- प्राची पाठक
ध्येय ठेव समोर..तो बघ तो, कसे यश मिळवले त्याने..तिने इतक्या लहान वयात काय उंची गाठली, नाहीतर तुम्ही...-असे डोस पाजणारे खूपच भेटतात. तरुण मुलामुलींना तर सर्रास असे डोस पाजले जातात.म्हणजे आपल्या अवतीभोवतीच्या तरुणांशी, मित्रांशी, मोठ्या माणसांशी सतत आपली तुलना. ही तुलना आपल्या घरचे, इतर तर करतातच. पण आपल्याही मनात ती सतत सुरू असते. ती पचवावी लागते. अशी तुलना करणाºयांना आणि स्वत:च्या मनालाही सांगायचं, ते आणि मी वेगळे आहोत !त्यात यश बिश मिळवणारे सेलिब्रिटी, खेळाडू, कलाकार, नटनट्या कोणकोण आपल्या परिघात येतात. कधी आपण कुणाला फॉलो करतो, कुणाच्या प्रेमात असतो. ‘ह्यांच्यासारखंच बनायचं बॉस’ असं ठरवतो. तर कधी आपल्या आयुष्यातले काही जण अशा कोणाकोणाला वेचून आपल्या आळसावर सोडून जातात. ‘तुम्ही लोळा घरात, ते बघा कुठे पोहोचले तुमच्या वयात’ हे लेक्चर पुन्हा फ्री देऊन जातात. असाच खूप भडीमार झाला आणि आपल्याकडून काही बरं होत नसेल, करिअर मार्गी लागत नसेल, परीक्षा सुटत नसतील, तर जाम वैताग होतो या यशस्वी लोकांचा.
त्यांचा आपल्याशी काहीही संबंध नसतो. पण फुकटफाकट आपल्याला त्यांचा आदर्श ठेवायला भाग पाडलं जातं. नुसते नाव कोणी काढले की आपण दूर पळू लागतो. तसा काही संबंध नसलेल्या व्यक्तीचा उगाच द्वेष, राग राग सुरू होतो. ‘पळ, त्याच्यासारखं यश मिळवायला पळ’, या घोषवाक्याचा कंटाळा येतो राव. माझी धाव वेगळी, त्याची वेगळी. आमचं फिल्ड वेगळं, समजून घ्या प्लीज, असं सांगावंसं वाटतं. इलाज नसतो. पण इथे आपल्याला नीट माहीत असतं ती वेगळी व्यक्ती आहे आणि यशस्वी असली तरी ती म्हणजे सर्व गुणसंपन्न पुतळा नाही !
कधीकधी आपणच कुणाला तरी आदर्श मानतो. आयडॉल, आयकॉन मानतो. तसंच व्हायचं असं ठरवतो.या आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तींना कोणीही आपल्यावर, आपल्या आळसावर सोडलेलं नसतं. कोणीही यांच्यासारखं बना, असा उपदेश दिलेला नसतो. अनेकदा या मंडळींची नावं आपल्या घरातल्यांना माहीतसुद्धा नसतात. क्वचित कधी आपल्या घराच्या कोपºयात त्यांचा फोटो लावलेला दिसतो. मोबाइलमध्ये स्क्रीनसेव्हर म्हणून कोणी झळकतो. काही जण केवळ दिसायला भारी, म्हणून, आपल्यावर असं कोणी प्रेम करणारं हवं म्हणून त्यांचे फोटो स्क्रीनसेव्हरवर झळकतात. ते काही कर्तृत्वासाठीचे आयकॉन्स म्हणून आपल्या मनात नसतात. त्यात त्यांच्या असण्या-दिसण्याचा, स्टाइलचा, कपड्यांचा जास्त संबंध असतो.
