निशांत महाजन
‘ढ’ आहे आजची तरुण पिढी असं कुणी म्हटलं तर आपण किती खवळून उठू? पण तसं खरंच आहे असं कुणी अभ्यासांती सिद्ध केलं तर? शिकागोतल्या लिलिओनीस विद्यापीठानं हे अभ्यासांती दाखवून दिलं आहे की, आजची तरुण पिढी विशेषतर् मिलेनिअल्स हे पर्सनल फायनान्स या विषयात अगदीच ‘ढ’ आहे. त्यांच्याकडे आर्थिक साक्षरता ही गोष्ट नावालाही नाही,त्यामुळे भावी आयुष्यात पैशाबाबतची त्यांची सारीच गणितं चुकणार आहेत.वाचून जरा धक्का बसेल अशीच ही माहिती आहे आणि ती अमेरिकेतली आहे, त्यामुळे अधिक आश्चर्य वाटावं मात्र या विद्यापीठानं केलेल्या अभ्यासानुसार कॉलेजात शिकणार्या अनेक तरुण मुलांना साधा चेक लिहून देता येत नाही, चेक नंबर कुठं असतो तो ओळखून लिहिता येत नाहीत. बॅँकेत जाऊन चेकबूक कसं भरतात हे माहिती नाही आणि चुकून कधी ते जमाखर्चाचा हिशेबही लिहित नाहीत.ते असं का करत असतील याचं उत्तर त्यांनी शोधलं तर बहुसंख्य मुलं हे डेबीट कार्डच वापरतात, त्यामुळे त्यांना सहसा कधी बॅँकेत जावं लागलेलं नाही. ऑनलाइन ट्रान्झ्ॉक्शन करतात त्यामुळे त्यांनी कधी चेक भरले नाहीत की कधी बॅँकेतून पैसे काढले नाहीत. हा युक्तीवाद मान्य केला तरी अनेकांना हेच माहिती नाही की आपण दर महिन्याला किती पैसे खर्च करतो, किती बॅँकेतून काढतो. क्रेडीट कार्डवर काय दरानं व्याज देतो. त्यामुळे अनेकांना पैशाचं भान नाही आणि महागाईचा अंदाजही नाही.त्यातून चित्र असं दिसतं आहे की, आर्थिक साक्षरताच नाही. गुंतवणूक, बचत आणि त्याचे फायदे अनेकांच्या गावीही नाहीत. यापुढे अभ्यासक्रमातच पर्सनल फायनान्स हा विषय सुरु करायचा का याबाबत हे विद्यापीठ आता विचार करत आहेत.हे झालं अमेरिकेतील चित्र.आपल्याकडे काय परिस्थिती दिसते?* अनेक तरुण मुलांना बॅँकेत विड्रॉअल स्लिप भरता येत नाही.* चेक भरता येत नाहीत.* पोस्टाची कामं येत नाहीत की साधा अर्ज करता येत नाही.* डीडी काढता येत नाहीत.* सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिशेब लिहिता येत नाहीत.* देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करतील पण म्युच्युअल फंड, विमा यासारख्या गोष्टींची माहिती नाही.* बचत खाती काढली तर त्यात पैसे नाहीत.* क्रेडीट कार्डवर वारेमाप खर्च, मात्र त्याचं बिल भरलं जात नाही,त्यावर दंड.* एकुणच पैसे कसे वाचवायचे, कसे गुंतवायचे आणि व्यवहार कसे करायचे हेच माहिती नाही.* अशानं आपले पैसे कसे वाढतील, याचा विचारही कोणी करत नाही.* हे चित्र अत्यंत गंभीर आहे.