- प्राची खाडे
चमचमते नेलकलर्स, वेगळ्या बॅग्ज दोन वेगवेगळ्या रंगाचे पायात मोजे आणि लेअरिंग हे साधं सोपं केलं तरी तुमची स्टाईल वेगळी दिसेल !!
कॉलेजला जाताना आपण नवं, वेगळं, स्टायलिश दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं. त्यासाठी शॉपिंग केलं जातं. मात्र हातात फार पैसे नसतात. बजेटची तंगी असतेच. त्यात सगळ्यात जास्त पैसे खर्च होतात ते कपडय़ांवरच. मात्र आपण भारंभार कपडे घेऊ शकत नाही आणि महागडे कपडे घेतले तर कपडे कमी खरेदी होतात आणि पैसे जास्त जातात.
आणि मग कॉलेजला गेल्यावर लक्षात येतं की, आपण तेच ते कपडे घालतो. लोकांच्या लक्षात येतात आपले रिपीट ड्रेस. आणि मग वैताग वाढतो.
हे असं होऊ नये म्हणून एक लक्षात ठेवायचा की, आपल्याला कितीही वाटलं की, स्टाईलचा विचार करून कपडे घेऊ तरी तसं न करता काही बेसिक गोष्टींचाच विचार करून कपडे खरदी करा.
सूत्र एकच- स्टिक टू बेसिक्स.
प्लेन! प्रिण्ट नको!!
शक्यतो खरेदी होते याकाळात ती जीन्सची.
बाजारात प्रिण्टेड जीन्स, फ्लोरल प्रिण्टच्या लेगिन्स, ट्राऊजर्स मिळतात. त्या स्टायलिश दिसतात हे खरंय, पण आपलं बजेट लक्षात घेता प्लेन आणि बेसिक कलरच्याच जीन्स घेणं उत्तम. काळा, निळा, ग्रे हे तर जिवाभावाचे कायमचे दोस्त. जरा पैसे असतील तर पांढरी किंवा ऑफव्हाइट जीन्स घ्यायलाही हरकत नाही.
त्यावर घालायला शर्ट्स, टॉप्स घ्याल त्यालाही हाच नियम लागू होतो. पिवळा, गुलाबी, लाल, हिरवा असे मस्त ब्राइट पण प्लेन रंग घ्या. लक्षात ठेवायचं की आपण तरुण आहोत, तरुणच दिसायला हवं. त्यामुळे ब्राइट कलरचे टॉप्स घ्या, त्यात प्रयोग करा. नियम एकच- बेसिक कलरची पॅण्ट त्यावर ब्राइट कलरचे टॉप्स.
प्रिण्टेड यासाठी घ्यायचे नाहीत कारण ते रिपीट केले तर लक्षात येतात. प्लेन कॉम्बिनेशन आपण कसंही मिक्स-मॅच करू शकतो.
चंदेरी/सोनेरी चमचम
कपडय़ांवर खर्च करायला पैसे नाहीत ना सही. आपण अॅक्सेसरीजवर पैसे खर्च करू तेही कमीत कमी. रंगीत कानातले, गळ्यातले घेऊ नका. त्यापेक्षा मल्टिकलर घ्या किंवा सरळ सोनेरी किंवा चंदेरी घ्या. म्हणजे सिल्व्हर आणि गोल्डन. गोल्डनमध्येही आता मेटॅलिक, मेट, शायनी गोल्ड अशा शेड्स मिळतात ते घ्या.
कानातलं, गळ्यातलं, बांगडी-ब्रेसलेट-अंगठी असे सेट बनवून ठेवा.
नियम एकच, एकावेळी सगळं घालायचं नाही.
जेव्हा गळ्यातलं घालाल तेव्हा फक्त ब्रेसलेट.
जेव्हा कानातले त्यासोबत अंगठी.
कधी एकच ठसठशीत ब्रेसलेट.
हे एवढं जरी केलं तरी तुम्ही वेगळ्या दिसाल.
त्याही पुढचं म्हणजे नेलपेण्ट वेगळ्या लावा. वेगळ्या आणि चांगल्या एक दोन बॅग्ज घेऊन ठेवा. कॅम्पसच्या गर्दीत तुम्ही नक्की वेगळ्या दिसाल.
लेअरिंग करा बिंधास्त
मुलींसाठी कॉलेजचं शॉपिंग खास असतं, पण मुलग्यांचं काय?
नियम तोच बेसिकवाला. कपडय़ांचा नियम बदलत नाही.
पण त्यातही मुलं लेअरिंग करू शकतात. बेसिक रंगाचे काही टीशर्ट, कॅज्युअल आणि सेमी फॉर्मल असे शर्ट घेऊन ठेवा. तेच वेगवेगळ्या पद्धतीनं वापरा. कॉलेजात जाताना ब्राईट कलरचा टीशर्ट, त्यावर ब्लॅक शर्ट हे मस्त कॉम्बिनेशन. संध्याकाळी कुठं जायचं असेल तर नुस्ता शर्ट वापरला तरी रिपीट आहे हे कुणाच्या लक्षात येत नाही.
यासोबत अजून काही गोष्टी करा.
1) चष्मा असेल तुम्हाला तर मस्त स्टायलिश फ्रेमचा एक नवाकोरा चष्मा बनवून घ्या. झाला लूक चेंज.
2) कॉलेज बॅग मस्त घ्या, वेगळी. तीच तुमची ओळख बनेल.
3) बेल्ट चांगला निवडा. स्टायलिश.
बी ओरिजिनल
खरेदी करा, स्टायलिंग करा, पण एक लक्षात ठेवा की, आपण स्टुडण्ट आहोत. त्यामुळे कपडय़ांचा कम्फर्टही स्टाइलक्ष्तकाच महत्त्वाचा. त्यामुळे कम्फर्टेबल कपडे घाला. मुख्य म्हणजे स्वत:ची स्टाइल स्वत:च बनवा. इतरांना कॉपी करू नका. तुम्ही वेगळे दिसलात, वेगळे असलात तर तुमची स्टाइल कॅम्पस ओळखेल!
इतरांचं पाहून काहीतरी करू नका. आपल्याला जे चांगलं वाटेल, आवडेल ते बिंधास्त करा.
कारण तुमच्यासारखे तुम्हीच!
(लेखिका फॅशन एक्सपर्ट आणि स्टायलिस्ट आहेत)
prachikhade@gmail.com