-ऑक्सिजन
नव-मतदारांचा अभ्यास करण्यासाठी ‘लोकमत’ची टीम अख्खा महाराष्ट्र आणि गोवा पालथा घालत भटकली, तेव्हा अगदीच किरकोळ अपवादवगळता दिसलेलं चित्र एकच होतं र्‘निवडणूक? पॉलिटिक्स?- नो वे! मला त्यातलं काही कळत नाही, येट टू डिझाइड’- असं म्हणून प्रश्नावलीपासून पळणारेच बहुसंख्य ! निवडणूक आणि राजकारण या दोन शब्दांची एवढी का अॅलर्जी असं अनेकांना विचारलं तर ते सांगत, अजून ठरलं नाही मत कुणाला देणार !तुम्ही मत कुणाला देणार हे आम्ही विचारतच नाही, मत देताना तुम्ही काय विचार करता किंवा करणार आहात, या व्यवस्थेकडे कसं पाहता एवढंच बोलू असं सांगितल्यावर अनेकांचं ‘का-कू’ करणं संपलं. आणि मस्त गप्पांचे फड रंगले. त्यातून काही गोष्टी हाती लागल्या, त्या अशा.............
1. मुलांपेक्षा मुली मोठय़ा उत्साहानं प्रश्नावली भरून देत होत्या. मात्र अनेकींनीच उलटा प्रश्न विचारला की, खरंच एका मतानं फरक पडतो का, आम्ही मत दिल्यानं काही फरक पडेल का?2. अनेकांनी मोकळेपणानं सांगितलं की, राजकीय व्यवस्थेवर आमचा म्हटलं तर विश्वास आहे, म्हटलं तर नाही. आपल्या व्यवस्थेवर विश्वास आहे, ती व्यवस्था चालवणार्या कुणावरच विश्वास राहिलेला नाही. आणि आदर? - तो तर कुणाविषयीच वाटत नाही. काही मुलांनी स्वच्छ सांगितलं की, पोलिटिशियन्स आर नॉट आवर आयकॉन, फरगेट आयडॉल ! राजकीय नेत्यांविषयी संपलेला आदर ही गोष्ट चर्चेत वारंवार ठळक होत गेली.3. या मुलांच्या जगण्यात जे कन्फ्युजन आहे, ते राजकीय मतांविषयीही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डावी विचारसरणी म्हणजे काय आणि उजवी विचारसरणी म्हणजे काय, हेच अनेकांना माहिती नाही. डावं-उजवं ही भानगडच त्यांच्या आयुष्यात नाही. त्या प्रश्नावर बहुसंख्य तरुणांची दांडी उडाली. 4. ग्रामीण तरुणांपेक्षा शहरी मुलं जास्त गोंधळलेली होती. ग्रामीण भागातील तरुणांची राजकीय मतं ठाम आणि सामाजिक प्रश्नांची समजही जास्त चांगली दिसली. अडचणी जास्त असूनही राजकीय व्यवस्थेवर ग्रामीण तारुण्याचा विश्वास शहरी मुलांपेक्षा जास्त दिसला.5. व्हॉट्सअॅप विद्यापीठ झिंदाबाद अशीच सर्वत्र स्थिती. सगळ्यांना सगळ्या विषयांवर मतं मांडता येत होती. पण माहिती, तिची खातरजमा, आपल्यार्पयत आलेल्या फॉरवर्डची पडताळणी हे सारं कुणालाच महत्त्वाचं वाटत नव्हतं. त्याउलट व्हॉट्सअॅपवर जे फिरतं तेच खरं असं मानून हमरीतुमरीवर येणारेही अनेकजण भेटले.6. मतदान करणार का, या प्रश्नाचं उत्तर बहुतांश हो असं होतं; पण का करणार याचा काही विचारच केलेला नव्हता. 7. राजकीय नेतृत्वाकडून अपेक्षांचे डोंगर आहेत मात्र खासदार काय काम करतात, आणि नगरसेवक काय काम करतात, यातला साधा फरकही बहुतेकांना माहिती नव्हता.8. मत द्यायला जाणार का, या प्रश्नावर अनेक मुली गप्पच व्हायच्या ! सोबत असली तर, घरचे हो म्हणाले तर अशी उत्तरं ग्रामीण भागातच नाही तर शहरातही अनेकींनी दिली. 9. आपल्या मताला किंमत नसतेच याचा व्यक्तिगत आयुष्यातला अनुभव मुलींच्या वाटय़ाला अजूनही किती कडवटपणाने येतो आहे, हेही या पाहणीत स्पष्ट दिसलं. 10. पहिल्यांदाच मत देणार, पहिल्यांदाच बोटाला शाई लागणार यातला सगळ्यात मोठा आनंद कुठला? - या प्रश्नाला सगळ्यात जास्तवेळा मिळालेलं उत्तर होतं, इन्स्टावर टाकणार !