- स्वाती सहारे
मुलगी म्हणजे काय?
मुलगी म्हणजे जन्माला येऊन केलेलं पाप?
आता असं म्हणण्याची वेळ आलीये.
लोक म्हणतात स्त्रीभृणहत्या थांबवा.
तिला पोटातच मारु नका. तिचा जीव वाचवा.
पण कशासाठी?
ती जर पोटातच मेली ना तर बरं होईल.
कारण ती पोटात एकदाच मरेल.
पण तिला या जगात आल्यावर दररोज मरावे लागेल, क्षणाक्षणाला.
दररोजची ही होणारी घुसमट, मरमर, भीती हे सगळं अनुभवण्यापेक्षा मरणं बरं. तिला जगात आल्यावर प्रत्येक सेकंदाला आपल्या मनाविरुद्ध करावे लागेल, इच्छा-आकांक्षा काय असतात हे पूर्णपणे विसरून जावे लागेल, तिचं अस्तित्व काय आहे हे तिला पूर्णत: विसरावे लागेल, आणि तुम्ही म्हणता की तिचा जीव वाचवा. ..
स्पर्धा कुठलीही असो, अगदी ऑलिम्पिक असो.
आज सगळ्या क्षेत्रात मुली बाजी मारत आहेत.
..पण माहित नाही का कुठे ना कुठे तरी त्या स्वतः शीच लढताहेत आणि ती बाजी मात्र हरताहेत..
आणि जिंकली जरी तर काय मिळतं तिला?
छेडछाड, बलात्कार, शारीरिक आणि मानिसक त्रास , अॅसीड अटॅक?
दररोज वर्तमानपत्नात यातली एक ना एक बातमी असतेच. .
शाळेत गेल्यावर आपण शिकतो की, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.. मग काही काळाने आपण हे कसं काय विसरून जातो. .?
का हे थांबत नाही ?
याला कोण जबाबदार आहे?
आपला समाज ज्याने स्त्रियांसाठी कडक नियम बनवून ठेवले आहेत?
सातच्या आत घरात, काय कपडे घालायचे?
कोणती कामे करायची.
काय करायचं आणि काय नाही?
सगळी बंधने तिच्यावर लादली गेली आणि आताही लादली जात आहेत. पण मग पुरूषांसाठी असे नियम या समाजाने का बनवले नाहीत.
का तिला वेगळी वागणूक दिली जाते? आपल्या देशात बेटी बचाव, बेटी पढाव मोहीम सुरु आहे.
पण त्याचा खरंच काय उपयोग?
बदल हवा आहे. पण तो कोण करणार? सुरूवात स्वात:पासून करा. एकदा तरी.