- वैद्य राजश्री कुलकर्णी
आपल्याकडे अनेक गोष्टी ‘सिझनल’ करायची पद्धत आहे. म्हणजे अमुक एक गोष्टीचे असे वर्षातून ठरावीक वेळी अटॅक येतात. हंगामी अटॅक. हिवाळा आणि व्यायाम याचंही असंच आहे. दिवाळी संपली, वातावरणात गारवा वाढला की जिम, जॉगिंग ट्रॅक, वेगवेगळे स्पोर्ट्स क्लब गर्दीने अगदी फुलून जातात. कधीकधी तर ट्रॅकवर चालायला जागा नसते अशी सकाळी आणि संध्याकाळी परिस्थिती असते. अचानक सगळे ‘हेल्थ कॉन्शस’ होतात आणि पळायलाच लागतात. त्यातही तरुण मुलामुलींचा (विशेषतर् मुलांचा भरणा) अधिक. सिक्स पॅक, बायसेप्स, ट्रायसेप्स, टोण्ड बॉडी हे शब्द अनेकांना हाका मारायला लागतात. शरीर पिळदार झालं पाहिजे, मसल्स कसे वेगवेगळे दिसले पाहिजेत, शरीरावर कुठेच फॅट्स साठलेले दिसता कामा नयेत, फक्त मस्क्युलर बॉडी दिसली पाहिजे असं काहीसं डोक्यात ठेवून मुलांचे त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू असतात.आयुर्वेद याविषयी फार छान मार्गदर्शन करते. आपण हिवाळ्यातच इतक्या उत्साहानं व्यायाम का करतो बरं? त्याचंही शास्त्नीय कारण आहे ते म्हणजे उन्हाळ्यात आधीच दिवसभर गरम हवा, घामघाम यामुळे आपल्या शरीरातील पाणी किंवा फ्लूइड्स यांचा लॉस होतो आणि क्षार कमी झाल्यानं आपण पटकन थकून जातो .याउलट हिवाळ्यात घाम अजिबात येत नाही! जर आपल्याला वजन किंवा शरीरातील चरबी, फॅट्स कमी करायचे असतील तर घाम येईर्पयत व्यायाम करण्याची आवश्यकता असते. साहजिकच हिवाळ्यात जेव्हा भरपूर शारीरिक कसरत किंवा व्यायाम करू, तेव्हाच घाम येतो आणि मग पुष्कळ वेळ व्यायाम केल्याने शरीर कमावणं किंवा सिक्स पॅक, अॅब्स डेव्हलप करणं शक्य होतं; पण व्यायाम करीत असताना नुसता नादिष्टपणे करून उपयोगी नाही, त्याबरोबर इतरही अनेक गोष्टींचा विचार करायला हवा नाहीतर पायात गोळे येणं, प्रचंड थकवा किंवा अशक्तपणा जाणवणं, अंग दुखणं अशा अनेक प्रकारच्या तक्र ारी उद्भवू शकतात. म्हणजे व्यायामाला आहाराची जोड हवी. आणि तिथंच गाडं अडतं, योग्य डाएट करायचं कसं?डायटचं फॅड मनात ठेवून व्यायाम केल्यास शरीराच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता असते. याच दिवसांत विविध पौष्टिक औषधे, प्रोटीन सिप्लमेंट्स, काही व्हिटॅमिन्सच्या गोळ्या यांच्या जोरदार जाहिराती झळकू लागतात आणि यातील आपल्याला काय आवडेल, पटेल, आकर्षित करेल ते प्रत्येक जण घ्यायला लागतो. त्यावर मस्त डेव्हलप झालेल्या पिळदार मसल्सचे फोटो असतात त्यामुळे तरु ण मुलं पटकन आकर्षित होतात आणि जाहिरातींना भुलून बळी पडतात, पण या कृत्रिम प्रोटीन पावडरी घेऊन खूप उपयोग झाल्याचं दिसून येत नाही कारण त्या पचायला खूप जड असतात. यापेक्षा आपल्या रोजच्या आहारात असे पदार्थ हवेत की जे उत्तम पोषण देतील आणि चांगल्या पद्धतीने पचतील व शक्तीही देतील. आहार दिसायला फॅन्सी असण्यापेक्षा आणि उगीचच महागडा असण्यापेक्षा तो उपयुक्त आणि पौष्टिक असेल याची काळजी घेतली तर त्याचा अधिक फायदा होईल.
त्यासाठी या काही गोष्टी करून पहा.
1. काजू, बदाम, किसमिस, अक्रोड, पिस्ते, जर्दाळू, खारीक, खोबरं, खजूर या सगळ्या सुक्यामेव्याचा समावेश होतो. तसेही थंडीच्या दिवसांत हे पदार्थ वापरून लाडू करायची आपल्याकडे पद्धत आहेच! शरीराची ऊब टिकविण्यासाठी यात गूळ, तीळ, खसखस यांचाही वापर करता येईल. नैसर्गिक पोषण मूल्यं, अँटी ऑक्सिडण्ट्स त्यातून मिळतील. निसर्गातील प्रथिने व स्निग्ध पदार्थ अधिक गुणकारी असतात.*आहारात गायीचं दूध आणि तूप अवश्य ठेवावं. * थंडीच्या दिवसांत मिळणारी फळं म्हणजे बोरं, आवळे, पेरु खावीत. ऊस, हरबरे, मटार, ताजी गाजरे, वांगी, वाल, या भाज्या स्वास्थ्य उत्तम राखतात.* व्यायाम करून आल्यानंतर अंगाला तिळाचं किंवा खोबर्याचं तेल लावून थोडा मसाज करावा मग हरबरा डाळीचं पीठ आणि हळद एकत्न करून ते मिश्रण अंगाला चोळावं म्हणजे घाम, डेड स्किन निघून जाते आणि मग मस्त गरम पाण्याने अंघोळ करून छान फ्रेश व्हावे. * रात्नीचं जेवण लवकर करावं आणि झोपण्यापूर्वी गरम दुधात थोडं तूप आणि ड्रायफ्रूट पावडर घालून प्यावं. अशा पद्धतीने आहार आणि व्यायाम यांचा मेळ साधला तर थंडीच्या दिवसांत शरीर कमावण्याची इच्छा खरंच पूर्ण होईल!
व्यायामाची पथ्यं
* व्यायाम उपाशीपोटी करावा. सकाळी केल्यास उत्तम पण तसं जमत नसेल तर निदान चार ते पाच तास पोट रिकामं हवं.* एकच एक प्रकारचा व्यायाम रोज, सातत्याने करू नये तर शरीराचे सगळे स्नायू, अवयव यांना व्यायाम घडेल असे प्रकार शक्यतो करावेत.* जॉगिंग, रनिंग, सायकलिंग, स्किपिंग, स्वीमिंग हे व्यायाम बदलून बदलून करणं शक्य असल्यास उत्तम! * एखाद दिवशी जास्त वेळ नसेल, धावपळ असेल तर बारा सूर्यनमस्कार घातले तरी चालतील.