- प्रज्ञा शिदोरेप्रत्येकाला, अमुक एक व्यक्ती अशी का वागते याबद्दल कुतूहल नक्कीच असतं. आणि विशेषत: ती व्यक्ती तुमची बायको, गर्लफ्रेण्ड, नवरा किंवा बॉयफ्रेण्ड असेल तर ती नक्कीच असेल. आणि तुम्हाला व्हॉट्सअॅपवरचे खासकरून टिपिकल बायकांच्या किंवा पुरुषांच्या वागण्याबद्दलचे विनोद ऐकायला आवडत असतील ना? कुठेही कुजबुजलं तरी तिला बरोबर कसं ऐकू येतं किंवा ती किती जास्त बोलते, तो किती वेंधळा आहे, गाडी चालवताना त्याला पत्ता विचारायला कसा आवडत नाही, वगैरे? किंवा तुम्हीही असं जेण्डर स्टिरिओटायपिंग सहज जाता जाता करतही असाल. हे बोलणं स्त्रीवादाच्या अगदीच विरोधात आहे; पण बायका आणि पुरुष यांच्या स्वभावामध्ये काही मूलभूत फरक ते असतात. अर्थात हे जगातल्या प्रत्येक बाई किंवा पुरुषाबद्दल खरं असेल असं नाही; पण हे जैविक फरक, हे दोन लोकं एकमेकांशी आणि जगाशी कसा व्यवहार करतात कशा प्रतिक्रि या देतात हे ठरवतात, असं अॅलन आणि बार्बरा पेसे म्हणतात.आणि हा फरक कसा आहे, हे दाखवण्यासाठी त्यांनी हे अख्खे पुस्तकंच लिहिले. व्हाय मेन डोण्ट लिसन अॅण्ड विमेन काण्ट रिड मॅप्स. अॅलन आणि बार्बरा हे जोडपं आॅस्ट्रेलिया इथे राहणारं. अॅलन याने सायकॉलॉजी, न्यूरोसायन्स आणि सायकियाट्री या विषयांमध्ये शिक्षण घेतलं आणि मग तो मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून काम करत होता. बार्बरा हीसुद्धा याच क्षेत्रामधली. त्यांना व्यवसायात येणाऱ्या अनुभवांवरून त्यांनी हे पुस्तक पुढे आणलं.अर्थात, या पुस्तकात त्यांचे अनुभव आणि जे तर्क त्यांनी लावले आहेत, ते शास्त्रीय आहेत असं ते अजिबात म्हणत नाहीत; पण, ‘आहे ते आहे !’ आणि हे आपण सगळेच अनुभवतो, असं त्यांचं म्हणणं आहे.म्हणून जर अशास्त्रीय विधानांचा त्रास तुम्हाला होणार नसेल, आणि जर तुम्हाला इतरांची स्वभाववैशिष्ट्ये समजून घ्यायची असतील तर हे पुस्तक नक्कीच वाचा!why men cant listen & women cant read mapsअसा सर्च मारला तर अॅलन आणि बार्बराच्या भाषणाचे अनेक व्हिडीओही पाहता येतील.