-मयूर देवकरदहावी-बारावीच्या सुट्या लागल्या. कॉलेजच्या परीक्षाही लवकरच संपतील. आणि सुटीचा हंगाम सुरु होईल. होस्टेलमध्ये राहणारी अनेक मुलं सुटीत घरी जातात.पण ज्यांना सुटीत घरीच जावंसं वाटत नाहीत अशीही काही मुलं मोठ्या शहरात भेटतात. त्यांना सुटीत घरीच जायचं नसतं, काही ना काही कसरत करुन ते शहरातच राहू पाहतात. राहतात. आणि त्यासाठी पै-पै करुन जीवाचं रान करतात. त्या मुलांना भेटा, वास्तवाचा एक वेगळाच चेहरा दिसेल.हल्ली दहावीनंतर आपलं गाव किंवा शहर सोडून अनेकजण शिक्षणासाठी मोठ्या शहरात शिकण्यासाठी जातात. ते आता तसं कॉमन झालं आहे. कॉलेज नाही तर क्लासेससाठी सगळी मुलं मोठ्या शहरात येतात. निदान मराठवाड्यात तरी असं होतं. खेड्यापाड्यातून मुलांना औरंगाबादला येण्याचे वेध लागतात. मन अधीर होतं. येथे लाख-दीड लाख रुपये फी वसूल करणारे ‘आयआयटी’ क्लासेसपासून ते १५-२० हजार फी लावणारे स्टेट बोर्डाचे क्लासेसही आहेत. ज्याला जसं झेपेल, परवडेल तशापद्धतीनं तो क्लासमध्ये अॅडमिशन मिळव्वतो. आणि मग खऱ्या अर्थानं सुरू होतो मुक्त जीवनाचा प्रवास.दहावीपर्यंत आईवडिल आणि शेजाऱ्यांच्या धाकात/नजरेखाली वावरल्यानंतर मिळणारी ही ‘आझादी’ म्हणजे काय करू नि काय नाही असंच होतं. सुरूवातील थोडं ‘होमसिक’ होणं स्वाभाविक आहे. पण त्यानंतर बाहेरच राहणं अधिक प्यारं वाटू लागतं. जोपर्यंत क्लास सुरू आहे तोपर्यंत सगळं मस्त चालतं. ‘माझा क्लास सुरू होणार आहे’ असं सांगून बिनधास्त घरून निघायला जमतं. क्लासच्या नावाखाली दोन वर्ष राहिल्यावर मग नजरेसमोर भविष्य दिसायला सुरूवात होते. आता क्लास तर संपलाय. बारावीपण झाली. जर आता का चांगला निकाल आला नाही, चांगले मार्क पडले नाही तर मग काय? वापस तर जायचं नाही. पण मग शहरात करायचं काय?मग सुरू होते कारण शोधण्याची मोहिम. मग कोणी कॉम्प्युटर क्लास लावतो, कोणी कॉल सेंटरवर जॉब करतो, तर कोणी स्पर्धा परीक्षेची (यूपीएससी/एमपीएसएसी) तयारी सुरू करतो. काहीही करून औरंगाबादला राहण्याचा आटापिटा सुरू होतो. कोणाला विचारलं की, का रे बाबा, मेस आणि रुमचा खर्च सोसून तू घरी जाण्याऐवजी इथंच का राहतो? तर उत्तरं वेगवेगळी मिळतात. निलेश सांगतो, काय आहे गावाकडे जाऊन? मरमर ऊन? त्यापेक्षा इथंच छोटं-मोठं काम करून पगारपाणी मिळवलेलं चांगलं. तसंही गावात आता काही खंर राहिलं नाही. इथंच काहीतरी पाहतो.शहरातल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं अजून वेगळं. प्रथमेश आणि समीर, ते सांगतात, घरी जावून काय करणार? काय कर्तबगारी केली असं कुणी विचारलं तर काय सांगणार? त्यापेक्षा बरंय इथंच. रिझल्ट लागेपर्यंत हे सारं चालतं. बरं बारावीला रिझल्ट चांगला आला तर ठीक, नाही तर मग बाहेर राहणं आणखी कठिण होऊन बसणार अशी अनेकांना भीती वाटते. कारण इंजिनिअरिंगसाठी म्हणून आलेले असल्यामुळे एखाद्या कॉलेजला नंबर लागला नाही किंवा इंजिनिअरिंगचा एखादं वर्ष मागे राहिलं असेल तर घरी जाण्याऐवजी क्लास लावून पुन्हा तयारीला लागावं लागेल या पवित्र्यातही अनेकजण असतात. इंजिनिअरिंग झाल्यावर नोकरी लागत नसेल तर मी ‘गेट’ची तयारी करतो असं सांगून घरी जाणं टाळलं जातं.इतर शाखांच्या विद्यार्थ्यांचीही गोष्ट फारशी वेगळी नाही. अनेकजण हमखास एक कारण सांगतात, ‘मी एमपीएससीची तयारी करतोय’ किंवा बँकिंगची तयारी करतोय. ‘जेन्यूयन’ तयारी करणारे थोडेच पण केवळ घरी परत जायचं नाही म्हणून क्लास लावणारे किंवा आपण काही तरी करतोय असा भास स्वत:साठी किंवा इतरांसाठी जाणीव करून देणारेही बरेच. स्पर्धा परीक्षा वर्ग लावले जातात. खाणंपिणं राहण्याचा जुगाड केला जातो, पण त्यासाठी जी कसरत करावी लागते ती अनेकांची दमछाक करतेच.‘रंग दे बसंती’मध्ये नाही का आमिर खानचा ‘डीजे’ म्हणतो की, या ‘युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या बाहेर कोण ओळखतो डीजेला, काय किंमत आहे माझी?’ तशीच स्थिती अनेकांची असते. ‘तेरे नाम’चा सलमान कॉलेज सोडून दहा वर्ष झाले तरी कॉलेजमध्येच काही ना काही कारणास्तव असतोच ना, तशी मानसिक अवस्था याकाळात अनेकांच्या वाट्याला येते.काळ बदलूच नये. थांबून जावं घड्याळ्याच्या काट्यांनी असं वाटायला लागणारा हा काळ अनेकांच्या वाट्याला येतो. घरी जावंसंच वाटू नये, प्रश्नांची सरबत्ती नको म्हणून शहरांतच वेळकाढूपणा करणाऱ्या अनेकांच्या अस्वस्थतेची जाणीवही नसते.सुटी हवी पण घरी जाणं नको, असं म्हणणारी ही मुंलं हे सारं पालकांनाच काय पण मित्रांनाही कधी काही सांगत नाहीत, हे यातलं अजून मोठं दुर्देव!
सुटी लागली तरी ते घरी का नाही जात?
By admin | Published: April 01, 2017 5:59 PM