- डॉ. प्रतीक सुराणा
आयुष्यात बर्याच चांगल्या गोष्टी होतात तर त्यापैकी एक म्हणजे मी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकलो. मूळचा मी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचा. पण साधारण सहावी ते बारावी माझं शिक्षण नवोदयमध्ये पार पडलं. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद इथे एमबीबीएससाठी अॅडमिशन मिळवली. 2014 मध्ये मी निर्माण प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता, पण माझी निवड झाली नाही. निर्माणच्या मुलाखतीमध्ये मला वाटत असणार्या खूप प्रश्नांबद्दल, समस्यांबद्दल मी बोलत सुटलो. मात्र महत्त्वाचा प्रश्न हा होता की मी त्यासाठी कृती काय केली, तर ते उत्तर माझ्याकडे नव्हतं.मग त्यानंतर पुढच्या वर्षात सर्व मित्नांना घेऊन आठवडी साफसफाई करायचं ठरवलं. सुरुवात हॉस्पिटल आणि कॉलेजपासून केली. सुरुवातीला 30-40 मुलं यायची; पण गळती होत होत शेवटी आम्ही 12 जण शिल्लक राहिलो. आम्ही नियमित यायचो. 6 महिने अशापद्धतीने काम केलं. मग कॉलेजच्या पातळीवर आम्ही एक ग्रुप तयार केला, उमंग नावाचा. ज्या मुलामुलींना सामाजिक काम करायचं असेल त्यांना एकत्न आणण्यासाठी आम्ही काम करू लागलो. त्यासाठी एक गाव दत्तक घेतलं, तिथे मेडिकल कॅम्प घेतले. मला वाटू लागलं की आता कशाला हवं निर्माण; पण मित्नांनी खूपच आग्रह केला आणि पुन्हा निर्माणसाठी अर्ज केला. यावेळी मात्न माझी निवड झाली. त्या काळात मला राजकारणात जावं असं वाटत होतं. कारण माझ्या मते कोणताही बदल आणायचा असेल तर हातात सत्ता पाहिजे. माझ्याकडे पॉवर असल्याशिवाय मी समाजात बदल घडवू शकत नाही.निर्माणच्या पहिल्या शिबिरातच माझ्या या पूर्वग्रहाला पहिला धक्का बसला. गैर-राजकीय किंवा सामाजिक संस्थासुद्धा कशाप्रकारे समाजातील वेगवेगळ्या समस्यांवर काम करतात हे उदाहरणासकट पाहायला मिळालं. त्यामुळे मला ज्या सामाजिक बदलासाठी काम करायचं आहे, त्यासाठी राजकारण हा एकच मार्ग आहे का, असा प्रश्न मला पडला. शिबिर संपेर्पयत मला माझ्याच प्रश्नाचं उत्तर मिळालेलं होतं. दुसर्या शिबिरादरम्यान मी माझ्यावरच प्रश्न उपस्थित केले. मला समोर दिसणारा प्रश्न कोणी सोडवायला पाहिजे याबद्दल माझ्या मनात काही कल्पना होत्या. त्याचं उत्तर साधारणपणे सरकारने असं होतं. त्यामुळे ज्याच्याकडे सत्ता आहे त्यानेच सर्व समस्या सोडवाव्यात अशी माझी समजूत होती. पण निर्माण शिबिरानंतर मला जाणवणारा प्रश्न किंवा समस्या याची जबाबदारी मी स्वतर्कडे घ्यायला शिकलो. कुणाला तरी ब्लेम करण्यापेक्षा मी काय करू शकतो यावर जास्त भर द्यायला लागलो. सुरु वातीला मी तक्र ार खूप करायचो. निर्माण शिबिरांमुळे माझ्यात झालेला बदल म्हणजे, आता माझ्या तक्र ारी कमी होऊ लागल्या आहेत आणि स्वप्न बघणं वाढलंय. माझी स्वप्नं मोठी होऊ लागली आहेत. माझं स्वप्न इतकं मोठं पाहिजे की त्याच्यासमोर मी काहीच नाही.