- मिलिंद थत्ते
मागच्याच आठवडय़ात दुसर्या एका तालुक्यांत गेलो होतो. वयम् चळवळीचे पहिलेच प्रशिक्षण त्या तालुक्यातील युवकांनी आयोजित केले होते. अनेक गावांमधून तरुण आणि वयस्क माणसेही कायदा शिकायला म्हणून आली होती.त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या. ते सांगत होते. जमिनी आम्ही कसतो, त्यावर मालकी मिळवून देऊ असे साहेबांनी आम्हाला सांगितले होते. म्हणून आम्ही त्यांच्या मागे मागे गेलो. त्यांच्या पक्षाच्या पावत्या फाडल्या, मोर्चे केले, तरी हातात काही आले नाही. मग सरकारी साहेबांना भेटलो. फारेष्टचे साहेब, प्रांत साहेब यांना भेटलो. एका साहेबानी भेटच दिली नाही. दुसरे साहेब भेटले, ऐकून घेतले, लवकरच नियमानुसार कारवाई करू म्हणाले. आता एक वर्ष होत आले. ते साहेब बदली होऊन गेले. आता पुन्हा दुसर्या साहेबांना भेटायला गेलो, तर ते म्हन्ले - आता ते सगळं मला बघावं लागेल. असं लगेच काही सांगू शकत नाही. मग आम्ही एक महिन्याने पुन्हा गेलो, तर रावसाहेब म्हन्ले की साहेब मीटिंगमध्ये आहेत. उद्या या. अशेच नेहमी सांगतात हो ते! एक तर आमची पोरं बाहेरगावी शाळेत आहेत, घरी बैल चारायला कोणी नाही, एकसारखं तालुक्याला खेटे मारायचे तर कसं परवडणार आपल्याला?’त्यांचं ऐकून तुम्हाला काय वाटलं? काय करायला हवं त्यांनी?शासनात तीन प्रकारचे साहेब आढळून येतात. भाऊसाहेब, रावसाहेब, अन् साहेब! भाऊसाहेब म्हंजे आपल्यासारख्या सामान्य खेडूताला जे एकसारखे दिसतात-भेटतात ते. रावसाहेब म्हन्जे त्यांच्या वरचे, त्यांना केबिन असते, दरवाजा लोटताना विचारावं लागते ‘यिऊका’ म्हनून! पन त्यांच्या केबिनला एसी नसते. एसी आणि बाहेर बसलेला शिपाई म्हणजे समजावे की आत ‘साहेब’ आहे. तिथं आत जायला चिठ्ठी द्यावी लागते. शासन चालवण्यासाठी काही व्यवस्था लागते, अधिकारांची उतरंड लागते हे मान्य. पण त्या उतरंडीची नागरिकांना भीती वाटण्याचे काय कारण? जसं की पोलिसांचा धाक असला पाहिजे; पण आपण जर गुन्हेगार नसू तर पोलिसांना घाबरण्याचे काय कारण? तसेच सरकारी नोकरांनी अधिकार्यांना भ्यावे; पण नागरिकांनी घाबरायचे काय कारण?ही भीती घालवण्यासाठी आम्ही एक साधा उपाय केला. सरकारी माणसाला साहेब म्हणायचं नाही. त्याला आदरपूर्वक भाऊ, दादा, किंवा नावापुढं ‘जी’ लावून बोलायचं. आम्ही म्हणतो, ‘साहेब 1947 साली देश सोडून गेले’. आताही ज्यांना वाटतं आपण साहेब आहोत, त्यांनीही त्याच वाटेला जावं. शाळेतल्या प्रति™ोत आपण सर्वानी हजारदा म्हटलंय, आम्ही सारे भारतीय बांधव आहोत.. आणि त्यातले काहीकाही साहेब आहेत’’ - असे तर नाही ना म्हटले?आता साहेब गेले आणि आपण सारे समान दर्जाचे नागरिक आहोत. नागरिक म्हणून माझे काही कर्तव्य आहे, तसेच कलेक्टरचेही नागरिक म्हणून वेगळे कर्तव्य आहे. पगार वेगळा असला तरी नागरिक म्हणून आमचे नाते बंधुत्वाचे आहे. मग साहेब कशाला म्हणायचं?हा प्रयोग आम्ही केला, एक-दोनदा नाही हजार वेळा केला. आमच्या गावांमधले सामान्य नागरिक ग्रामसेवकापासून आयुक्तांर्पयत सर्वाशी निर्भय होऊन बोलू लागले. एका गावातली आजी हसत हसत मला म्हणाली, ही शिकलेली पिढीच फार घाबरते रे, त्यांना सांग तू, आपली कुटं नोकरी जानारै का? आपन कशाला भ्यावं?