- सुनील राऊत
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतचा एखाद्या चित्रपट रिलीज झाला की त्याचे वेडे फॅन त्याच्या फोटोला दुधाचा अभिषेक घालण्यापासून त्याची महाआरती करण्या पर्यंत सर्व काही करतात.
दक्षिणेतील हे चित्रपट प्रेम काही नवीन नाही. पण आता वेड याड लावणाऱ्या सैराटचंही असंच काहीसं होतंय. या चित्रपट वेडामुळे समोर येत असलेले प्रकार पाहता महाराष्ट्रातील सिनेरसिकही दक्षिणेपेक्षा काही कमी नाहीत असंच आता वाटायला लागलं आहे.बेळगाव येथील दांपत्याने आपल्या मुलाचं नावच चक्क ‘सैराट’ ठेवलं. या सैराट वेडाचा आणखी एक कहर म्हणजे चित्रपटातील आर्चीची भूमिका साकारणाऱ्या रिंकूची एक झलक पाहण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातून मुले तिच्या घराच्या परिसरात हजेरी लावतात आणि ती दिसली नाही तर तिच्या गाडी सोबत सेल्फी काढून परत जातात.
पुण्यातील तळजाई पठार परिसरात राहणा-या युवकही असाच सैराट वेडा आहे. त्याने अत्ता पर्यंत तब्बल 30 वेळा सैराट पाहीला असून त्यांने चक्क सैराट चित्रपटातील कलाकारांचे फोटोच आपल्या गाडीवर छापले आहेत. त्यामुळे ही गाडी प्रत्येकाचेच लक्ष वेधणारी ठरली आहे. ही गाडी घेऊन हा युवक एका लग्नात गेला तर सर्व व-हाडी मंडळी लग्न सोडून या गाडी बरोबर फोटो काढण्यातच मग्न झाली होती. शेवटी वधु-वरांनीही या गाडी सोबत फोटो काढल्यानंतर त्यांच लग्न लागलं.
वाई येथील एक महिन्याभरापूर्वी लग्न ठरलेल्या जोडप्यानं सैराट पाहिला. या जोडप्याचं १२ जून रोजी लग्न झालं. त्यांच्या लग्नाच्या ठिकाणी लावलेल्या स्टँंडीवर चक्क आर्ची आणि परशा चित्रपटात ज्या प्रमाणे घोडसवारी करतात. त्याप्रमाणे या जोडप्याने घोड्यावर बसलेला फोटो काढून कार्यालया बाहेर लावला.
पुण्यातील एका मध्यवर्ती भागातील चित्रपट गृहामध्ये सैराटचा शो सुरू होता. झिंगाट गाण सुरू होताच एकाच वेळी तीस ते चाळीस तरूण चित्रपटगृहाच्या पडद्यासमोर असलेल्या व्यासपीठावर आले. आणि त्यांनी नाचायला सुरूवात केली. आणि गाण संपताप वन्स मोअरची मागणीही केली. हे नाचणं एवढं ‘सैराट’ होतं की स्टेजचा काही भाग मोडला. त्यामुळे या तरूणांना खाली उतरविण्यासाठी काही वेळ चित्रपट बंद ठेवावा लागला.