- प्राची पाठक
काही ना काही कारणानं कामं होतच नाहीत, ही नेहमीची फिलिंग असते. टाळाटाळ, कंटाळा असतोच. करेन, करेन असंही सुरू असतं. पण करायचा दिवस कधीच उजाडत नाही. उजाडलाच तर वेळ निघून गेलेली असते किंवा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत टिंगवून मग जीव काढल्यासारखं काम केलं जातं. पण नेहमीच असं असतं असं नाही. टाळाटाळ आणि कंटाळ्यापलीकडे काहीतरी असतं त्यानं चालढकल होत राहते. हे करण्यापेक्षा ते करू असं वाटतं. गरजेची कामं कितीही गरजेची असली तरी नीरस वाटतात. कोणीतरी मानेवर तलवार ठेवून जणू ते करायला लावतं आहे असं वाटतं. ‘नाहीच करणार जा’ असं स्वत:लाच सांगावंसं वाटतं. होईल-बघू-करू.. गरजच काय ते करायची, नकोच करायला आणि दुसऱ्या कामात बिझी अशाही टप्प्यातून अनेक कामं जातात. रेंगाळतात. फसतात. विसरली जातात. तुंबून पडतात. मग कोणीतरी शहाणा आपल्याला सांगतो, ‘कल करें सो आज कर, आज करें सो अभी कर’..टाळ्या वाजवायला हे वाक्य छान आहे. भिंतीवर सुविचार म्हणून लावायला तर फारच उत्तम. पण प्रत्यक्षात आणायला मात्र खूपच अवघड. आपल्या आसपास ‘कल करे सो आज कर’ अशी प्रेरणा घेऊन कामं करत सुटलेलं कोणीही दिसत नाही सहसा.
‘हे काम माझं नाही’, ‘मी करणार नाही’, ‘हे काम करायला या अडचणी आहेत, त्या आधी सोडवा, मग बघू’, ‘नंतर या, करू, होईल’ अशीच कॅज्युअल उत्तरं आपण आसपास ऐकत असतो. आपलं मोटिव्हेशन मग काम करण्यात नसतं. काम किती हुशारीने टाळलं यात असतं. त्या-त्या कामांवरदेखील ती टाळली जाण्याची, टाळावी लागण्याची कारणं अवलंबून असतात. पण जी कामं आपलं भविष्य सुकर करण्यासाठी तरुण वयात करणं अपेक्षित असतं निदान त्या कामांमध्ये तरी आपल्याला सेल्फ चेक आणावा लागतो.
‘किती ना मोबाइलमध्ये असतो सतत’ ही घरोघरची तक्रार असते. कोणी कोणाला आरंभशूर म्हणतं. कामं नुसती बोलायलाच. करणं दूरच. किंवा सुरुवातीला एकदम जोशात आणि मग कामं कोमात! कोणी म्हणतात, ‘यात वेळ घालविण्यापेक्षा ते कर’ असे सल्ले तर फारच मिळतात. हे करण्यापेक्षा ते कर सांगणारे लोक आपल्याला विशेष आवडत नाहीत. मग त्यांनी सांगितलेली कामंदेखील आपल्या मनात ब्लॅक लिस्टमध्ये जातात. टिंगून राहतात. यावर उपाय कसे शोधायचे मग? का असं होतं, ते कसं समजून घ्यायचं? आपल्याही मनात अनेकदा येतं, हे करू, ते करू. पण मग होत का नाही काहीच?याचं सोपं उत्तर म्हणजे आपल्या मनात ज्यावेळी ‘अमुक करू’ अशी घंटी वाजते ती घंटी वाजायची वेळ आणि प्रत्यक्ष ते काम करण्यातला वेळ यात गॅप पडलेली असणं. काय करायचं आहे, ते डोक्यात फिक्स असलं की कधीतरी ‘करूच हे’ अशी ऊर्मी उफाळून येतेच. ती तेव्हाच पकडता आली पाहिजे. तिची तीव्रता कमी झाली की कामं रेंगाळलीच समजा. आपल्या मनातला आवेग आणि प्रत्यक्ष ती गोष्ट करून टाकायचा निर्णय घेणं यात विलंब व्हायला नको. या गॅपला समजून घेतलं आणि याच टाळाटाळीवर काम केलं तर आपण ‘गो गेटर’ व्हायला लागतो. एक काम पूर्ण झालं की त्याचा जो आनंद असतो, त्याचा आस्वाद घेऊ लागतो. कामं मार्गी लागतात. पुढे सरकतात. अडकलेले गाडे चालू पडते.
कामं मनासारखी आणि वेगानं न होण्याची अजूनही बरीच कारणं असतात. अनेकदा आपल्या मनात फक्त ‘करू-करू’ ही चक्री फिरत असते. पण काय आणि कसं करू याची काहीच माहिती नसते. स्ट्रक्चर नसतं. स्पष्टता नसते. उगाच आपला ‘करू- करू’ मंत्र जपण्यात अर्थ नसतो. पाणी वाचवा, वीज वाचवा, स्त्री-पुरुष समता बाळगा असं कानीकपाळी ओरडून काय फायदा? नुसतं बोलून काय होतं? पाणी कसं वाचवा, वीज कशी वाचवा, का वाचवा याच्या पाच स्टेप्स, पाच टिप्स दिल्या आणि हजार लोकांना ते नीट समजावून सांगितलं तर किमान चार लोक ते फॉलो करतील, अशी अपेक्षा ठेवता येते. स्त्री-पुरुष समता म्हणजे नेमकं काय करा, कुठून सुरू करा हे कळलं तर तसं काही प्रत्यक्ष येऊ शकतं. नुसतंच बोलून फक्त घोषणाच कागदावर राहतात. तसंच आपल्या मनातल्या प्रत्येक ‘करू- करू’ ला एक स्ट्रक्चर देता यायला हवं. करायचं-करायचं म्हणजे काय करायचं, कुठून सुरुवात करायची, कसं करायचं, कोणी आणि केव्हा करायचं याची स्पष्टता यायला हवी. प्लॅन तयार व्हायला हवा. तरच करू-करू यादी प्रत्यक्ष कामं करून हळूहळू मार्गी लागते.
कामं का टाळली जातात?- हे शोधलं तर मनातली भीती, स्ट्रेस, आपल्या कुवतीत हे बसत नाही अशी वेगवेगळी कारणंदेखील असतात. पुढील भागात आपण त्याविषयी समजून घेऊ.तोवर, आपली करू-करूची यादी एकदा नीट लिहून काढू. करू-करूची कुरकुर मिटवायला लागूच एकदाचे.