- मिलिंद थत्ते
जेव्हा जेव्हा एखादा तरुण किंवा तरुणी, नागरिक माहिती अधिकार वापरायला निघतात. तेव्हा चार शहाणे आजूबाजूला नक्की उगवतात, ऑख वसकन ओरडतात, ‘हट, याने काय होणारे? काही फरक पडणार नाही’. जेव्हा एखादा युवक ग्रामसभेत प्रश्न विचारतो, एखाद्या अर्धवट झालेल्या कामाचा हिशेब मागतो, तेव्हा गुरगुरणारे अनेक आवाज गोळा होतात, ‘चार बुकं शिकला तर शिंगं आली का रे तुला? आसं होत नसतंय? उगा फालतू प्रश्न विचारलेस तर तुला ग्रामपंचायतीतून दाखले मिळणार नाहीत..’ घरचे लोक पण म्हणतात, तुला कशाला गावाची चिंता? तुझं तू बघ!काहीवेळा असंही होतं की, माहिती हातात येते तरीही काही बदल घडत नाही. गावगाडा चालायचा तसाच चालत राहतो. मग काय करायचं प्रश्न पडतो. शिव्याच मिळतात आपल्याला, जिंकायचे तर चिन्ह नाहीच. मग काय करू आता? चालू द्या भ्रष्टाचार, चालू द्या खराब बांधकामं, जाऊ द्या आमच्या वाटच्या योजना दुसर्याच्या घशात, लागू द्या वाट समद्यांची.. मी बसून फक्त बघत राहतो. जळतंय सारं! जळत जळत माझ्या बुडाशी येईल तोवर बसून राहील. अन् लागला बुडाशी चटका की पळून जाईन. पळून पळून जाईन कुटं? .. इथवर आली विचाराची गाडी की रूतते बघा कशात तरी.. नि फिरून पहिल्या स्टेशनवर येतंय डोस्कं!मित्नांनो, आपल्याला नेहमी विजयाच्या गोष्टी ऐकायची सवय असते. जो जिंकतो तोच हिरो असं आपल्याला वाटतं. त्यामुळे जरा हार खाल्ली, एक डाव हरला की आपण गळपटतो. जो जो जिंकलेला असतो, तो त्याआधी किती वेळा हरला हेही आपण ऐकले पाहिजे. दुसर्या महायुद्धात जपान हरला. नुसता हरलाच नाही तर बेचिराख झाला. जपानी माणसे अत्यंत स्वाभिमानी, ताठर! त्यांना हा पराभव जिव्हारी लागला. याच काळात फुजियामा गावातला फुरूहाशी हा एक वेगात पोहणारा तरुण होता. महायुद्धाची शिक्षा म्हणून 1948 साली जपानला ऑलिम्पिकमध्ये खेळू दिले नव्हते. तेव्हा फुरूहाशी अमेरिकेतल्या वैश्विक जलतरण स्पर्धेत पोहायला गेला. या स्पर्धेआधी एका अपघातात त्याच्या हाताचे बोट तुटले होते. जलतरणपटूचे बोट तुटणं ही मोठी अडचण होती; पण तरीही तो खेळायला गेला. तिथल्या खेळात तो जिंकला नाही. पण त्याचा वेग आणि शैली यामुळे त्याला अमेरिकन जनतेची वाहवा मिळाली. तो हरला आणि जपानला परतला, तेव्हा जपानच्या विमानतळावर लोकांनी त्याचे प्रचंड स्वागत केले. हरलेल्या खेळाडूचे स्वागत? कारण बेचिराख झालेल्या घरादारातून पुन्हा जोमाने उठू पाहणार्या जपानी जनतेला तो आपला हिरो वाटला. विपरीत परिस्थितीत जिगर न हरता तो खेळला, लढला, तसेच आम्हीही उभे राहू पुढे जाऊ, खेळत राहिलो तर एक ना एक दिवस जिंकू - असा विश्वास त्याच्या खेळातून जपानी जनतेत निर्माण झाला. काही वर्षातच ‘मेड इन जपान’ वस्तूंनी अमेरिकन मार्केट पादाक्रांत केले. आणि फुरूहाशी पुढच्या काळात जिंकत गेला. 33 विश्वविक्रम त्याच्या नावावर आहेत. ‘फ्लाइंग फिश ऑफ फुजियामा’ या नावाने जगानं त्याला डोक्यावर घेतलं. आताही या शब्दांनी गुगलवर शोधलेत तर त्याच्या विजयाच्या कहाण्या, व्हिडीओ सगळे सापडेल. पण त्याच्या हरण्याची गोष्ट सापडणं मुश्कील. जपान देश मात्न त्याच्या हरण्यातून प्रेरणा घेऊन उभा राहिला.म्हणून , लोकशाहीचा खेळ खेळत राहू. जो जिता.. नही नही यारों.. जो खेला वही सिकंदर!