- मन की बात
आपण बरं, आपलं काम बरं;
आपण ना कुणाच्या अध्यात ना मध्यात,
आपण चुकून कधी इकडचं तिकडे करत नाही,
आपण लावालाव्या तर अजिबात करत नाही,
गॉसिप तर आपल्याला अजिबात आवडत नाही;
आपण याचं त्याला सांगत नाही,
आपण कधी कुणावर जळत नाही,
कुणाचा कधी हेवा करत नाही,
कुणाला कधी दोष देत नाही,
कुणाविषयी मनात अढी नाही
कुणावर काट खात नाही,
कुणाचं वाट्टोळं व्हावं म्हणून तळतळाट करत नाही;
आपण असं कधीच काही करत नाही!
**
आपल्याला माहिती असतं,
त्याच्यात काही दम नाही;
त्याची काही लायकीच नाही,
मेहनतही करत नाही,
नुस्ता पुढे पुढे,
नुस्ता चमको,
नुस्ती दादागिरी,
नुस्ती मिरवायची हौस,
नुस्ता बोलका पोपट,
इतका उथळ
तरी खळखळाट फार,
अती करतात,
किती भंपकपणा,
किती लाचारी,
किती चोमडेपणा.
आपण मात्र असं कधी वागत नाही,
आपण असा लाळघोटेपणा कधीच करत नाही,
आपला ताठ बाणा सोडत नाही,
कुणापुढे हात पसरत नाही
पण आपण काही बोलत नाही,
कारण आपण आपलं काम बरं,
आपण बरं.
***
खरं तर प्रत्येकालाच वाटतं की,
‘आपण’ असेच असतो,
सच्चे-खरे. साधेसरळ
पण मग ते लोक कोण असतात,
जे ‘त्यांच्या’सारखे वागतात,
चोमडे भंपक असतात?
जे शो शाईन करतात,
इतरांवर जळतात,
लावालाव्या करतात
दुसर्याला छळतात
जळकुकडे असतात.
***
असा अवघड प्रश्न आपण
स्वत:ला विचारत नाही
काही आरसे आपण कधीच स्वत:समोर धरत नाही.
( एका जापनीज् कवितेचा मुक्त अनुवाद)