कटय़ार काळजात घुसली नावाचा सिनेमा मी हल्लीच पाहिला.
त्या सिनेमाविषयी मला काही म्हणायचं नाही.
तो सिनेमा पाहून आल्यावर माङया जे लक्षात आलं, ते शेअर करायचं आहे.
तर मी दोस्तांच्या आग्रहाखातर कटय़ार पाहिला गेलो.
आणि घरी परतताना आपण काय पाहिलं याचा मनाशी ताळा करत असताना माङया लक्षात आलं की, या गोष्टीत एक वेगळी गोष्ट आहे.
सदाची गोष्ट.
एक असा तरुण जो त्याच्या गुरूच्या ओढीनं येतो. त्याच्या गुरूंकडे राजपाट राहिला की नाही याची ते फिकीर करत नाही. गुरूंकडून काय आणि कसं शिकता येईल, यासाठी तो जिवाचं रान करतो. त्या गुरूंसाठी लढायला तयार होतो.
आणि त्या लढाईत हरतो तेव्हाही त्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो.
जे खांसाहेब त्याच्यावर खार खाऊन असतात, त्या खांसाहेबांकडे भांडी घासण्यापासून पाणी भरत असतानाही तो त्यांच्याकडून अप्रत्यक्ष संगीतच शिकतो. म्हणतोही की, ज्यांच्याकडे मला शिकायचं होतं, त्यांच्याकडे असं राहता येतं, शिकता येतं हे काय कमी आहे?
त्या सदाला भेटल्यापासून मला वाटतंय की, शिकण्याची ही चिवट वृत्ती, आपल्या गुरूंवर अशी अपरंपार श्रद्धा, आपल्या कलेसाठी जिवाचं रान करण्याची ही तळमळ आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावायची तयारी माङयात आहे? माङया दोस्तांमधे आहे?
आमचं सारंच वरवरचं, आपल्या पोटापुरतं? नोकरीपुरतं आणि फार तर लग्नाच्या बाजारात लागणा:या प्रतिष्ठेपुरतं?
त्यापलीकडे आमचं शिक्षण, आमची विद्या आम्हाला भीडत नाही किंवा आम्हीच कशाला स्वत:हून समर्पित करत नाही.
हे असं कॅलक्युलेटिव्ह जगणं आम्ही स्वीकारलं, तिथंच आम्ही लढाई हरलो आहोत का?
मी विचारतोय हे सारं स्वत:ला, आणि शोधतोय उत्तर की, सारं जग विसरून जे शिकायचंय ते मला शिकता येईल का, मला जगता येईल का ख:याखु:या आनंदासाठी?
प्रश्न पडलाय आज. काय सांगावं, उत्तरही सापडेल, लवकरच!
- अमोल महाले, नाशिक