निर्माणच्या शिबिरांची मालिका संपली आणि 7 एप्रिल 2018 ला मी पेंढरीच्या (ता. धानोरा, जि. गडचिरोली) प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रु जू झालो. जेव्हा ठरवलं की पेंढरीला जायचंय तेव्हापासून मनात भीती होती. कसं करायचं, काय काय प्रॉब्लेम्स येतील, काय होईल, चुकलं तर लोक मारतील का, इत्यादी. पेंढरीमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करायला यायचं पण इंटर्नशिपमध्ये ज्ञान नाही, स्किल नाही. प्रचंड राग यायचा तेव्हा व्यवस्थेचा. गंभीर पेशंटला काही झालं तर ही असुरक्षिततादेखील कायम मनात होती. पेंढरी ते गडचिरोली अंतर दोन तासांचं आणि त्यात गंभीर पेशंटला गडचिरोलीला पाठवायचं म्हणजे किती धोका. आम्हा इंटर्न्सला वाटतं की कॉलेजमध्ये इंटर्नशिप व्यवस्थित दिली जात नाही, शिकवलं जात नाही. पण मध्यंतरी मी एक वाक्य वाचलं, Think about effectiveness first, and efficiency second. त्यामुळे माझं काम परिणामकारक कसं होईल यावर सर्वात पहिले भर द्यायचं मी ठरवलं. सुरुवातीच्या भीतीनंतर मी पेंढरीमध्ये लवकरच सेटल झालो. आता कामात मजा येऊ लागली होती.सुरु वातीला पीएचसीला एकच लाइट होता आणि दुसरा लाइट माझ्या रूममध्ये. अधेमधे कुठेच लाइट नव्हता. त्यामुळे संध्याकाळी पेशंट आला की मी टॉर्च घेऊन पेशंट बघायला जात असे. त्यामुळे सुरु वातीचे 2-3 महिने मी संध्याकाळी पेशंट आला तरच बाहेर पडत असे. सापाची भीती वाटे, म्हणून जवळ एक काठी घेऊन पूर्णवेळ पलंगावरच बसून राही. पावसाळ्यात वीज गेली तर 30-35 तास परत येत नसे. तेव्हा रात्नभर सापाच्या भीतीने मी पलंगावर टॉर्च आणि मोबाइल घेऊन बसून राही. पलंगाच्या खाली पाय सोडूनपण नाही बसायचो. फोनला नेटवर्क नसल्याने एक कॉल लागण्यासाठी 70-80 वेळा फोन लावावा लागत असे. एकदा मला भूक लागली होती आणि स्वयंपाक काही येत नव्हता. मी खिचडीची रेसिपी शिकण्यासाठी आई, बहीण आणि दोन मैत्रिणींना फोन लावत होतो. प्रत्येकाला 30-40 वेळा कॉल लावल्यानंतर एकीशी बोलणं झालं आणि मी त्या रात्नी कशीबशी खिचडी बनवून खाल्ली. या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट कळली - का जगावं याचा उलगडा झाला की माणसाला कोणत्याही परिस्थितीत जगता येतं.पेशंट्सबद्दल बोलायचं झालं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स मी या काळात बघितले. जास्त करून डिलेव्हरी आणि बाळं. मी जेव्हा पहिली डिलेव्हरी इथे केली तेव्हा ती इमर्जन्सी होती; पण सगळं नॉर्मल झालं आणि तेव्हापासून मी गेल्या 7 महिन्यात 60-70 डिलेव्हरी पार पाडल्या. तेव्हा मी एफिशियंट होतो का, तर नक्कीच नाही. पण मी इथे नसतो तर माझ्या हातून मिळणारी सेवादेखील पेशंटला मिळू शकली असती का? कदाचित नाही. माझ्याकडे ट्रीटमेंट चार्ट आहे, काही अडचण आली तर मी इतर कर्मचार्यांना विचारतो, नाहीतर सरळ पुस्तक उघडून बसतो.एकदा एक इंटेरियर भागातून गरोदर बाई आली. थोडी अॅबनॉर्मलच वाटत होती. तिला सोनोग्राफी करायला सांगितलं; पण ती सोनोग्राफी न करताच गेली. 10 दिवसांनी पुन्हा आली, फुली डायलेटेड. बाळाचं डोकं खाली आलेलं होतं. ताबडतोब डिलेव्हरी केली. बाळाचं वजन भरलं 1500 ग्रॅम. मी सिस्टरला लगेच ऑक्सिटोसिन लावायला सांगितलं. तेवढय़ात माझ्या लक्षात आलं की तिचं पोट अजून कॉन्ट्रॅक्ट झालेलं नाहीये, पोट मोठंच आहे. तिला पुन्हा लेबर पेन झालं आणि दुसरं बाळ बाहेर आलं. त्याचंही वजन 1500 ग्रॅम. मी लगेच दोन्ही बाळांना गडचिरोलीला रेफर केलं. सुदैवाने माझ्या ते लक्षात आलं आणि मी सिस्टरला ऑक्सिटोसिन लावण्यापासून थांबवलं. मला अशी नशिबाचीसुद्धा साथ मिळते. हिमोग्लोबीन 5 असलेल्या महिला येतात; पण तिच्या घरात कोणीच तिला रक्त द्यायला तयार होत नाही, रक्त विकतही घेत नाहीत. महिन्याला हजार रु पयाचा खर्रा (सुंगधित तंबाखू) खातील, पण घरातील बाईसाठी रक्त विकत आणणार नाहीत. असेही पेशंट्स असतात की आता डिलेव्हरी झालीये आणि 6 महिन्याने पुन्हा गरोदर होऊन आली. अशावेळी नवर्याला समजावून सांगावं लागतं. अम्मांचं (डॉ. राणी बंग) खूप सुंदर पुस्तक आहे यावर-पुटींग वूमन फस्र्ट. ग्रामीण आणि आदिवासी भागात बायांचे, मुलींचे काय प्रश्न असतात, त्यांना काय सहन करावं लागतं याचे भरपूर उदाहरणं त्या पुस्तकात दिले आहेत.