- प्रसाद सांडभोर
लहान मुलं खूप उत्साही असतात. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा साचलेली असते. ती कायम धावत, पळत, उड्या मारत काही ना काही हालचाल करत वावरतात. लहान मुलं सतत खेळत असतात.
आजूबाजूच्या जगात, कशातही त्यांना खेळ सापडतो. लहान मुलांना एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या असतात. तसेच एक गोष्ट करून झाली की लागलीच त्यांना आधीपेक्षा पूर्णपणे वेगळी दुसरी एखादी गोष्ट करून पाहायची असते.
लहान मुलं नवनव्या गोष्टी फारसा विचार न करता अगदी सहजपणे ‘ट्राय’ करून पाहतात. प्रयत्न करतात. जमलं तर छानच, नाही जमलं तर नाद सोडून दुसरं काही करू पाहतात. लहान मुलांना प्रत्येक गोष्टीचं खूप कुतूहल असते. ती सतत प्रश्न विचारतात. लहान मुलं खूपदा स्वत: कल्पिलेल्या जगात रमतात. स्वत:चेच नियम बनवतात. पाळतात. मोडतात. बदलतात.
लहान मुलं अनोळखी असली तरी अगदी सहज एकमेकांत मिसळतात. ओळखीशिवाय एकमेकांसोबत खेळतात. अगदी सहज मित्रमैत्रिणी बनवतात. ***काही वर्षांपूर्वी खरडलेलं कुठल्याश्या वहितलं हे कुठलंसं पान. जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा दरवेळी विचार करतो ‘असं नेमकं काय आणि कधी झालं की नोंदी लिहिताना मी इतक्या सहजपणे ‘त्यांना’ स्वत:पेक्षा वेगळं समजलं?’
मी वाढलो, मोठा झालो की माझ्यातलं बालपण कमी कमी होत सुकून गेलं?काय केलं म्हणजे पुन्हा आणता येईल तेव्हाचा उदंड उत्साह, खेळकरपणा, कुतूहल? तशी निखळ मैत्री आणि नितळ मन? काय करावं?
sandbhorprasad@gmail.com