-प्रगती जाधव-पाटील
कमी खर्चात शाश्वत नोकरी मिळवून देणं म्हणजे वर्दी, उन्हातान्हात शेतीत राबण्यापेक्षा पोलिसात जाणं चांगलं, असं म्हणत ग्रामीण भागातल्या शिकलेल्या पोरी म्हणतात, आता पोलीस भरतीचा तरी ट्राय मारु!
खाकीची क्रेझ तशी तरुणपणात असते, पण फौजदार नवरा पाहिजे म्हणणाऱ्या पोरी आता स्वत:च फौजदार होण्याचं स्वप्न पाहू लागल्या आहेत; पण मुली पोलीस भरतीचं स्वप्न पाहतात, तेव्हा हे एक स्वप्नच फक्त त्यांना पुढं रेटत नाही तर या पोलीस भरतीला अनेक कंगोरे आहेत. राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये अजूनही शिक्षणाची गंगा माध्यमिक वर्गांपर्यंतच जाते. मुलींचं पुढील शिक्षण घ्यायला तालुक्याच्या ठिकाणी जायला पालक धजावत नाहीत. सुरक्षितता आणि आर्थिक बळ ही दोन कारणं. मुलींच्या शिक्षणावर केलेला खर्च दुसऱ्याच्या घरीच उपयोगाला येणार, असं अजूनही अनेक पालकांना वाटतंच.
लग्न लावून दिलं की पालक मोकळे; पण मुलींना नसतं लगेच लग्न करायचं. त्यांना शिकायचं, स्वत:च्या पायावर उभं रहायचं असतं. तीन बहिणींच्या पाठीवर जन्मलेली प्रणाली सध्या घरातल्यांना न सांगता पोलीस भरतीचा सराव करतेय. का बरं पोलीस व्हायचं तुला, असं विचारलं तर ती म्हणाली, ‘मोठ्या बहिणींना आधार द्यायला शाळेत असणारा भाऊ कमी पडतो. आईबाप लग्न जमवताना म्हणतात, गयावया करून, आमची मुलगी नांदवा, अशी आर्जव करताना मी पाहिलं आहे. गावातल्या कोणीतरी पोलीस केस करा, असं म्हटल्यावर पोलीस ठाण्याच्या दारात सगळे पोहोचले. पोलिसासमोर मात्र सरळ वागू लागले. तो रुबाब पाहिला नी मी म्हटलं आपणही पोलीस भरती व्हायचं. दहावीनंतर मिळेल ते वाचणं आणि बारावीनंतर शारीरिक तयारी सुरू केलीये.
हीच गोष्ट प्रियांकाची. खासगी कंपनीत कामाला असलेले वडील आणि पिको फॉलचे काम करून संसाराला हातभार लावणारी आई अशा कुटुंबात राहणारी प्रियांका सांगते, ‘मला एक मोठा आणि एक जुळा भाऊ आहे. अभ्यासात मी त्यांच्यापेक्षा उत्तम असूनही कला शाखेत प्रवेश घ्यावा लागला. आता तुझ्या शिक्षणावर आणि पुन्हा लग्नावर असे दोनदा खर्च आम्हाला परवडणारे नाहीत, असं घरचे म्हणाले. मीही फार हट्ट केला नाही, म्हटलं करिअर करायचंच आहे तर ते कला शाखेतूनही होईलच की. अॅकॅडमीत प्रशिक्षकांबरोबर डील केलं. पहिले काही महिने मी फुकट शिकले, आता नवीन येणाऱ्यांना शारीरिक शिक्षणाचे धडे देते आणि त्याच्या बदलत्यात मी त्यांची लायब्ररी वापरते. चाललीय तयारी!’
पोलीस भरतीचा, लष्कर भरतीचा तसाच लग्न लावून टाकतील, या भयाशी आणि घरच्या परिस्थितीशी थेट संबंध दिसतो.
घरची हलाकीची परिस्थिती म्हणून कमी वयात लग्न झालेल्या सुरेखाला सासरी खूपच पाठबळ मिळालं. मजबूत बांधा असल्याने शेतात काम करण्यापेक्षा पोलिसांत भरती निघती का बघ, हे तिला तिच्या सासूने सांगितले. बारावीपर्यंत शिकलेली सुरेखा पोलिसांत भरतीही झाली. सध्या ती पोलीस उपनिरिक्षक या पदावर काम करतेय, आपल्या सासूमुळेच हे करिअर घडलं, असं ती सांगते.
पण अशी उदाहरणं थोडी. बाकी मुली, आपली वाट आपण शोधत. ॲकॅडमी लाव, कुठं नेटवर पाहून पाहून पळ, स्पीड वाढव, अभ्यास कर असं करत पोलीस भरतीचं स्वप्न पाहत राहतात.. पण ग्रामीण भागात पोरींची स्वप्न पूर्णच झाली पाहिजे, अशी सक्ती कुणावरच नसते.
---------------------------------------------------------------
सिलेक्शननंतर फी देणार!
कुटुंबीयांना कॉलेजला जातेय, असं घरी सांगून काही मुली पोलीस भरतीसाठी अॅकॅडमीत जातात. शारीरिक क्षमता आजमावण्याबरोबरच त्यांना पुस्तकांचाही आधार अॅकॅडमीमध्ये आल्यानंतर मिळतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि खर्च करण्याची क्षमता नसल्याने विद्यार्थिनी सिलेक्शन झाल्यानंतर फी देते, असं सांगतात. अशा पद्धतीने अभ्यास करून भरती होणाऱ्या सर्वांनीच ही फी गुरूदक्षिणा म्हणून दिल्याचे अॅकॅडमीचे अभिजीत निकम सांगतात.
(प्रगती लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहे)
pragatipatil26@gmail.com