तुम्ही भूक मारता, चालता चालता काहीबाही पोटात ढकलता? जेवण उरकताय?-सावधान! दिवस उगवला की आधी आठवतात ती दिवसभरात करावी लागणारी कामं. आणि या कामांमागे पळता पळता या कामांसाठी ऊर्जा देणाऱ्या खाण्यापिण्याकडे, जेवणाच्या वेळाकडे आपण मात्र फारचं कॅज्युअली बघतो. ते का? ऐन भुकेच्या वेळेस सात्विक गुणांचं जेवण टाळून आपण चटक मटक आणि वर वर पोटभरल्याचा आभास निर्माण करणारं काहीबाही खावून मोकळे होतो. ते का? जेवणासारखं अत्यंत महत्त्वाचं काम आपण अगदीच उरकल्यासारखं करतो. ते का? या अशा वागण्यानं आपण आपल्याच आरोग्याशी खेळत असतो याची आपल्याला जाणीव असते का? या प्रश्नांची उत्तरं खरंतर आपली आपणच शोधायला हवीत. स्वत:ला वेळेवर जेवण्याची आणि पौष्टिक ते खाण्याची सवय लावण्यासाठी कोणी बाहेरून येणार नाही हे काम स्वत:चं स्वत:च करावं लागेल. वेळेवर जेवणं आणि जेवणाच्या वेळेत पौष्टिक आहार घेणं या दोन गोष्टी आपल्याला आयुष्यभर धष्टपुष्ट ठेवू शकतात. आणि या दोन्ही गोष्टी चुकवल्या तर आपल्या आरोग्याचं घड्याळ बिघडतं ते मग कायमचंच! वेळेवर म्हणजे कधी जेवावं? वेळेवर खाणं आवश्यक असलं तरी जेवणाची वेळ घड्याळावरून ठरवू नये, तर शरीराच्या जैविक घड्याळानुसार ठरवावी आणि जैविक घड्याळ मात्र भिंतीवरील घड्याळाप्रमाणे नियमित चालेल याची सवय लावावी. पहिलं अन्न पूर्ण पचलं आहे, त्याची पावती म्हणून शुद्ध ढेकर आला आहे, भुकेची संवेदना झाली आहे, शरीराला हलकेपणा आहे अशावेळीच पुढचा आहार घ्यावा. पहिले सेवन केलेलं अन्न पचलं नसताना, जेवणाची इच्छा नसताना, शरीर जड असताना किंवा जेवल्यानंतर पुन्हा सतत काहीतरी तोंडात टाकत राहणं या सवयींमुळे रोगांना आमंत्रण मिळतं. पचनशक्तीवर अतिरिक्त ताण येतो. निसर्गाला जमतं मग आपल्याला का नाही? सकाळी ९ वाजले की नाश्ता करावा. घड्याळात १२ वाजले की जेवायला बसावं असं न करता भुकेची संवेदना झाल्यावर खावं हेच योग्य. पण ही संवेदना मात्र वेळेवर होईल याची सवय स्वत:च स्वत:ला लावावी लागते. आपल्या आजूबाजूला, निसर्गात जरी आपण डोळे उघडून पाहिले तरी आपल्या लक्षात येईल की, निसर्गाचं चक्र अगदी घड्याळाबर हुकूम चालू आहे. सूर्योदय नियमित वेळेलाच होतो. आणि ना लवकर ना उशिरा सूर्यास्तही अगदी ठरलेल्या वेळीच होतो. मग जे निसर्गाला जमतं ते आपल्याला का नाही? निसर्गाच्या चक्राशी आपलं घडयाळ आपण सेट करून घ्यायला हवं. आपल्या शरीरातील जैविक घड्याळही खरं तर आपलं कार्य बिनचूक करीत असतं. सकाळ झाली की येणारी जाग, सूर्य डोक्यावर गेल्यावर लागणारी क्षुधा आणि रात्र झाली की मिटायला लागणारे डोळे याचंच प्रतीक आहे. आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो आणि वेळा चुकवत राहतो. परिणामस्वरूप अनेक आजारांचं संकट आयुष्यभर आपल्यावर ओढवून घेतो. वेळ पाळण्याचे फायदे आहाराची वेळ नियमित असेल तर नेमक्या त्याच वेळी पाचकस्त्रावही स्त्रावतात. अन्नाचं पचन होतं. खाल्लेलं अन्न अंगी लागतं. योग्य वेळ नसताना जेवल्यास पूर्ण पाचकस्त्राव येत नाहीत. अन्नाचं योग्य पचन होत नाही. याउलट जेवणाची वेळ निघून गेल्यास स्त्राव ठरलेल्या वेळी स्त्रवतात पण तेव्हा पोटात अन्न नसतं. परिणामी ते स्त्राव स्त्रवून गेल्यावर, जेवणाची वेळ उलटून गेल्यावर घेतलेल्या अन्नाचंही पूर्णत: पचन होत नाही. म्हणूनच जेवणाच्या वेळा जरी आपल्या सोयीनुरूप किंवा कामानुरूप ठरवल्या तरी जे ठरवलं आहे ते नियमित ठेवून त्यांचं पालन करणं हे महत्त्वाचं!
- वैद्य रजनी गोखले