यंत प्रत्येक नकाशाच्या रेषेआड आपली एक व्यवस्था आहेच. पण मग या संतप्तांना हवं असलेलं नंदनवन नांदतंय तरी कुठे? चीन, क्यूबा, रशियात? अफगाणिस्तान, टांझानिया, मेक्सिकोत? की इराक, सीरियात? तुमच्या प्रदेशांना भारतापासून स्वतंत्न करून कुठला पॅटर्न तिथे राबवणार आहात? ‘भारत की बर्बादी तक जंग’ लढल्यावर कुठल्या प्रदेशाच्या सुखाच्या व्याख्येत जगणार आहात?
भारतात ज्या व्यवस्थेचा दुरु पयोग करून तुम्ही देशाच्या विध्वंसाची शपथ घेऊन लढायच्या घोषणा देता, त्या व्यवस्थेला लोकशाही म्हणता, इतकं स्वातंत्र्य तुम्हाला हवी असलेली कुठली तरी व्यवस्था देईल का?
मग राग लोकशाहीवर कसा? तो लोकशाहीच्या पाईकांवर आहे का? लोकनियुक्त प्रतिनिधींवर आहे का?
ही लोकशाहीच त्यांच्या विध्वंसाची प्रार्थना करायचा अधिकार देते.
इतकंच कशाला? त्यांचा विध्वंस करायची शक्तीही लोकशाहीच देते. मतदानामार्फत !!
तुम्ही एकतर पूर्ण शक्तिनिशी मतदान केलं नाही, किंवा लोकांनी ज्या शक्तींना कौल दिला तो स्वीकारायचा खिलाडूपणा तुमच्यात नाही.
व्यवस्था बदलायचीय? लोकशाहीत राजकारणाच्या खांबातल्या किडीशी झुंजायचे तीन अजून पर्याय तुमच्यापुढे आहेत. लोकशाहीतल्या प्रशासन, न्यायपालिका, माध्यम या इतर तीन खांबांना बळकटी द्या, दर्जेदार वारस द्या. चांगले नागरिक बना. कॉलेजं ओलीस धरून ज्या लोकांसाठी तुम्ही लढायचा आव आणताय त्यांच्याचसाठी कॉलेजातून शिकून आधी बाहेर पडा.
त्यासाठी शैक्षणिकअर्हता लागते. ती शैक्षणिक संस्थांचं कामकाज बंद पाडून येत नाही. ती वर्गाबाहेर मोर्चे-मोर्चे खेळून येत नाही. ती न्यायपालिकेने दोषी ठरवलेल्यांची श्रद्धं घालून येत नाही. तुमची मुळं असलेल्या मातीच्या नापिकीचा दुवा मागून येत नाही. ती पाच वर्षाचा अभ्यासक्र म दहा र्वष रेटून येत नाही. ती निव्वळ कॅम्पसवरच्या निवडणुकांमध्ये वेळ दवडूनही येत नाही.
तुमच्या आवाजाचा देशाला उपयोग होवो न होवो, तुमच्या विद्येचा होईल. पण ती घ्यायला तुम्ही कॉलेजात जाताय का खरंच?
ही र्वष अशी घालवल्याचा फायदा एकच, की तितकीच र्वष फक्त उद्याच्या भाकरीची चिंता राहत नाही. मात्न तुम्ही ज्या सामान्यांसाठी लढायच्या वल्गना करताय, त्यांच्याच करावर जगल्याचे आरोप मात्न सोशल मीडियातून तुमच्यावर लादले जातील.
तुमचा राग देशावर आहे की इथल्या व्यवस्थेवर हे तुमचं तुम्हालाच उमजलं नसेल, तर तुमच्या विरोधालाही काय अर्थ राहतो?
तुमच्यापैकी मात्न जे खरंच भारतावर चिडले आहेत, त्यांनी आपल्याला आदर्शवत वाटणा:या देशात निघून जा. भारताने तुम्हाला तितपत पोसून पासपोर्ट दिला आहे. तोही तुम्हाला बाळगायची गरज नाही. आम्हा करदात्यांनी अनेक पुढा:यांची आयुष्यं समृद्ध केली आहेत. त्यात तुमच्या शिक्षणावर नी पोषणावर पैसा खर्च झाला त्याचंही आम्ही करदाते दु:ख करणार नाही.
आठवतं, गेल्या वर्षी एक व्हॉट्सॅप फॉर्वर्ड आला होता.
विवेक कोडमगुंडला नावाच्या 19 वर्षाच्या एका कोवळ्या पोराचे दोन फोटो.
एका फोटोत खांद्यावर सॅक, डोळ्यांवर चष्मा, जेमतेम मिसरूड, आणि एक साधा टीशर्ट असा तो, कायद्याच्या वर्गातून आलेला.
दुस:या फोटोत त्याचा लोळागोळा मृतदेह, एक डोळा खोबणीतून उघडलेला, अंगावर नक्षली गणवेश, शेजारी रायफल.
राजकीय कैदी ते वकील म्हणून नावाला आलेल्या अरु ण फरेराचा आदर्श विवेकसमोर असता, तर त्याने काळा झगा घालून स्वत:सारखे अनेक पथभ्रष्ट वाचवले असते. पण तसं त्यानं केलं नाही.
का? असा कुठला राग विवेकच्या मनात होता, ज्यातून त्याचा प्रवास इथे संपला? असा कुठला संताप होता, जो मेंदूत शिक्षणाऐवजी शिसं घालून निवला?
व्यवस्थेत शिरून बदल करू पाहणारा विवेक, याच संतापातून व्यवस्थेवर गोळ्या चालवायला निघाला आणि पडला.
त्याच्या निशाण्यावर असलेला भारत बर्बाद झाला नाही.
पण रोज अनेक विवेक मात्र बर्बाद होत आहेत.
तुमचाही संताप असाच असाध्य आहे का?
तुमचा विवेक कुठे आहे?
- योगेश दामले
(आठ वर्षं पत्रकारितेचा आणि व्यावसायिक लेखनाचा अनुभव.
सध्या कॉर्पोरेट क्षेत्रत सेवारत आहेत.)