पण ज्यांना आपण काहीतरी बनण्यासाठी आदर्शवत मानतो, ध्येय समोर ठेवावं तसं डोळ्यासमोर ठेवतो, त्यांचं सगळंच आपल्याला लै भारी वाटत असतं. त्यांच्या विरु द्ध काहीही ऐकून घ्यायला आपण तयार नसतो. ते असं करूच शकत नाहीत, असं वागूच शकत नाहीत, अशी खात्री बाळगतो. खरंतर आपण त्यांचे फॅन म्हणून त्यांना फॉलो करत असतो. ते एका विषयातले कोणी भारी असतील. पण इतर वेळी इतर माणसं जशा चुका करतात, तशा त्यांच्याकडूनही होऊ शकतात, याचं आपल्याला भानच राहत नाही. आपण अनेकदा आपल्याही नकळत कोणाला ‘लै भारी ते भक्ती ते अंध भक्ती’ अशा चढत्या क्रमानं आपल्या मनोविश्वात आणून सोडतो. बसवतो. स्थापनच करतो.पण तसं करतानाही काही गोष्टी तपासून पहायला हव्यात. नाहीतर आपण स्वत:लाच शोधण्यात कमी पडू शकतो. तेव्हा कोणासारखं बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मी काय आहे, हे बघायचा समजून उमजून प्रयत्न करूनच स्वयंप्रेरणेची दिशा सापडू शकते! आपण आपल्यासारखं बनण्याचा प्रयत्न तर करून पाहू..
आदर्श मानताय ? पण काही गोष्टी लक्षात ठेवा..
एक-दोन-चार विषयांत खरोखर खूप मेहनत घेऊन यश सिद्ध केलेली व्यक्ती आपल्याला आवडते, आदर्श म्हणून समोर ठेवावीशी वाटते, हे तसं चांगलंच आहे. पण ती व्यक्ती इतिहासातली असेल, तर संदर्भ वेगळे असतात. आपलं आयुष्य आजचं असतं. इतिहासात किती आणि कशासाठी रमायचं त्याच्याशी रिलेट किती काळ करायचं ते ही ‘आपल्या वर्तमानात’, याचं भान पाहिजे. आपला आदर्श असलेली व्यक्ती एका कशात फार नाव लौकिक मिळविलेली आहे, म्हणजे तिचे सगळेच लै भारी, असं नसतं. ती कशावरही काहीही वागली, व्यक्त झाली, तर तेच अंतिम सत्य नसते, हे भान या आयकॉनवरच्या प्रेमात कुठेतरी सुटतं.कोणाच्या पाठी फार भारावून गेलं की दुसरा विचार, नवे काही, वेगळे काही आपण खुल्या मनानं फारसं बघू शकत नाही.आपलं कंडिशनिंग कोणामुळे आणि किती करायचं, करवून घ्यायचं हे आपण ठरवायला हवं.सध्याच्या वयाचा पट हा हे सगळे विचार करायचा सर्वोत्तम पट आहे. कोणी कितीही प्रभावी असले, तरी त्या प्रभावात भारावून गेल्यानं आपलं आजचं आयुष्य, त्यातली आव्हानं, आजचं जगणं किती सुसह्य होणार आहे, त्या प्रभावाचा आपल्या उत्कर्षासाठी आपण कसा वापर करणार आहोत, ते बघणं जास्त महत्त्वाचे आहे.एका कोणाला तरी आदर्श मानून इतकं मनाने वाहून घ्यायचं, ही गरज का आहे, याचाच खरंतर आपण विचार केला पाहिजे.आपल्याला कोणी फार आवडतं तर का आवडतं याच्या खोलात गेलं तर आपल्याविषयी काही महत्त्वाची माहिती आपली आपल्यालाच मिळू शकते.आपल्याला सुधारायची, अपडेट करायची, आपल्याकडे काय नाही हे तपासून पहायला हवं. आपल्याला इतरांमध्ये असलेलं काही इतकं आवडतं याचा शोध आपणच घेणं ही संधीदेखील त्यात असते.या संधीकडे डोळस नजरेनं फक्त बघता आलं पाहिजे.