-प्राची पाठक
आपल्या खांद्यावर जाडजूड अशा पाच-दहा पिशव्या ठेवल्या असतील आणि त्या घेऊन आपल्याला चालायचं असेल कायमच, तर ती काही आनंददायी गोष्ट असेल का? उगाच कसलं तरी ओझं आपण वाहत बसलोय, अशी भावना आपल्याला खात राहील. सुरुवातीला कोणी चॅलेंज दिलं किंवा अगदी व्यायाम समजून आपण हे ओझं रोज आणि दिवसभर मिरवूसुद्धा; परंतु लवकरच त्याचा कंटाळा येणार. ते ओझं आपल्याला नकोसं होईल आणि कधी एकदा ते ओझं टाकून आपली सुटका होतेय, असं वाटत राहील. शक्य असेल तर आपण ते ओझं खाली ठेवून देऊ आणि वागवतच राहिलो तर सतत रडत चिडचिडत राहू.
आपल्या मनावरही आपण असं ओझं वाहतोय का?
अनावश्यक सवयींचं, आपल्या मनातल्या नकोशा विचारांचं? अजिबात नाही म्हणू नये कुणीच, कारण आपण आपल्याही कळत किंवा नकळत असंच ओझं घेऊन आपण फिरत असतो. तेसुद्धा बारा महिने चोवीस तास. आज ३१ डिसेंबर आहे, आज चॉइस आहे आपल्याला की, गेल्या वर्षांचं आणि यंदाही साचलेलं ओझं आणि आपल्या मनातली कचकच नव्या वर्षात फॉरवर्ड करायची की, २०२० मध्येच ते ओझं मागे ठेवून छान मोकळ्या हातांनी, मजबूत इराद्यांनी २०२१ मध्ये जायचं.
आता समजा हे वाचून ठरवलंच असेल की, २०२० मध्येच ठेवू आपण आपलं सगळं ओझं आणि पुढे जाऊ छान तर हे करून पाहा...
1. कम्प्लेन मोड ऑफ!
उगाच किरकिर करणं बंद करू. कोणतीही नवीन गोष्ट करायची, शिकायची झाल्यास आपल्याकडे ती कशी होणार नाही, याची कारणं आधीच तयार असतात. माझ्याकडे हेच नाही आणि तेच कमी आहे, वगैरे. ही तमाम कारणं देणं बंद करू. माझ्याकडे अमुकच नाहीये, म्हणून माझ्याकडून ढमूक गोष्ट होणार नाही, ही किरकिर बंद करू. दुसऱ्याने आपल्यासाठी सांगितलेली किंवा आपणच आपल्यासाठी ठरवलेली एखादी तरी गोष्ट किरकिर न करता करून पाहू.
त्यामुळे ओझं खाली ठेवण्याचा पहिला टप्पा कम्पलेन मोड ऑफ करून टाकू. नो किरकिर!
2. नो मोअर दुश्मन.
माझ्याच घरचे लोक विचित्र आहेत, असा सततचा मनातला खेळ बंद करू. मला ना त्या तमक्यासारखं घर हवं होतं. या ढमकीचे आई-वडील किती भारी. मलाच ती घरात फार कटकट आहे. माझ्याच घरातले लोक मला समजून घेत नाहीत. एकतर मीच वाईट आहे, नाहीतर ते वाईट आहेत. मी घरात कोणाशीच मनातलं बोलू शकत नाही, वगैरे सर्व कचकच जरावेळ बाजूला टाकू. घरातले तुमच्याशी धड बोलत, वागत नाहीत समजा. धरून चालू जरावेळ; पण त्यांच्याशी आपण कसं वागतो, हे पाहिलं आहे का? त्यांच्याशी आपण नीट संवाद साधायचा प्रयत्न केलाय का? त्यांच्या दृष्टीने आपणदेखील एक प्रोब्लेमच होऊन बसलेले असताे, ही जाणीव आपल्याला असते का? मग घरातल्या कोणाशीही नीट संवाद साधायचा, मैत्री करायचा प्रयत्न करून बघायला हे नवीन वर्ष आहेच की. करून टाका सुरुवात. चलो यारों.. दोस्त बनाए.. दुश्मनी बाय बाय!
3. जमलं तर लगेच कर, नाही तर बंद विषय!
नंतर करू, करू-करू हे शब्द सोडून देऊ. करू करू म्हणत खूप गोष्टी आपण साचवून ठेवतो. एकदा का त्या साचत गेल्या की त्या उपसून काढणं कठीण होऊन बसतं. बाकी, रोजच्या रुटीनची धावपळ असतेच. त्यात करू करू यादीतल्या गोष्टी आणखीन मागे पडत जातात. आपली कामं अशी भिजवून, तुंबवून ठेवणं बंद करू. करू करू म्हणून बाजूला टाकलेल्या कामांचं ओझं आपल्या मानगुटीवर बसतं. आणि हातात एवढं काम आहे कधी करणार नवीन काही म्हणत आपण काहीच करत नाही. त्यामुळे नो करू करू!
4. तुलनेचं तागडं तोडा!
मनातल्या मनात कोणाशी तुलना, कोणावर लक्ष ठेवून असणं, त्यांच्यासारखं आपलंही आयुष्य असावं, असा विचार बंद करू. दुसऱ्यावर इतकं लक्ष ठेवून आणि मनातल्या मनात त्याचं कसं भारी आणि आपलं कमी भारी, असली कोणतीही गणितं करण्यात काहीच अर्थ नसतो. आपल्या पुढ्यात कामं कमी असल्याचं ते लक्षण असतं अनेकदा. त्यामुळे, मनातल्या मनात चालणारे हे खेळ बंद करा. आपल्याला आपल्या खर्चाने, आपल्या वेळाने कोणावर पीएच.डी. करायची नाहीये. ती करून आपल्याला आपल्या आयुष्यात काहीही फायदा होणार नाही, हे पक्कं लक्षात ठेवा. आपण भलं आपलं काम भलं, हाच मंत्र आपलं आयुष्य मार्गी लावू शकतो.
5.करा की कौतुक!
आपण अमुक बोललं तर लोक काय अर्थ काढतील, ही कचकच सोडून देऊ. इतरांना कॉम्प्लिमेंट्स द्यायला शिकू. आपलं भिंग कोणाचं काय सुरू आहे, ह्यावर ठेवून मनात कुढत बसणं सोडून देऊ. उलट कॉम्प्लिमेंट्स देत संवाद साधायला शिकू. प्रत्येकाची आयुष्यातली धडपड वेगळी असते. त्यातूनच ते काही बरं वाईट घडवत असतात. त्यातल्या चांगल्या गोष्टी समजून घेऊन त्याबद्दल इतरांशी बोलायचा प्रयत्न करू. उगाच गोड गोड बोलण्यापेक्षा मनापासून कोणाला एखादी दाद द्यायला शिकू. गोड गोड बोलणं हे खोटं आणि नाटकी वाटू शकतं. मुद्दे घेऊन कोणाबद्दल चांगलं बोलणं इतकं सोपं नसतं. ते जमवू.
( प्राची मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्त्राची अभ्यासक आहे.)
prachi333@hotmail.com