- माधुरी पेठकरमुंबईतलं एक घर. मध्यमवर्गीय प्रौढ जोडप्याचं. मुलं बहुदा बाहेरगावी शिकायला किंवा नोकरीला असलेली. नवरा चाकरमानी. बायको गृहिणी. मुंबईतले चाकरमानी म्हटलं की त्यांच्या मनगटावर किंवा मोबाइलमध्ये लोकलच्या वेळापत्रकाचंच घड्याळ बांधलेलं. या घड्याळाच्या मागे धावता धावता त्या चाकरमान्यांची आणि वेळेच्या वेळी सारं त्यांच्या हातात देण्यासाठी त्यांच्या बायकांची नुसती दमछाक. चिडचिड, त्रागा. या नवरा-बायकोच्या नात्यातला एक अविभाज्य भाग. ‘लाइफ आॅफ मुंबई’ या योगेश बालगंधर्व दिग्दर्शित लघुपटातलं हे जोडपं. नवऱ्याला वेळेवर कामावर जाता यावं म्हणून सकाळी सहाच्या ठोक्याला, दूधवाल्यानं वाजवलेल्या बेलनं जागी झालेली बायको. ती उठल्या उठल्या ओट्यापाशी जाऊन कामाला भिडते. नव-यासाठी पोळी-भाजीचा डबा करते. चहा ठेवते. इकडे नवरा बायकोनंतर आपल्या रोजच्या वेळेत उठून आॅफिससाठी तयार होतो.
पण तरीही घड्याळाचा काटा उशिरावरच. त्याचा राग बायकोवरच निघतो; पण तिही हे रोजचंच म्हणून त्याच्यासमोर शांत राहाते. मात्र स्वयंपाकघरात तिचाही त्रागा होतोच. स्वत:शी बोलत का होईना ती तो व्यक्त करते. शांत होते. नवरा कामाला गेल्यानंतर मिळणाºया निवांत वेळेत स्वत:चं अंघोळपाणी आटोपून चहा घेत पेपर वाचायला बसते. सगळं नेहेमीच्या रूटीनप्रमाणे. पण पेपर वाचता वाचता तिला अचानक काहीतरी आठवतं. ती अस्वस्थ होते. नव-याला ते सांगण्यासाठी मोबाइल लावते; पण नव-याचा फोन बंद. इकडे हिची तगमग. अपराधीभावनेनं अस्वस्थ बायको नव-याला सारखा फोन करते. अनेक प्रयत्नांनंतर एकदाचा नव-याला फोन लागतो. तो नेहमीप्रमाणे हुकलेल्या बसच्या मागे धावत, रिक्षाने प्रवास करत स्टेशनवर पोहोचलेला. चिडचिडत लोकलची वाट पाहात उभा. तो बायकोचा फोन उचलतो. इकडून बायको म्हणते, ‘अहो, तुम्ही विसरलात, तुम्ही रिटायर झालात?’ तिच्या या वाक्यानं नवरा स्तब्ध होतो. आणि इकडे प्रेक्षकांनाही एक अनपेक्षित धक्का बसतो.
‘लाइफ आॅफ मुंबई’ हा लघुपट म्हणजे एका यंत्रवत रूटीनला बांधल्या गेलेल्या मुंबईमधल्या माणसांची एक प्रातिनिधिक कथा आहे. योगेश बालगंधर्वला या कथेवर लघुपट करावासा वाटला कारण हा अनुभव त्यानं स्वत: घेतलेला. त्याचे वडील बेस्टमध्ये कर्मचारी. त्यांचा दिवस सुरू व्हायचा पहाटे साडेतीनला आणि त्यांच्या आईचा त्यांच्या मागोमाग पहाटे पावणेचारला. वडिलांना याच रूटीनची इतकी सवय झालेली की निवृत्तीनंतरच्या दुस-या दिवशी वडील नेहमीप्रमाणे उठले, कामाला लागले, आईला चहासाठी उठवलं तेव्हा तिनं त्यांना आठवण करून दिली की ‘अहो, झोपा आता निवांत, तुम्ही रिटायर झालात’. आईच्या या एका वाक्यानंतर वडील अतिशय अस्वस्थ झाले. आयुष्यात एक रिकामी पोकळी निर्माण झाल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. नोकरीमुळे ज्या रूटीनच्या ते अधीन झाले होते त्यातून बाहेर पडायला त्यांना कित्येक वर्षं लागली.
मूळचा नाटककार असलेल्या योगेशने या अनुभवातील नाट्यमयता लघुपटाद्वारे मांडण्याचं ठरवलं. अतिशय मोजके संवाद वापरून त्याने मुंबई शहरातील असंख्य नोकरदारांच्या वाट्याला येणारी ही अस्वस्थता, रिकामपण साडेनऊ मिनिटांच्या ‘लाइफ आॅफ मुंबई’ या लघुपटात दाखवले आहे.हा लघुपट पाहण्यासाठी.. https://www.youtube.com/watch?v=ZoeRxExZ4lM&t=120s