एकदा 40-45 वर्षाची एक बाई आली होती. तिच्याशी बोलत असताना अचानक ती रडू लागली आणि तिने सांगायला सुरु वात केली. 5 महिन्यांपासून पाळी उडाली होती. तिला याआधी 5 मुली होत्या, पाचव्या-सहाव्यांदा तिनं मुली अबोर्ट केल्या होत्या. ही तिची सातवी वेळ होती. 40-50 हजार रु पये घ्या, पण मला हे बाळ नको असं सांगत ती माझ्यासमोर रडत होती. एका डॉक्टरसाठी ती फक्त एक केस होती; पण तिला मी ताई म्हणताच तिचे कौटुंबिक प्रश्नही समोर आले. काही महिन्यानंतर आशाचा फोन आला की ती बाई बाळाला दूध पाजत नाहीये. तिचा नवरा दारू पितो आणि बाळाला दूध पाजू देत नाही. शेवटी तिला आणि बाळाला अॅडमिट करून घेतलं. या प्रसंगांनी मला खूप शिकवलं. हॅरिसन, पार्कवाचून आरोग्याचे प्रश्न घोटून तयार झालेला मी डॉक्टर; पण आरोग्याच्या प्रश्नांना असणारे हे सामाजिक पदर मला पेंढरीने उलगडून दाखवले.
मी पेंढरीला नवीन प्रयोग सुरू केला आहे - आरोग्यसभा . गावागावात जाऊन आरोग्य म्हणजे काय, शरीराला कशाची गरज आहे, काय करायला पाहिजे, काय टाळायला पाहिजे, कशावर उपचार उपलब्ध आहे आणि तो घ्यायला पाहिजे हे लोकांना सांगायला सुरु वात केली आहे. आरोग्यसभेचा खूप उपयोग झाला. कधीही दवाखान्यात न आलेले लोक आता दवाखान्यात उपचारासाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे गोळ्या-औषधे नाहीत, सुविधा नाहीत, कर्मचारी काम करत नाहीत, लोकांना आरोग्यसेवा घ्यायची नाही अशा अतार्किक गोष्टींना माझ्या मनात कायमचा पूर्णविराम बसला. प्रश्न समोर आहे, फक्त मी काय करतो याने पुढचं चित्न कसं दिसेल हे ठरतं. पूर्वीचा मी असतो तर कदाचित वर दिलेल्या तक्र ारी करत बसलो असतो. मी प्रश्नाची जबाबदारी स्वीकारली आणि सगळं चित्नच पालटलं, रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेप्रमाणे Two roads diverged in a wood, and I, I took the one less travelled by, And that has made all the difference.या एक वर्षात पेंढरीने मला आरोग्यव्यवस्थेचं जे भयाण चित्र दाखवलं, त्याने मला ग्रामीण आणि आदिवासी आरोग्यासोबत कायमचं बांधलंय. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पुरवणे आता हाच माझ्या जीवनाचा उद्देश बनलाय.****
निर्माणमध्ये सहभागासाठी.
अर्थपूर्ण जीवनाचा कृतिशील शोध सुरू असणार्या युवक-युवतींसाठीचा एक समुदाय म्हणजे ‘निर्माण’. महाराष्ट्रातील युवांना सामाजिक समस्यांविषयी सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने डॉ. राणी व डॉ. अभय बंग यांनी निर्माण हा युवानिर्मितीचा उपक्र म सुरू केला आहे.निर्माणची दहावी बॅच येत्या जानेवारीमध्ये (2020) सुरू होत आहे.त्यात सहभागी होण्याची इच्छा असेल तर
http://nirman.mkcl.org
या संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज डाउनलोड करता येईल. अधिक माहितीही याच वेबसाइटवर उपलब्ध आहे.